आपले मित्र, नातेवाईक, परिचित व्यक्ती यांना आपण मनोमन ओळखतो आणि म्हणतो की, ही तीच व्यक्ती आहे, जी माझ्याबरोबर शिकत होती; परंतु आपल्या अशा म्हणण्याला कोणता आधार असतो? त्या व्यक्तीला जेव्हा आपण प्रथम भेटलो होतो आणि आता बऱ्याच कालावधीनंतर जेव्हा ती व्यक्ती आपल्याला भेटते, तेव्हा तिच्यात शारीरिक तसेच इतरही अनेक बदल झालेले असतात. तरीदेखील कशाच्या आधारे आपण ही तीच व्यक्ती आहे असे म्हणतो? थोडक्यात, व्यक्तीत आंतरिक व बाह्य स्वरूपाचे सातत्याने होणारे बदल लक्षात येऊनही ती व्यक्ती तीच आहे असे आपण कशाच्या आधारे म्हणतो, असा प्रश्न निर्माण होतो. हीच व्यक्तीच्या तदेवतेची समस्या आहे.

एक प्रातिनिधिक चित्र

तत्+एव म्हणजे तदेव. तत् म्हणजे ‘ते’ आणि एव म्हणजे ‘च’ असा अर्थ होतो. म्हणून तदेव म्हणजे ‘तेच’ असणे. थोडक्यात, व्यक्तीची तदेवता म्हणजे ‘ती व्यक्ती तीच असणे’ होय. दैनंदिन व्यावहारिक जीवनात सातत्याने बदल होताना आपल्याला दिसतात. व्यक्तीमध्येदेखील बाह्य स्वरूपाचे शारीरिक बदल झालेले आपल्याला दिसतात. तसेच स्वभाव, प्रवृत्ती, विचार यांच्यातही बदल होत असतात. त्यामुळे ती व्यक्ती तीच आहे का, असा प्रश्न साहजिकच निर्माण होतो.

काही विचारवंतांच्या मते व्यक्तीची तदेवता ही काही वास्तविक समस्या नाही; कारण व्यक्तीची तदेवता या नावाची कोणतीही गोष्ट वास्तवात नसते. कुणीही व्यक्ती एक क्षणदेखील तीच व्यक्ती राहू शकत नाही; कारण क्षणाक्षणाला तिच्यात परिवर्तन होत असते. व्यक्तीमध्ये होत असणाऱ्या बदलांचे स्वरूप लक्षात घेऊनही आपण ही तीच व्यक्ती आहे असे म्हणतो; परंतु काही विचारवंत हा आपला भ्रम आहे, असे मानतात. बदल आणि तेचपण हे एकाचवेळी बरोबरीने चालू शकणार नाही. एखाद्या वस्तूत किंवा एखाद्या गोष्टीत बरेचसे बदल होऊनही ती तीच आहे, असे म्हणणे भ्रामक आहे; परंतु अशा प्रकारच्या दृष्टिकोनाच्या बाबतीत तार्किक पातळीवर कितीही तथ्य असले, तरी व्यक्तीच्या तदेवतेच्या समस्येच्या विवेचनाच्या संदर्भात बहुतांश विचारवंत असे मानतात की, व्यक्तीत शारीरिक तसेच अन्य स्वरूपाचे बदल होऊनही त्या व्यक्तीला ती तीच व्यक्ती आहे, असे मानण्याच्या पाठीमागे एक अर्थपूर्णता आहे आणि म्हणूनच एका वेगळ्या अर्थाने परिवर्तन आणि तदेवता येथे बरोबर चालताना आपल्याला दिसतात. त्यासाठी ज्याच्या आधारे आपण ती व्यक्ती तीच आहे हे जाणतो, ते निकष निश्चित करण्याची आवश्यकता आहे.

या संदर्भात सामान्यपणे शारीरिक निरंतरता आणि स्मृती या दोन निकषांची चर्चा करणे आवश्यक ठरते.

१) शारीरिक निरंतरता : काही बदलांसकट एकाच शरीराचे सातत्य कायम राहणे ही व्यक्तीच्या तदेवतेची सर्वाधिक मान्यताप्राप्त ओळख आहे. एका व्यक्तीची शारीरिक स्थिती बालपणापासून वृद्धावस्थेपर्यंत मोठ्या प्रमाणावर बदलत असते. तरीदेखील त्यात एकप्रकारची शारीरिक निरंतरता कायम असते. त्यामुळे आपण असे म्हणतो की, व्यक्तीच्या शारीरिक स्थितीत बऱ्याच प्रकारचे बदल होऊनही तिच्या शरीरात सातत्य आहे आणि त्याच आधारावर ती व्यक्ती तीच आहे, असे आपण म्हणतो. एक वृक्ष सुरुवातीला एका छोट्याशा रोपट्याच्या रूपात असतो. नंतर हळूहळू अनेक फांद्या उपफांद्या त्याला फुटतात व एक विशाल रूप तो वृक्ष धारण करतो; परंतु भौतिक निरंतरतेमुळे आपण तो तोच वृक्ष आहे, असे म्हणतो. अशाच प्रकारे कोणत्याही व्यक्तीची ओळख त्याच व्यक्तीच्या रूपात करण्यात तिच्या शारीरिक निरंतरतेचा प्रमुख वाटा असतो.

