संयुक्त राष्ट्रांचा मुख्य प्रशासकीय अधिकारी. संयुक्त राष्ट्रांच्या सनदेच्या कलम ७ नुसार सचिवालय हा संयुक्त राष्ट्रांच्या सहा प्रमुख घटकांपैकी एक घटक (Organ) आहे. सचिवालयात महासचिव आणि इतर पदाधिकाऱ्यांचा समावेश होतो. सुरक्षा परिषद महासचिवपदासाठी नामनिर्देशन करते. या प्रक्रियेत सुरक्षा परिषदेचे स्थायी सभासद असलेल्या पाच देशांना नकाराधिकार असतो. नकाराधिकारामुळे नेमणुकीस राजकीय रंग येतो. नेमला जाणारा उमेदवार हा स्थायी सदस्यदेशांचा नसावा, असा संकेत आहे. सुरक्षा परिषदेतून सुचवल्या गेलेल्या नावांवर आमसभेत मतदान होते. आमसभा दोनतृतीयांश बहुमताने महासचिवाची निवड करते. संयुक्त राष्ट्रांच्या सनदेमध्ये महासचिवांचा कार्यकाळ नमूद केलेला नाही. आमसभेने एका ठरावाद्वारे पाच वर्षे हा कार्यकाळ निश्चित केला असून त्यात पुनर्नेमणुकीची तरतूदही केली आहे.

महासचिवांची कार्ये :

  • संयुक्त राष्ट्र संघटनेचे सर्व सभासददेश आणि संलग्न संस्था यांच्यामधील मुख्य दुवा म्हणून काम करणे.
  • संघटनेच्या विषयपत्रिकेत अग्रक्रमावर असलेल्या विषयांबाबत सर्व राष्ट्रप्रमुखांशी चर्चाविनिमय करणे.
  • संघटनेच्या कार्यप्रणालीचा लेखाजोखा मांडणारा आणि अपेक्षित सुधारणांची शिफारस करणारा वार्षिक अहवाल आमसभेपुढे सादर करणे. उदा., बुट्रोस बुट्रोस घाली यांनी मांडलेला ‘अजेन्डा फॉर पीस’ हा अहवाल.
  • आमसभेपुढे वार्षिक अंदाजपत्रक सादर करणे.
  • सचिवालयीन अधिकाऱ्यांची नियुक्ती करणे.
  • आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेस धोका पोहोचवू शकणारी कोणतीही बाब सुरक्षा मंडळाच्या नजरेस आणून देणे.
  • आंतरराष्ट्रीय विवादांवर वेळीच प्रतिबंध घालणे आणि संभाव्य विवाद टाळणे.
  • सभासद देश आणि सचिवालयाप्रती असलेल्या उत्तरदायित्वाची अंमलबजावणी करणे.

महासचिवांना त्यांच्या कामकाजात उपमहासचिव (Deputy Secretary-General), अव्वर महासचिव (Undersecretary-General), साहाय्यक महासचिव (Assistant Secretary-General) यांचे सहकार्य लाभते. उपमहासचिवांच्या पदाची निर्मिती १९९७ साली कोफी अन्नान यांनी केली. उपमहासचिव आणि साहाय्यक महासचिव यांची नेमणूक महासचिव स्वत: करतात, तर अव्वर महासचिव यांची नेमणूक ४ वर्षांच्या कार्यकाळासाठी महासचिवांच्या सल्ल्याने आमसभा करते. नायजेरियाच्या अमीना जे. मोहम्मद या सध्या संयुक्त राष्ट्रांच्या उपमहासचिव आहेत. भारताचे सत्या एस. त्रिपाठी यांची ऑगस्ट २०१८ मध्ये साहाय्यक महासचिव (आणि संयुक्त राष्ट्रांच्या वातावरण बदलविषयक कार्यक्रमाच्या–UNEP–न्यूयॉर्क कार्यालयाचे प्रमुख) म्हणून नेमणूक झाली आहे. तसेच भारताचे शशी थरूर यांनी २००१ ते २००६ दरम्यान संयुक्त राष्ट्रांचे अव्वर महासचिव म्हणून काम पाहिले होते.

