तीळ हे प्राचीन काळापासून घेतले जाणारे महत्त्वाचे तेलबिया पीक असून, कमी वेळात अधिक उत्पादन देणारे व जमिनीचा कस कायम राखून ठेवणारे पीक आहे. महाराष्ट्रात प्रामुख्याने जळगाव,धुळे, औरंगाबाद, बीड, लातूर व काही प्रमाणात उस्मानाबाद, नांदेड, परभणी, बुलढाणा व अकोला जिल्ह्यात खरीप हंगामात हे पीक घेतले जाते. चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धाच्या काही भागात अर्ध रब्बी हंगामात हे पीक घेतले जाते.
हवामान : पाऊस, त्याचे वितरण,तापमान व दिनमान – दिवसातील सूर्यप्रकाशाचा कालावधी – इत्यादी हवामानविषयक घटकांना तीळ हे पीक अतिशय संवेदनशील आहे. पीक वाढीच्या कालावधीत ६००-७०० मिमी. इतक्या पावसाचे वितरण चांगले झाल्यास हे पीक जिरायताखालीदेखील घेता येते. बियाण्याच्या चांगल्या उगवणीसाठी किमान तापमान १५० से.,पिकाच्या कायीक वाढीसाठी २५० ते २७० से., तर फूल व फळधारणेसाठी २६० ते ३२० से. तापमान लागते. तापमान ४००से.पेक्षा जास्त झाल्यास फुले गळून पडतात तसेच अति पाऊस झाल्यासही पिकाचे नुकसान होते.प्रकाशाचा कालावधी जास्त असल्यास बियाण्यातील तेलाचे प्रमाण वाढते, मात्र प्रथिनांचे प्रमाण कमी होते.
जमीन : हे पीक विविध प्रकारच्या जमिनीत येत असले तरी सुपीक व उत्तम निचरा असलेल्या मध्यम ते भारी जमिनीत पिकाची वाढ चांगली होते. वाळुमिश्रीत पोयट्याच्या जमिनीत पुरेसा ओलावा असल्यासदेखील पीक चांगले येते. जमिनीचा सामू (पी.एच.) उदासीनच्या जवळपास (५.५ ते ८.५) इतका असावा. परंतु निचरा न होणाऱ्या पाणथळ जमिनी या पिकाच्या लागवडीसाठी योग्य नाहीत.
पूर्वमशागत : तिळाचे बी बारीक असते तसेच तिळाच्या झाडाची सुरुवातीची वाढ फार हळू होते म्हणून जमिनीची पूर्वमशागत चांगली करून पृष्ठभागाचा थर सपाट, घट्ट व मऊ करावा. या पिकाची पेरणी करण्यासाठी एक नांगरट व दोन ते तीन कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. पावसाचे पाणी एकाच ठिकाणी साठून राहू नये, तसेच बियाण्यांची उगवण चांगली व्हावी यासाठी जमिनीवर लाकडी मैंद (फळी) फिरवून जमीन दाबून सपाट करून घ्यावी.
सुधारित जाती : प्रत्येक विभागाचे हवामान भिन्न असल्यामुळे ज्या जातींची शिफारस ज्या हंगामासाठी/विभागासाठी केलेली आहे, त्याच जातींची निवड करावी. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने खरीप हंगामासाठी शिफारस केलेल्या तिळाच्या जातींची ठळक वैशिष्ट्ये खालील तक्त्यात दिली आहेत.
अ.नं. | जात | कालावधी (दिवस) | उत्पादन (कि.ग्रॅ./हे.) | प्रमुख वैशिष्ट्ये |
१ | फुले तीळ नं. १ | ९०-९५ | ५००-६०० | पांढरा टपोरा दाणा, अर्ध रब्बी हंगाम सोडून संपूर्ण महाराष्ट्रासाठी शिफारस |
२ | तापी (जे.एल.टी.-२६) | ८०-८५ | ६००-७०० | पांढरा दाणा, खानदेश,पश्चिम महाराष्ट्र तसेच मराठवाड्यातील जालना व औरंगाबाद जिल्ह्यातील क्षेत्र |
३ | पद्मा (जे.एल.टी.-२६) | ७२-७८ | ६५०-७५० | दाण्याचा रंग फिक्कट तपकिरी, लवकर येणारी व दुबार पीक पद्धतीसाठी योग्य. जळगाव, धुळे, बुलढाणा व अकोला जिल्ह्यातील तिळाचे क्षेत्र. |
४ | जे.एल.टी-४०८ | ८१-८५ | ७००-८०० | पांढरा टपोरा दाणा, अधिक उत्पादन तेलाचे प्रमाण जास्त मुक्त स्निग्ध अम्लाचे प्रमाण कमी, हमखास पाऊस पडणाऱ्या खानदेश व आसपासच्या विदर्भ व मराठवाडा विभागातील क्षेत्र. |
बियाणे व बीज प्रक्रिया : तीळ पेरणीसाठी उत्तम प्रतीचे २.५ ते ३.० किग्रॅ. बियाणे प्रती हेक्टरी वापरावे. बियाण्यापासून व जमिनीमधून उद्भवणारे बुरशीजन्य रोग होऊ नये म्हणून थायरम ३ ग्रॅम किंवा बाविस्टीन २.५ ग्रॅम किंवा ट्रायकोडर्मा ४ ग्रॅम प्रती किलो बियाण्यास चोळावे व त्यानंतर ॲझेटोबॅक्टर २५० ग्रॅम प्रती १० किलो बियाण्यास लावावे.