व्यक्तीच्या मानसिक व वैचारिक स्थितीत अनेक बदल होतात. उदा., पूर्वीच्या साऱ्या गोष्टी तो विसरून जातो किंवा त्याच्या स्वभावात इतका बदल होतो की, एक दुराचारी असलेली व्यक्ती सज्जन बनते. तरीदेखील शारीरिक सातत्यामुळे आपण असे मानतो की, ती तीच व्यक्ती आहे. तिच्या मानसिक व वैचारिक बदलांकडे पाहून कधीकधी आपण असे म्हणतो की, ती व्यक्ती आता ती राहिली नाही; परंतु असे म्हणण्याचे तात्पर्य हे असते की, त्या व्यक्तीच्या स्वभावात इतके बदल झाले आहेत की, ती व्यक्ती ती आहे असे वाटत नाही आणि असे मानण्याचा निश्चित आधार तिची शारीरिक निरंतरता हाच असतो.

दैनंदिन जीवनात अशी अनेक उदाहरणे आपल्याला दिसतात, किंबहुना दिसण्याची शक्यता असते की, ज्यांच्या बाबतीत शारीरिक निरंतरतेला व्यक्तीच्या तदेवतेची कसोटी म्हणून आपण मानू शकत नाही. किंबहुना एकमात्र कसोटी तर निश्चितच मानू शकत नाही. काही अशी उदाहरणेही आपल्याला दिसतात की, ज्यांत शारीरिक निरंतरता असते आणि संबंधित व्यक्तीच्या बाबतीत ती तीच व्यक्ती आहे, असे आपण म्हणतो; परंतु केवळ शारीरिक निरंतरतेच्या आधारे ती व्यक्ती तीच आहे, असे म्हणण्यास आपण फारसे उत्सुक नसतो. इतर काही गोष्टीदेखील त्यात साहाय्यक ठरतात. याउलट, काही उदाहरणे अशी दिसतात की, ज्यात शारीरिक निरंतरता कायम नसूनही ती व्यक्ती तीच आहे, असे म्हणणे आपल्याला भाग पडते. अशा उदाहरणांच्या बाबतीत व्यक्तीच्या तदेवतेचा आधार निश्चितपणे वेगळा असतो. अशा संदर्भात स्मृतीची भूमिका महत्त्वाची ठरते. व्यक्तीच्या तदेवतेचे निकष ठरविताना शारीरिक निरंतरता आणि स्मृती यांपैकी कोणता निकष मूलभूत आहे, हा प्रश्न विवादास्पद आहे. दोन्हीही निकष आपापल्या जागी महत्त्वपूर्ण आहेत की, दोहोंपैकी एक अनिवार्य आहे? तसेच कोणता पर्याप्त आहे किंवा दोन्ही आवश्यक आहेत? या विवादास्पद प्रश्नांची चर्चा करण्यापूर्वी केवळ शारीरिक निरंतरता ही व्यक्तीच्या तदेवतेची एकमात्र कसोटी ठरू शकत नाही, हे स्पष्ट करणे आवश्यक आहे. उदा., एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो. तिच्या शरीराला अग्नी दिला जातो, परंतु त्याच क्षणी दुसऱ्या एखाद्या ठिकाणी अगदी तशीच एखादी व्यक्ती प्रकट होते आणि जे लोक मृत व्यक्तीशी पूर्वपरिचित होते, ते म्हणतात की, ही नवीन व्यक्ती तीच व्यक्ती आहे. येथे शारीरिक निरंतरतेचा प्रश्न उद्भवत नाही. त्यामुळे कोणत्या आधारावर या नवीन व्यक्तीला तीच व्यक्ती मानतात? मृत व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाशी समान असलेल्या काही वैशिष्ट्यांमुळे तसेच त्या व्यक्तीची स्मृती की जी मृत व्यक्तीच्या स्मृतीशी मिळतीजुळती आहे, या आधारे ती व्यक्ती तीच असावी, असे म्हटले जाते. या ठिकाणी व्यक्तीच्या तदेवतेसाठी जाणिवेची निरंतरता हा मूलभूत आधार दिसतो; कारण व्यक्तीचे वर्तमान शरीर निश्चितपणे अलग आहे आणि त्यामुळे शारीरिक निरंतरतेचा प्रश्न निर्माण होत नाही.