याचसोबत भविष्यात उद्भवणाऱ्या आव्हानांसंबंधी धोरणांचे आयोजन आणि माहितीची देवाणघेवाण व्हावी यासाठी ‘वरिष्ठ व्यवस्थापन संघाची’ स्थापना करण्यात आली. हा विभाग महासचिवांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त राष्ट्र संघटनेच्या अनेक घटक, संलग्न संस्था, कार्यालये आणि कार्यक्रम यांच्यात समन्वय साधण्याची भूमिका बजावतो.

आंतरराष्ट्रीय राजकारणात संयुक्त राष्ट्र संघटनेचे एक स्वतंत्र आणि स्वायत्त स्थान निर्माण करण्यात आजवरच्या सर्व महासचिवांचे मोठे योगदान आहे. गेल्या सत्तरहून अधिक वर्षांत संघटनेच्या कराराच्या चौकटीत राहून, स्वतःच्या मुत्सद्दी आणि व्यवस्थापकीय कौशल्यांच्या साहाय्याने सामर्थ्य, सामग्री आणि अधिकारक्षेत्राचा सुयोग्य वापर बहुतेक महासचिवांनी केला आहे. सध्याच्या काळात देशांच्या भौगोलिक सीमांचे वाद, जागतिक व्यापारावर येणारी बंधने, आर्थिक विषमता, शाश्वत विकासाच्या कार्यक्रमाची अंमलबजावणी, जागतिक तापमानवाढ, निर्वासित-निराश्रितांचे प्रश्न, मानवी हक्कांचे उल्लंघन, स्त्रियांसंबंधित हिंसा, संघटनेतील प्रस्तावित सुधारणा अशी अनेक आव्हाने महासचिवांसमोर आहेत.

आजतागायत होऊन गेलेल्या महासचिवांनी केलेल्या प्रमुख कामांची माहिती खालील तक्त्यात दिली आहे :

नाव आणि कार्यकाळ

महत्त्वाची माहिती/कार्ये

ट्रिग्वे ली (नॉर्वे)

१-२-१९४६ ते १०-४-१९५३

  • कोरियन युद्धाच्या वेळेस अमेरिका आणि सोव्हिएट युनियन या दोन्ही गटांकडून टीका.
  • बर्लिनच्या नाकेबंदीत वाटाघाटी घडवून आणण्यात अपयश. सोव्हिएटने इराणमधून माघार घेण्यासाठी आणि काश्मीरमधील युद्धविरामासाठी प्रयत्नशील.
डाग हामारशल्ड (स्वीडन)

१०-४-१९५३ ते १०-९-१९६१

  • प्रतिबंधक राजनयाच्या संकल्पनेचे उद्गाते.
  • सुएझ, लेबनॉन आणि काँगो युद्धांसमयी या संकल्पनेचा अवलंब.
  • संयुक्त राष्ट्र संघटनेच्या शांती सैन्याचे निर्माते.
  • यांच्या सक्रियतेने धास्तावलेल्या सोव्हिएट युनियनने ‘ट्रॉयका योजना’ सुचविली; ज्याद्वारे एकाऐवजी ३ महासचिवांची नेमणूक करण्याचा प्रस्ताव मांडला गेला.
उ थांट (म्यानमार)

३-११-१९६१ ते ३०-११-१९६२ (प्रभारी)

३०-११-१९६२ ते ३१-१२-१९७१

  • क्युबा क्षेपणास्त्र युद्धप्रसंग, ६ दिवसीय आखाती युद्ध, त्याचप्रमाणे सायप्रस, व्हिएटनाम, येमेन, बहारिन येथे उद्भवलेल्या युद्धसमयी शांततानिर्मिती आणि शांतताउभारणी यासाठी प्रयत्नशीलता.
  • वेस्ट न्यू गिनीच्या प्रश्नात स्वतंत्र भूमिका.
  • संयुक्त राष्ट्रे भारत-पाकिस्तान निरीक्षण मंडळाचा प्रस्ताव.
  • गाझा पट्टीमधून संयुक्त राष्ट्रे आणीबाणी सैन्याने माघार घेतल्याप्रकरणी टीका.
कुर्ट वाल्डहाइम (ऑस्ट्रिया)

