उन्हाळी हंगामात भुईमूग हे अधिक उत्पादन व सकस चारा देणारे पीक आहे. भुईमूग हे पीक सूर्यप्रकाशाच्या कालावधीला जरी संवेदनक्षम असले तरी भारतात खरीप, रब्बी व उन्हाळी हंगामात घेता येते. उन्हाळी हंगामात बागायतीमुळे जमिनीत ओलावा व भरपूर सूर्यप्रकाश असल्याने अपेक्षित उत्पादन मिळते. महाराष्ट्रातील हवामान यास अनुकूल असल्याने या पिकाची वाढ चांगली होते. तसेच रोग किडींचा प्रादुर्भाव नगण्य असल्यामुळे उत्पादन जास्त मिळते.

जमीन : भुईमुगाच्या लागवडीसाठी मध्यम; परंतु पाण्याचा चांगला निचरा होणारी वाळू व सेंद्रीय पदार्थ मिश्रीत जमीन योग्य असते. या जमिनी नेहमी भुसभुशीत राहत असल्याने जमिनीत भरपूर प्रमाणात हवा खेळती राहते. त्यामुळे मुळांची चांगली वाढ होऊन आऱ्या सुलभ रीतीने जमिनीत जाण्यासाठी तसेच शेंगा पोसण्यासाठी मदत होते.

पूर्व मशागत : पेरणीपूर्वी जमीन मऊ व भुसभुशीत करून घेण्यासाठी प्रथम १५ सेंमी. खोल नांगरट करून घ्यावी. कुळव्याच्या २ ते ३ पाळ्या द्याव्यात. शेवटच्या कुळवाणी अगोदर ७.५ टन प्रति हेक्टरी शेणखत/कंपोष्ट खत शेतात पसरावे.

पेरणीची वेळ : उन्हाळी हंगामासाठी योग्य कालावधी १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी आहे. या कालावधीत थंडी कमी होऊन उगवण चांगली होते. पेरणीच्या वेळी रात्रीचे किमान तापमान १८ से. किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास पेरणी करावी. भुईमुगाची पेरणी सपाट वाफ्यावर किंवा रुंद सरी वरंबा पद्धतीने करता येते. पूर्व मशागत केलेल्या जमिनीत ५ x ४ फूट आकाराचे व ६ इंच उंचीचे गादी वाफे (रुंद सरी वाफा) तयार करावेत. अशा वाफ्यांवर ३० x १० सेमी. अंतरावर भुईमुगाची टोकण करावी व पाणी द्यावे.

गादीवाफा पद्धतीचे फायदे :

  • गादी वाफ्यावरील जमीन भुसभुशीत राहत असल्याने मुळांची कार्यक्षमता वाढून पिकाची वाढ जोमदार होते व उत्पादनातही वाढ होते.
  • जमिनीत पाणी व हवा यांचे प्रमाण संतुलित ठेवता येते; त्यामुळे पिकाची कार्यक्षमता वाढते.
  • पिकास पाण्याचा ताण बसत नाही, जास्त पाणी दिल्याने सरीतून पाण्याचा निचरा करता येतो.
  • तुषार सिंचनपद्धतीने पाणी देणे सोयीस्कर होते.
  • या पद्धतीत पाटानेही पाणी देता येते यासाठी वेगळी रान बांधणी करावी लागत नाही.
  • संतुलित खत व्यवस्थापन केल्याने अन्नद्रव्ये कमतरतेची लक्षणे दिसत नाहीत व योग्य प्रकारे पिकांची वाढ होऊन उत्पादनात वाढ होते.

बियाण्याचे प्रमाण : पेरणीकरिता सर्वसाधारणपणे उपट्या वाणासाठी १००; तर मोठ्या दाण्याच्या वाणांसाठी १२५ किग्रॅ. प्रति हेक्टरी बियाणे लागते. निमपसऱ्या व पसऱ्या वाणांसाठी ८० ते  ८५ किग्रॅ. बियाणे वापरावे.

