पेरू हे वर्षभर उपलब्ध असणारे  फळ आहे. भारतातील एकूण फळबाग लागवडीखालील क्षेत्रापैकी ७-९ टक्के क्षेत्रावर पेरू लागवड आढळते. पेरूच्या लागवडीची सुरुवात  १७ व्या शतकापासून झाली असून सध्या ते एक प्रमुख व्यापारी फळपीक म्हणून प्रसिद्ध आहे. भारतात अनेक राज्यांत पेरूची लागवड केली जाते. त्यापैकी उत्तर प्रदेशात जास्त लागवड होते,तर   महाराष्ट्रात सु. ३८ ते ४० हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड होते.

हवामान : उष्ण व समशितोष्ण हवामानात पेरू पीक चांगले येते. पेरूच्या चांगल्या वाढीसाठी लागवडीची जागा समुद्रसपाटीपासून १५०० मी. उंचीवर असावी. वार्षिक पावसाची सरासरी १००० मिमी.पेक्षा कमी असावी; सर्वसाधारण तापमान हे १६ ते १९° से. पर्यंत आणि हवेतील आर्द्रता ही ६५-८५ टक्के इतकी असावी.

जमीन : पाण्याचा योग्य निचरा होणार्‍या मध्यम ते भारी जमिनीत हे पीक चांगले येते. हलक्या जमिनीत जर सेंद्रीय पदार्थ भरपूर घातले तर हे पीक चांगले उत्पन्न देते. जमिनीचा सामू ५.५ ते ८.२ च्या दरम्यान असावा.

विविध वाण : पेरूचे अनेक वाण उपलब्ध असून सरदार (L-49) हे सर्वात जास्त मागणी असलेले वाण आहे. याशिवाय अलाहाबाद सफेदा, चित्तीदार, लखनौ-४२, सुप्रिम, पिन्क इंडियन हरिजा या जातींची लागवड केली जाते.

अभिवृद्धी : पेरूची अभिवृद्धी दाब कलम पद्धतीने करतात.बी पासून तयार केलेल्या रोपांची लागवड केल्यास त्या बागा जास्त टिकतात, परंतु उत्पादन व गुणवत्तेच्या बाबतीत त्यांच्यामध्ये विविधता आढळते.

 

लागवड : पारंपरिक पद्धत : यात ६ मी. X ६ मी. अंतरावर पेरू लागवड करतात. जमिनीच्या निवडीनंतर नांगरट करावी, ढेकळे फोडावीत, आडव्या-उभ्या कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत व समपातळीत आणावी. शेताची आखणी करावी. नमूद ठिकाणी २ X २ X २ फूट किंवा ३ X ३ X ३ फूट आकाराचे खड्डे खोदावेत. ही कामे मार्च-एप्रिल महिन्यात करावीत, खड्डे उन्हात तापू द्यावेत. खड्डे खोदताना चांगली माती एका बाजूस व इतर माती एका बाजूस टाकावी, चांगल्या मातीत प्रति खड्डा १०-१५ किग्रॅ. कुजलेले शेणखत, ५०० ग्रॅम पेंड,  २०-२५ ग्रॅम थिमेट,  ५०० ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट मिसळावे. खड्डा भरण्यापूर्वी खड्ड्याच्या चारही बाजू व तळावर कीडनाशक पावडर धुरळावी. या  अंतरावर प्रति हेक्टरी २७७ झाडे बसतात.

पाणीपुरवठा व्यवस्थापन : सुरुवातीचा वाढीचा काळ हा पाणीपुरवठ्याच्या बाबतीत अति संवेदनशील आहे. झाडे लावल्यानंतर आवश्यकतेप्रमाणे पाणीपुरवठा करावा. पाण्याचा तुटवडा असल्यास आच्छादन करावे. ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करावा. यात ठिबक संचांची नियमित निरीक्षण, देखभाल व वेळीच दुरुस्ती महत्त्वाची ठरते.

खत व्यवस्थापन : एकात्मिक खत व्यवस्थापनास पेरू चांगला प्रतिसाद देतो.पीकवाढीची अवस्था, माती परीक्षण यांनुसार लागणारी प्राथमिक, दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्ये पिकांस द्यावीत.लागवडीनंतर १०० ग्रॅ. नत्र, ४० ग्रॅ. स्फुरद आणि ४० ग्रॅ. पालाश प्रति झाड प्रति वर्ष द्यावे. पुढील वर्षी या खत मात्रेत १० टक्केनी वृद्धी करावी. खते वर्षातून दोनदा दोन सारख्या भागात विभागून द्यावीत. आवश्यकतेनुसार सूक्ष्म अन्नद्रव्ये फवारणीतून द्यावीत. फुले येण्यापूर्वी ०.४ % बोरिक अम्ल + ०.३ % झिंक सल्फेटची फवारणी द्यावी, यामुळे फळांची चांगली गुणवत्ता मिळण्यास मदत होते. पेरू पिकात प्रति झाड २५ ग्रॅ. ॲझोस्पिरिलम + २५ ग्रॅ. स्फुरद विरघळणारे जीवाणू ४०-५० किलो शेणखतासोबत बहार घेतेवेळी द्यावे, यामुळे दिलेल्या रासायनिक खताची कार्यक्षमता वाढून उत्पादन व गुणवत्ता दोन्हींतही वाढ होते.