१-१-१९७२ ते ३१-१२-१९८१

  • आपत्ती व्यवस्थापन आणि जागतिक पर्यावरणीय समस्यांवर काम.
  • यांच्या कारकिर्दीत मानवी पर्यावरणावरील संयुक्त राष्ट्रांची शिखर परिषद पार पडली.
  • अमेरिकेचे व्हिएटनाममधील बॉम्बहल्ले, लेबनॉनमधील युद्धविराम आणि ‘ऑपरेशन एंटेबे’ या आणीबाणीच्या परिस्थितीत ठाम भूमिका.
  • सायप्रसचे विभाजन, व्हिएटनाम आणि कंबोडियामधील विस्थापितांचे प्रश्न यात निर्णायक कामगिरी.
 

झेव्हियर पेरेझ-द-क्युलर (पेरू)

१-१-१९८२ ते ३१-१२-१९९१

  • कंबोडिया, नामिबिया, एल साल्व्हादोर येथे शांतताउभारणीचे कार्य.
  • व्हेनेझुएला आणि गुयाना यांच्यातील वादात, आखाती युद्धात तसेच फॉकलँड युद्धात मध्यस्थी.
  • काबूल आणि तेहरान येथे ‘फॅक्ट फाइंडींग मिशन’ पाठवले.
  • पर्यावरण आणि विकास यावरील जागतिक आयोगाची स्थापना.
  • ‘रेनबो वॉरीयर अफेयर’मध्ये लवादाची भूमिका.
  • पी-५ मध्ये ‘क्वायट डिप्लोमसी’ या संकल्पनेची सुरुवात.
 

बुट्रोस बुट्रोस घाली (ईजिप्त)

१-१-१९९२ ते ३१-१२-१९९६

  • रवांडा मानवसंहार, युगोस्लाव्ह आणि अंगोला युद्ध, सोमालिया युद्ध यांबाबत संयुक्त राष्ट्रांच्या भूमिकेवरून टीका.
  • बोस्निया, कंबोडिया, हैती येथील युद्धपरिस्थितीत निर्णायक भूमिका.
  • ‘अजेन्डा फॉर पीस’ हा संघटनेच्या परिवर्तनासाठीचा अहवाल. सचिवालयात संरचनात्मक बदल.
  • सोव्हिएट प्रजासत्ताकांमध्ये हंगामी कार्यालयांची स्थापना.
 

कोफी अन्नान (घाना)

१-१-१९९७ ते ३१-१२-२००६

  • अमेरिकेच्या इराकमधील युद्धात इराककडून निःशस्त्रीकरणाची सुनिश्चिती.
  • अमेरिकेच्या अफगाणिस्तानातील युद्धाबद्दल संयुक्त राष्ट्रांच्या भूमिकेवरून टीका.
  • ‘ऑइल फॉर फूड योजने’मधील भ्रष्टाचारावरून ताशेरे ओढले गेले.
  • रवांडामधील संघटनेच्या अपयशावरून टीका.
  • शांतता उभारणी आयोगाची निर्मिती आणि मानवतावादी हस्तक्षेपाचे प्रयत्न.
  • कोसोवोमध्ये नाटोच्या कारवाईवरून टीका.
  • ‘वुई द पीपल’ हा अहवाल सादर.
  • ‘ग्लोबल कॉम्पॅक्ट’ची पायाभरणी.
  • शांततेसाठीचे नोबेलविजेते.
  • सर्व मानवी हक्कांशी संलग्न कार्यक्रमांचे मानवी हक्कांच्या उच्चायुक्त कार्यालयात विलीनीकरण.
  • सचिवालयातील अधिकाऱ्यांच्या संख्येत घट.
  • संघटनेच्या विकाससंलग्न संस्था आणि कार्यक्रम यांचा यूएन हाउसच्या अखत्यारीअंतर्गत समन्वय.
  • मानवतावादी विषय, शांतता आणि सुरक्षा, विकासाशी संलग्न विषय, आर्थिक आणि सामाजिक विषय अशा ४ विभागांत संघटनेच्या सर्व विभागांची पुनर्विभागणी.
 