बीजप्रक्रिया : रोपावस्थेत बियाण्यांपासून प्रादुर्भाव होणाऱ्या रोगांपासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी प्रति किग्रॅ. बियाण्यास ५ ग्रॅ. थायरम किंवा २ ग्रॅ. मॅन्कोझेब किंवा ५ ग्रॅ. ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करावी. तसेच प्रति १० किग्रॅ. बियाण्यास २५० ग्रॅ. रायझोबियम व पीएसबी (स्फुरद विद्राव्य जीवाणू) या जीवाणू संवर्धनाची बीजप्रक्रिया करून बियाणे सावलीत वाळवून मगच पेरणीसाठी वापरावे.

पेरणीचे अंतर : सपाट वाफापद्धतीने पेरणी करावयाची झाल्यास पेरणीयंत्राच्या साहाय्याने दोन ओळीतील अंतर ३० सेंमी., दोन रोपातील अंतर १० सेंमी. असे ठेवावे, रोपांची संख्या हेक्टरी ३.३३ लाख ठेवावी. टोकणपद्धतीने पेरणी केल्यास बियाण्याची २५ टक्के बचत होते. पेरणीच्या वेळीसुद्धा बारीक बियाणे बाजूला काढणे शक्य होऊन प्रति हेक्टरी ३.३३ लाख रोपे मिळतात. पेरणी ५ सेंमी. खोलीवर करावी.

खत व्यवस्थापन : पेरणीवेळी २५ किग्रॅ. नत्र (यूरीया खतातून), ५० किग्रॅ. स्फुरद (एसएसपी खतातून) प्रति हेक्टरी द्यावे. भुईमुगास नत्र व स्फुरद ही महत्त्वाची अन्नद्रव्ये लागतात. त्याचबरोबर सल्फर व कॅल्शियम ही दुय्यम अन्नद्रव्ये द्यावी लागतात; म्हणून स्फुरद देताना तो सिंगल सुपर फॉस्फेट (एसएसपी) या खतातून द्यावा. त्याचबरोबर पेरणी वेळी २०० किग्रॅ. जिप्सम सल्फर व कॅल्शियमची उपलब्धता करण्यासाठी जमिनीतून द्यावे. त्याचबरोबर सूक्ष्म अन्नद्रव्य जस्त २० व बोरॉन ५ कि./हे. द्यावे तर राहिलेला २०० किग्रॅ. जिप्सम आऱ्या सुटताना द्यावा. त्यामुळे शेंगा लागण्याचे प्रमाण वाढून उत्पादनही वाढते.

पाणी व्यवस्थापन : उन्हाळी भुईमुगासाठी ७० ते ८० सेंमी. पाणी लागते. त्यामुळे पाण्याचा ताण पडू न देता जमिनीच्या गुणधर्मानुसार ८-१० दिवसाच्या अंतराने १२-१४ पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. तुषार सिंचन तसेच प्लास्टीक आच्छादन तंत्र वापरल्यास पाण्याची बचत होते. तसेच हवेमध्ये सूक्ष्म वातावरणनिर्मिती होऊन पिकाची वाढ जोमाने होते.

आंतर मशागत : भुईमूग पीक तणविरहीत ठेवण्यासाठी २ निंदण्या (खुरपण्या) १५-२० दिवसांच्या अंतराने व दोन कोळपण्या १०-१२ दिवसांच्या अंतराने कराव्यात. साधारणपणे ३५-४० दिवसानंतर आऱ्या सुटू लागल्यानंतर कोणतीही आंतर मशागतीची कामे करू नयेत, फक्त मोठे तण उपटून टाकावे म्हणजे शेंगा पोसण्याचे प्रमाण वाढेल.