२) स्मृती : काही लोक जाणिवेच्या निरंतरतेचा आधार आत्म्याचे अमरत्व मानतात. त्यांच्या मते प्रत्येक व्यक्तीत साररूपात आत्मा अंतर्निहित असतो. आत्मा शरीराबरोबर नष्ट होत नाही, तर शरीर मृत झाल्यावर दुसरे शरीर धारण करतो. म्हणून वस्तुतः त्यांच्या मते अमर आणि अपरिवर्तनशील आत्मा व्यक्तीच्या तदेवतेचा आधार असून तो जाणिवेच्या निरंतरतेचा आधार आहे; परंतु अनुभवाच्या पातळीवर अशा कोणत्याही गूढ, रहस्यमय सत्तेचे ज्ञान आपल्याला होत नाही आणि त्याचा स्वीकार केल्यामुळे समस्या सुटण्याऐवजी त्या अधिक गुंतागुंतीच्या होतात. अनुभवाच्या पातळीवर जाणिवेच्या निरंतरतेचा आधार स्मृती आहे. जर आपण आपल्या वर्तमान जीवनाची किंवा तथाकथित एखाद्या पूर्व जीवनाची व्यवस्थित रीतीने आठवण करू शकत असू, तर आपल्या आठवणीत निरंतरता आहे, असे म्हणता येऊ शकेल. म्हणून व्यक्तीच्या तदेवतेची कसोटी स्मृतीच्या रूपात स्वीकारली जाते. काही लोक असे मानतात की, ज्या ठिकाणी शारीरिक निरंतरता हा व्यक्तीच्या तदेवतेचा आधार होऊ शकत नाही, अशा बाबतीत स्मृती हा आधार बनतो. काही लोक असेदेखील मानतात की, शारीरिक निरंतरता हा व्यक्तीच्या तदेवतेचा मूलभूत आधार नसून स्मृती हाच केवळ व्यक्तीच्या तदेवतेचा मूलभूत आधार आहे. लॉकसारखे काही विचारवंत तर स्मृती हाच व्यक्तीच्या तदेवतेचा एकमात्र निकष मान्य करतात. लॉकच्या मते, प्रत्येक व्यक्तीचे मन नावाचे नित्यद्रव्य आहे आणि जे जाणिवेच्या निरंतरतेचा आधार आहे आणि जाणिवेची ही निरंतरता व्यक्तीला तिची स्वतःची वैशिष्ट्यपूर्ण अशी ओळख देत असते. शरीरात बदल होऊ शकतो; परंतु जाणिवेच्या निरंतरतेच्या आधारे एखादी व्यक्ती तीच आहे, असे आपण मानतो. जाणिवेच्या निरंतरतेची अभिव्यक्ती अनुभवाच्या पातळीवर स्मृतीच्या माध्यमातून होते. म्हणून स्मृती हाच व्यक्तीच्या तदेवतेचा वास्तविक निकष आहे. लॉक या संदर्भात मनुष्य आणि व्यक्ती यांत भेद करतात. त्याच्या मते मनुष्य हा केवळ एक जिवंत प्राणी असून त्याची ओळख शारीरिक ठेवणीवरून होते; परंतु व्यक्ती हा एक विचारशील प्राणी असून त्याच्यात तर्कबुद्धी आणि विवेचन या क्षमता आहेत. तसेच तो भिन्न काळात आणि परिस्थितीत स्वतःला एक विचारशील प्राणी म्हणून पाहतो आणि असे तो केवळ जाणिवेच्या बळावरच करू शकतो, जे त्याचे सारतत्त्व आहे. लॉकच्या मते व्यक्ती नैतिक दृष्ट्या जबाबदार असण्याची दोन अनिवार्य लक्षणे आहेत. एक, व्यक्ती जे काही कार्य करते, ते करताना ती जाणिवपूर्वक करीत असली पाहिजे आणि दोन, ते कार्य केल्यानंतर तिला त्याचे पारितोषिक किंवा शिक्षा मिळते, तेव्हा तिला या गोष्टीची आठवण असायला हवी की, हे काम मीच केलेले आहे. एखाद्या व्यक्तीला ती तीच व्यक्ती आहे असे आपण म्हणतो, तेव्हा विशिष्ट कार्यासाठी ती उत्तरदायी ठरते आणि त्यासाठी आपण हे काम केले होते, याचे स्मरण त्या व्यक्तीला होणे अनिवार्य आहे. जर व्यक्तीला असे स्मरण होत नसेल, तर त्या व्यक्तीला त्या कार्यासाठी उत्तरदायी ठरविता येणार नाही. म्हणून एखादी व्यक्ती तीच व्यक्ती आहे, हे जाणण्याचा एकमात्र निकष तिच्या जाणिवेची निरंतरता म्हणजेच स्मृती हा आहे. मनुष्याच्या ओळखीसाठी शरीर हा निकष ठरू शकतो; परंतु व्यक्तीची ओळख शरीरापेक्षा स्मृतिद्वारेच होत असते.