बान की मून (दक्षिण कोरिया)

१-१-२००७ ते ३१-१२-२०१६

  • सैन्याच्या शांततानिर्मिती संदर्भातील हालचालींवर नियंत्रण ठेवणे आणि शस्त्रांवर प्रत्यक्ष नियंत्रण अशा दोन विभागांत शांततानिर्मितीचे कामकाज विभागले जावे या संदर्भातला प्रस्ताव.
  • यांच्या कारकिर्दीत मानवसंहार करणाऱ्या अस्त्रांची वृद्धी, इराणच्या निवडणुकांमधील हिंसा, सीरिया आणि युक्रेनमधील युद्धजन्य परिस्थिती, सौदी-येमेन आणि इझ्राएल-पॅलेस्टाइन संघर्ष, लिबिया आणि श्रीलंकेतील युद्ध, दक्षिण ओसेशियामधील तसेच दरफूरमधील आणीबाणीची परिस्थिती यात संघटनेला आलेल्या अपयशावरून टीका.
  • तैवानला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता देण्यावरून वाद.
  • जागतिक मानवतावादी शिखर परिषदेचे आयोजन. तृतीयपंथीयांच्या हक्कांसाठी कार्य.
  • अरब स्प्रिंगमध्ये संघटनेचा लोकशाहीकरणासाठी सक्रिय पाठिंबा.
अंतोनियो गुतेरेस (पोर्तुगाल)

१-१-२०१७ ते चालू

  • आंतरराष्ट्रीय वाटाघाटींमध्ये मध्यस्थीसाठी सल्लागार समितीची स्थापना.
  • जागतिक बँक यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पाथवेज टू पीस’ या अभ्यासपत्रिकेची निर्मिती.
  • अद्दीस अबाबा ॲक्शन अजेन्डाची अंमलबजावणी.
  • साहेल सपोर्ट प्लॅनच्या अंतर्गत आफ्रिकेत विकासपूरक प्रकल्प. डिजिटल कोऑपरेशनसाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना. मुख्यालय व्यवस्थापन आणि संलग्न संस्थांचे दोन नवीन विभागांत पुनर्वर्गीकरण-

१. योजना, धोरणे आणि मान्यतेसंदर्भातील विषयांचे मार्गदर्शन.

२.विविध कृती आणि  व्यवहार यांसंदर्भात सचिवालयास माहिती पुरविणे.

  • न्यू फंडिंग कॉम्पॅक्टद्वारे निधिसंकलनाच्या कार्यास पुनरुज्जीवन.
  • संघटनेच्या निवासी समन्वयक व्यवस्थेचे पुनरुत्थान.

 

संदर्भ :

  • Armstrong, David; Lioyd, Lorna; Redmond, John, International Organization in the World Politics, New York, 2013.
  • Baylis, John; Smith, Steve; Owens, Patricia Eds. The Globalization of World Politics : An Introduction to International Relations, Oxford, 2011.
  • Ghosh, Peu, International Relations, 2013.
  • Mingst, Karen; Karns, Margaret; Lyon, Alynna, The United Nations in the 21st Century : Dilemmas in World Politics, Boulder, 2011.
  • सहस्रबुद्धे, उत्तरा; पेंडसे, अरुणा, आंतरराष्ट्रीय संबंध : शीतयुधोत्तर जागतिकीकरणाचे राजकारण, 
  • www.un.org

समीक्षक : उत्तरा सहस्रबुद्धे