तणनाशकाचा वापर : तणांचा नाश करण्यासाठी निंदणी आणि कोळपणीबरोबर पेरणीनंतर ४८ तासांच्या आत ओलीवर पेंडीमिथॅलिन ३० टक्के इसी या तणनाशकाची १ लि./हे. क्रियाशील घटक ५०० लि. पाणी या प्रमाणात फवारणी करावी. पेरणीनंतर २० दिवसांनी तण उगवणीनंतर इमॅझेथॅपीर १० टक्के एस.एल. या तणनाशकाची फवारणी ७५ मिलि. क्रियाशील घटक प्रति हेक्टरी ५०० लि. पाण्यातून फवारणी करावी.

कीड व रोग व्यवस्थापन : उन्हाळी हंगामात रोग व किडीचा प्रादुर्भाव कमी होतो. संरक्षणात्मक उपाय म्हणून ५ टक्के निंबोळी अर्क किंवा ॲझाडिरॅक्टीन २ मिलि./लि. पाणी या प्रमाणात फवारावे.

काढणी : भुईमुगाच्या शेंगा साधारणत: उन्हाळी हंगामात ११५-१२० दिवसात पक्व होतात. शेंगांचे टरफल टणक आणि टरफलाची आतील बाजू काळसर दिसू लागताच काढणी करावी. काढणीनंतर शेंगा चांगल्या वाळवाव्यात. हे उत्पादन बियाण्यासाठी वापरावयाचे असेल तर ह्या शेंगा सावलीत वाळवणे योग्य असते. त्यातील ओलाव्याचे प्रमाण ८-९ टक्के पर्यंत असावे.

उत्पादन : उन्हाळी भुईमुगाचे अधिक उत्पादन मिळविण्यासाठी सुधारित वाण आणि त्यानुसार मिळणाऱ्या  उत्पादनाची माहिती खालील तक्त्यात दिली आहे.

वाणाचे नाव पक्वतेचा कालावधी (दिवस) प्रकार सरासरी उत्पादन (क्विं.) दाण्यांचे शेंगाशी प्रमाण (%) शिफारशीत जिल्हे
एस.बी.११ ११५-१२० उपटी १५-२० ७५-७६ संपूर्ण महाराष्ट्र
टीएजी-२४ ११०-११५ उपटी ३०-३५ ७२-७४ संपूर्ण महाराष्ट्र
टीपीजी-४१ १२५-१३० उपटी २५-२८ ६६-६८ पश्चिम महाराष्ट्र, जळगाव, धुळे
जेएल-५०१ ११०-११५ उपटी ३०-३२ ६८-७० संपूर्ण महाराष्ट्रासाठी
आरएचआरजी ६०८३(फुले उन्नती) १२०-१२५ उपटी ३०-३५ ६८-७० संपूर्ण महाराष्ट्रासाठी
फुले भारती (जेएल ७७६) १२०-१२५ उपटी ३५-३८ ६५-७० संपूर्ण महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान

सुधारित पद्धतीने भुईमुगाची पेरणी, योग्य खतांचा वापर, आंतर मशागत, पाणी व्यवस्थापन आणि पीक संरक्षण केल्यास भुईमुगाच्या सुधारित वाणांपासून हेक्टरी ३०-३५ क्विंटल वाळलेल्या शेंगा त्याचप्रमाणे ४-५ टन सकस कोरडा पाला चारा म्हणून मिळतो. उन्हाळी हंगामात उत्पादकता जवळपास २५-३० क्विं/हे. इतकी आहे. देशातील एकूण भुईमूग उत्पन्नापैकी ८० टक्के तेलासाठी, १० टक्के प्रक्रिया करून खाण्यासाठी व १० टक्के निर्यातीसाठी वापरतात. किंबहुना दिवसेंदिवस तेलाची मागणी वाढत असल्याने शेतकऱ्यांना भुईमूग लागवड करणे फायदेशीर ठरत आहे.

समीक्षक : प्रमोद रसाळ