पेरणी व विरळणी : स्थानिक पावसाचे प्रमाण व वितरण लक्षात घेता खरीप हंगामात जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पेरणी पूर्ण करावी. रब्बी हंगामात १५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर दरम्यान १५० से.पेक्षा जास्त तापमानास पेरणी करावी. पाभरीने पेरणी करताना बारीक वाळू अथवा चाळून घेतलेले शेणखत बियाण्याइतक्या प्रमाणात घेऊन बियाण्यात मिसळून पेरावे. त्यामुळे बियाणे एकसारख्या अंतरावर पडते. तसेच पेरणी करताना बियाणे २.५ सेंमी. पेक्षा जास्त खोलीवर पडल्यास उगवणीवर विपरीत परिणाम होतो. पेरणीनंतर ८ ते १० दिवसांनी पहिली विरळणी व १५ ते २० दिवसांनी दुसरी विरळणी करावी. पेरणीचे अंतर दोन ओळीत ४५ सेंमी. असल्यास विरळणी १० सेंमी. अंतर ठेवून करावी. आणि पेरणीचे अंतर दोन ओळीत ३० सेंमी. असल्यास विरळणी १५ सेंमी. अंतर ठेवून करावी. पिकाच्या योग्य वाढीसाठी व अधिक उत्पादनासाठी रोपांची संख्या साधारणपणे हेक्टरी २.२२ लाख इतकी ठेवावी.
खते : तीळ पिकास प्रती हेक्टरी १ टन एरंडी पेंड किंवा ५ टन शेणखत कुळवाच्या शेवटच्या पाळी अगोदर जमिनीत चांगले मिसळून द्यावे. रासायनिक खतांपैकी प्रती हेक्टरी ५० किलो नत्र (१०८ किलो यूरिया) समान हप्त्यात द्यावे. लवकर येणाऱ्या जातीस नत्राचा पहिला २५ किलोचा हप्ता (५४ किलो यूरिया) पेरणीच्या वेळी व दुसरा २५ किलोचा हप्ता (५४ किलो यूरिया) पेरणीनंतर तीन आठवड्यांनी द्यावा. तर मध्य उशिरा ते उशिरा येणाऱ्या जातीसाठी २५ किलो नत्र (५४ किलो यूरिया) पेरणीनंतर ३ आठवड्यापर्यंत व २५ किलो नत्र (५४ किलो यूरिया) पेरणीनंतर ६ आठवड्यांनी द्यावा.
आंतर मशागत : सुरुवातीस तीळ पिकाची वाढ हळू होते म्हणून जमिनीतील ओलावा व अन्नद्रव्यासाठी तणांबरोबर स्पर्धा करू शकत नाही. झाडाच्या तंतुमुळ्या जमिनीच्या पृष्ठभागावर वाढत असल्यामुळे खोल आंतर मशागत केल्यास मुळांना इजा होते म्हणून पीक लहान असतानाच आंतर मशागत करावी.
तणांचा बंदोबस्त करण्यासाठी पेरणीनंतर १५-२० दिवसांनी पहिली निंदणी व कोळपणी व पेरणीनंतर ३० ते ३५ दिवसांनी दुसरी निंदणी व कोळपणी करून तिळाचे क्षेत्र तणविरहीत ठेवावे. आंतर मशागतीमुळे तणांचे नियंत्रण तर होतेच, शिवाय पावसाचे पाणी जमिनीत मुरते व जमिनीत हवा खेळती राहते, त्यामुळे मुळांची वाढ चांगली होऊन पीक जोमदार वाढते.
आंतर पीक पद्धत : सलग तिळाचे पीक घेण्याऐवजी तीळ व तुरीचे आंतर पीक (४:२ या प्रमाणात) घेतल्यास आर्थिक फायदा जास्त होतो.
दुबार पीक : खरीप हंगामातील तीळ पिकानंतर रब्बी हंगामात करडई, हरभरा अथवा रब्बी ज्वारी ही पिके घेतल्यास दोन्ही पिके मिळून उत्पादन व आर्थिक फायदा जास्त होतो.