परंतु स्मृतीला व्यक्तीच्या तदेवतेचा एकमात्र निकष मानण्यातून अनेक अडचणी निर्माण होतात. स्मृती स्वतःच स्वतःवर आधारित असू शकत नाही. स्मरण करणारा कोणीतरी असावा लागतो. म्हणून शारीरिक निरंतरता जाणिवेच्या निरंतरतेची किंवा स्मृतीची पूर्वअट ठरते.

स्मृतीच्या बाबतीत निर्माण होणाऱ्या अनेक अडचणींचा विचार करता केवळ स्मृती व्यक्तीच्या तदेवतेची कसोटी म्हणून पर्याप्त ठरू शकत नाही. सामान्य परिस्थितीत तिला शारीरिक निरंतरतेवर अवलंबून राहावे लागते. तसेच स्मृतीचा खरेखोटेपणा किंवा संशयास्पद स्मृती यात भेद करणेदेखील कठीण आहे. या बाबतीत केवळ व्यक्तीच्या आंतरिक विश्वासावर अवलंबून राहणे विश्वासार्ह ठरत नाही. स्मृतिसंबंधीचे दावे, सत्य सिद्ध करण्यासाठी इतर काही गोष्टींचा आधार घ्यावा लागतो.

स्मृतीबरोबरच विस्मरण हेदेखील एक वास्तव आहे. व्यक्तीच्या तदेवतेची स्मृती ही एकमात्र कसोटी म्हणून मानली, तर विस्मरणाच्या स्थितीत व्यक्तीच्या तदेवतेची ओळख अशक्य आहे. विस्मरणाची ही वास्तविकता लक्षात घेता स्मृती ही व्यक्तीच्या तदेवतेची पर्याप्त तसेच एकमात्र कसोटी होऊ शकत नाही. शारीरिक स्थानांतरणाच्या संदर्भात ही समस्या अधिकाधिक गुंतागुंतीची ठरते, अशा परिस्थितीत शारीरिक निरंतरता व्यक्तीच्या तदेवतेच्या बाबतीत एक अत्यंत शक्तिशाली कसोटी ठरते.

वरील विवेचनाच्या आधारे हे स्पष्ट होईल की, केवळ स्मृती व्यक्तीच्या तदेवतेची एकमात्र कसोटी नाही. शारीरिक निरंतरता व्यक्तीच्या तदेवतेची मूलभूत कसोटी ठरते. परिस्थितीनुरूप शारीरिक निरंतरतेची कसोटी काही प्रमाणात संशय निर्माण करते. अशा बाबतीत स्मृती साहाय्यक ठरू शकते. त्यामुळे असे म्हणता येईल की, शारीरिक निरंतरता तसेच स्मृती दोन्ही मिळून व्यक्तीच्या तदेवतेची पूर्ण कसोटी प्रस्तुत करतात. शारीरिक निरंतरता अधिक मूलभूत तसेच बहुतांशी पर्याप्तदेखील आहे; परंतु स्मृतीची भूमिका गौण समजता येणार नाही. एवढेच म्हणता येईल की, स्मृती स्वतंत्रपणे व्यक्तीच्या तदेवतेची कसोटी ठरू शकणार नाही.

 

संदर्भ :

  • Azeri, Siyaves, Locke on Personal Identity : The Form of the Self, Filozofia, Bratislava, 2011.
  • Baillie, James, Problems in Personal Identity (Paragon Issues in philosophy), Minnesota, 1998.
  • Derek, Parfit, Personal Identity : The Philosophical Review, Vol. 80, No. 1. New York, 1971.
  • अंतरकर, शि. स. व्यक्ती तदेवता आणि अन्य व्यक्तींच्या मनाचे ज्ञान, परामर्श, खंड-१२, मुंबई, मे-१९९०.

                                                                                                                                                                      समीक्षक – हिमानी चौकर

This Post Has One Comment

  1. MAHESH DESHMUKH

    Useful article

प्रतिक्रिया व्यक्त करा