आंतर मशागत :  एकात्मिक तण नियंत्रण पद्धतीचा वापर करावा. शेतात कुळव चालवून किंवा टिचणी करून माती भुसभुशीत ठेवावी.वाफे दुरुस्ती करावी.

छाटणी व वळण देणे : पेरू पिकांत छाटणी आणि वळण देण्याच्या संस्कारास अनन्यसाधारण महत्त्व आहे. लागवडीनंतर ६० दिवसांनी झाडाचा मुख्य शेंडा जमिनीपासून ५० सेंमी उंचीवर छाटावा.त्यामुळे झाडांचा मध्यभाग मोकळा होतो व फांद्यांची वाढ होऊन झाडास योग्य आकार प्राप्त होतो.बहार घेतेवेळी फांदीच्या नवीन वाढीची २५ टक्के  वाढ छाटल्यास (मे महिन्यात) हिवाळ्यातील बहार चांगला येतो.हस्त बहारासाठी सप्टेंबरमध्ये दुसऱ्या आठवड्यात हलकी छाटणी करावी.वर्षातून 2 पिके घेण्यासाठी दरवर्षी मे व जानेवारी अशी दोनदा छाटणी आवश्यक ठरते.

फूलधारणा व फळधारणा : पेरू पिकास एप्रिल-मे व सप्टेंबर-ऑक्टोबर या दोन हंगामात फुले येतात. फुले व फळांची गळती ही जवळपास ५० टक्के पेक्षा जास्त आढळते.फळधारणा झाल्यानंतर १०० पीपीएम. एनएए.ची मात्रा दिल्यास ही गळती कमी होते. सर्वसाधारणत: हिवाळी बहारापेक्षा एप्रिल-मे मध्ये भरपूर फळे येतात.ती घ्यायची नसल्यास मॅलिक हायड्रोझाइड (१०,००० पीपीएम.) करावी,म्हणजे हिवाळ्यातील हंगामासाठी भरपूर फुले, फळे मिळतील. याशिवाय २, ४ – डी या संजीवकाचा फूलगळतीसाठी वापर करतात. जास्तीची फुले येण्यासाठी हुंडी फोडावी, मुळ्या मोकळ्या कराव्यात. काही वेळा मुळ्यांची छाटणी सुद्धा करतात. हाताने फुलांची विरळणी करणे सुद्धा फायदेशीर ठरते.पेरूच्या चांगल्या वाढ व उत्पादनासाठी १००० पीपीएम सीसीसी ची फवारणी ताण देते वेळी व तद्नंतर ५० पीपीएम २, ४ डी ची फवारणी १५ दिवसाच्या अंतराने दोन वेळा करावी.

पीक संरक्षण : पेरू पिकावर प्रामुख्याने फळमाशी, मिलीबग व खवले यांसारख्या रस शोषणाऱ्या किडी तसेच मर, देवी यांसारख्या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव आढळून येतो.  बुरशीनाशक किंवा कीटकनाशक वापरून त्यांचे प्रभावी पद्धतीने नियंत्रण करता येते.

फळांची काढणी : पेरूची फळे झाडावरच पिकतात. पूर्ण वाढ झाल्यानंतर फळाच्या सालीचा रंग फिकट हिरवा-पिवळसर होतो. जास्त काळ फळे झाडावर राहिल्यास ती गळून पडतात. फळांना विशिष्ट वास येतो. त्यामुळे शक्यतो फळे पूर्ण पिकण्यापूर्वीच काढतात.

उत्पादन : पेरू पिकाचे उत्पादन हे लागवडीची पद्धत,आंतर आणि व्यवस्थापन या बाबींवर अवलंबून आहे.हे पारंपरिक लागवडीत प्रति झाड ४० किग्रॅ. तर घन लागवडीत १०-१२ किग्रॅ. फळे/झाड उत्पादन मिळते.

संदर्भ :

  • चिमा,जी.एस.;भट,एस.एस.;नाईक,के.सी.पश्चिम भारताची व्यापारी तत्त्वावर घेतली जाणारी फळपिके, मॅक मिलन आणि कंपनी लि.,न्यूयार्क.
  • पाटील,अ .व्य.;कारंडे,ए. आर. महाराष्ट्रातील फळझाडे,कॉन्टिनेन्टल प्रकाशन,पुणे,१९८०.

समीक्षक – भीमराव उल्मेक

प्रतिक्रिया व्यक्त करा