पाणी व्यवस्थापन : तिळाचे पीक पाण्याचा ताण (अवर्षण) सहन करणार असले तरी बियाणे उगवणीसाठी रोप अवस्थेत पुरेसा ओलावा असणे जरूरीचे असते. तिळाच्या फुलधारणेच्या व बोंडे वाढीच्या कालावधीत आवश्यकतेनुसार पाण्याची एक पाळी पीक फुलावर असताना व दुसरी बोंडे वाढीच्या अवस्थेत द्यावी.
पीक संरक्षण : किडी : तीळ पिकावर प्रामुख्याने पाने गुंडाळणारी अळी, पाने खाणारी अळी व गादमाशी या किडींचा प्रादुर्भाव होतो साधारणपणे या किडींमुळे पिकाचे २०-३५ टक्के नुकसान होते.
कीड नियंत्रणाचे उपाय :
- उन्हाळ्यात खोल नांगरट केल्यास किडींचे कोष उघडे पडून पक्षी ते खातात.
- कीडग्रस्त झाडे / झाडांचे भाग तोडून / अळ्या गोळा करून नष्ट कराव्यात.
- पाच टक्के कडुनिंबाच्या अर्काच्या पेरणीनंतर १५ दिवसांच्या अंतराने आवश्यकतेनुसार २-३ फवारण्या कराव्यात.
- क्विनॉलफॉस (२५ ईसी) १००० मिलि. प्रती हेक्टरी किंवा क्लोरोपायरीफॉस ५०० लि. पाण्यात मिसळून पेरणीनंतर ३०, ४५ व ६० दिवसांनी फवारण्या कराव्यात.
रोग : तीळ पिकावर खालीलप्रमाणे रोग दिसून येतात.
- मूळ व खोड कुजव्या : या रोगामुळे सुरुवातीस तिळाचे खोड जमिनीलगत तांबडे पडते. खोडावर काळसर पुरळे पसरतात. खोड चिरले जाऊन झाड जमिनीपासून १ ते १.५ फुटावर कोलमडते. खोडाची व मुळाची साल काढून पाहिल्यास बुरशीची वाढ दिसून येते.
- पानांवरील ठिपके : हा रोग तीळ पिकावर नियमित आढळून येतो. सुरुवातीला पानाच्या दोन्ही बाजूंवर अल्टरनॅरिया व सरकोस्पोरा बुरशीचे फिक्कट तपकिरी ठिपके गोलाकार / अनियमित आकाराचे असतात. नंतर ते एकमेकात मिसळून पानांवर पसरतात व पाने करपून गळून पडतात.
- मर : हा रोग कोलिओट्रायकम व फ्युजॅरीअम बुरशीमुळे होतो. झाडावरील बोंडे पक्व होण्यापूर्वीच झाडे मरतात.
- पर्णगुच्छ : हा रोग मायकोप्लाझमा सारख्या विषाणूमुळे होतो. रोगाचा प्रसार तुडतुड्यांमार्फत होतो. जोपर्यंत पीक फुलोऱ्यात येत नाही तोपर्यंत या रोगाची लक्षणे दिसून येत नाहीत. पीक फुलोऱ्यात असताना फुलाचे रूपांतर बारीक पानांत होऊन त्याचा गुच्छ तयार होतो.
- भुरी : झाडाच्या पानांवर पांढरी भुकटी पसरल्यासारखी दिसते. पाने पिवळसर होऊन गळतात.
काढणी व मळणी : पीक पक्व झाल्यावर बियांची गळ होऊन होणारे नुकसान टाळण्यासाठी झाडावरील साधारणपणे ७५ टक्के पाने/बोंडे पिवळसर दिसू लागल्यावर पिकाची कापणी करावी.कापणी झाल्यावर पेंड्या ताडपत्रीवर उलट्या करून बियाण्याची झटकणी करावी. नंतर बियाणे ऊफणणी करून स्वच्छ करावे व चांगले वाळवून साठवावे.
उत्पादन : तीळ हे पीक प्रामुख्याने जिरायताखालील वरकस जमिनीत घेण्यात येते. पावसाचा अनियमितपणा, सुधारित जाती व लागवडीच्या सुधारित तंत्र वापराचा अभाव यांमुळे तिळाचे उत्पादन कमी होते. सुधारित तंत्रज्ञान वापरून तीळ पिकाची लागवड केल्यास जिरायत पिकाचे ६००-७०० किग्रॅ. प्रती हेक्टरी उत्पादन मिळू शकते.
संदर्भ :
- Joshi,A.B.Sesamum,Hyderabad,1961.
- शेतकरी मासिक,तीळ पिकाची सुधारित लागवड,जून २०१८.
- श्री सुगी खरीप त्रैमासिक,तीळ लागवड तंत्रज्ञान,जून २०१८.
समीक्षक – भीमराव उल्मेक