सीताफळ हे अत्यंत काटक, हलक्या व मुरमाड जमिनीत चांगल्या प्रकारे वाढणारे तसेच दुष्काळातही तग धरून राहणारे फळझाड आहे. महाराष्ट्रातील एकूण लागवडीयोग्य जमिनीपैकी जवळपास ७५ – ८० टक्के जमीन कोरडवाहू आहे,त्यामुळे अशा जमिनीत सीताफळाची लागवड करतात.
भारतात प्रामुख्याने आंध्र प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान, तमिळनाडू, उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यांमध्ये आणि महाराष्ट्रात बीड, अहमदनगर, जळगाव, नंदुरबार, नाशिक, पुणे, सोलापूर, औरंगाबाद आणि परभणी जिल्ह्यात सीताफळाची लागवड केली जाते. पुणे जिल्ह्यातील सासवड, शिरुर, मराठवाड्यातील धारुर, नळदुर्ग, दौलताबाद, तसेच आंध्र प्रदेशातील बालाघाट ही गावे सीताफळासाठी प्रसिद्ध आहेत. या फळपिकासाठीचे अनुकूल हवामान लक्षात घेता महाराष्ट्र शासनाने याचा राष्ट्रीय फलोत्पादन कार्यक्रमात समावेश केला आहे.
सीताफळ झाडाच्या अवयवात हायड्रोसायनिक आम्ल असते. त्यामुळे या झाडाला वाळवी लागत नाही. याच्या पानांत ॲकॅरिन आणि ॲनोनीन ही कीटकनाशक अल्कलॉइड द्रव्ये असतात. त्यामुळे या झाडाची पाने शेळ्या, मेंढ्या खात नसल्यामुळे संरक्षण न करताही या फळझाडाची जोपासना करता येते.
हवामान : सीताफळ हे उष्णकटिबंधातील फळझाड असल्याने याला उष्ण व कोरडे हवामान आणि मध्यम अथवा कमी हिवाळा मानवतो. सीताफळाच्या योग्य वाढीसाठी ३० ते ४०o से. तापमानाची व ५०० ते ६०० मिमी. पावसाची गरज असते.
जमीन : सीताफळ लागवडीसाठी हलकी ते मध्यम, चांगला निचरा होणारी २ ते ३ टक्के उताराची, भरपूर सेंद्रिय पदार्थ असणारी जमीन असावी, सामू (pH) ५.५ ते ६.५ असावा.
अभिवृद्धी : बियांपासून अभिवृद्धी : बियांपासून अभिवृद्धी करताना प्रथम उत्कृष्ट दर्जाची, भरपूर आणि मोठ्या आकाराची फळे देणारी झाडे निवडून त्यांच्या फळांमधील बी काढावे. पेरणीआधी एक दिवस बी कोमट पाण्यात भिजत ठेवावे. पावसाळा सुरू झाल्यानंतर प्रत्येक खड्ड्यात १० सेंमी. अंतरावर ३ ते ४ बिया लावाव्यात.रोपे मोठी झाल्यास एकच जोमदार वाढणारे रोप ठेवून बाकीची रोपे हळुवारपणे उपटून टाकावीत.पॉलिथिन पिशव्यांत लागवड़ करावयाची असल्यास फेब्रुवारीमध्ये पेरणी करून रोपे तयार करावीत.
शाखीय पद्धतीने अभिवृद्धी : सीताफळांमध्ये डोळे भरून किंवा मृदुकाष्ट कलम पद्धतीने कलम करूनही लागवड केली जाते.
लागवड : सीताफळाच्या लागवडीपूर्वी जमीन चांगली नांगरून, कुळवून उन्हामध्ये तापू द्यावी. त्यानंतर पावसाळ्यापूर्वी हलक्या व मुरमाड जमिनीत ४ x ४ मी. व मध्यम जमिनीत ५ x ५ मी. अंतरावर ४५ x ४५ x ४५ सेंमी. आकाराचे खड्डे घ्यावेत. प्रत्येक खड्ड्यात १ ते १.५ घमेले शेणखत, २ ते ३ घमेले पोयटामाती, १ किग्रॅ. सिंगल सुपर फॉस्फेट आणि १०० ग्रॅ. २ टक्के मिथिल पॅराथिऑन पावडर यांचे मिश्रण टाकून भरावेत. पाऊस पडल्यानंतर खड्ड्यांमध्ये कलमे अगर रोपे लावावीत व काठीचा आधार देऊन सुतळीने सैल बांधावीत. पाऊस नसल्यास लगेचच झारीने पाणी द्यावे.
पाणी व्यवस्थापन : सीताफळ हे कोरडवाहू फळझाड असल्याने पिकाच्या गरजेइतकेच पाणी द्यावे. पूर्ण वाढ झालेल्या झाडास साधारणपणे ५० – ६० लि.पाणी पुरेसे होते. पाण्याची गरज झाडांचे अंतर व स्थानिक हवामानावर अवलंबून असते. सुरुवातीस सीताफळाच्या बागेस हलक्या जमिनीत ५ – ६ दिवसांनी, मध्यम जमिनीत ८ – १० दिवसांनी आणि भारी जमिनीत १० – १२ दिवसांनी पाणी द्यावे. ठिबक सिंचनाचा वापर करून कमी पाण्यामध्ये सीताफळाचे अधिक उत्पादन घेता येते.
खत व्यवस्थापन : सर्वसाधारणपणे सीताफळास शेणखत, स्फुरद आणि पालाशची संपूर्ण मात्रा पावसाळ्याच्या सुरुवातीला देऊन नत्राची मात्रा ३-४ हप्त्यात विभागून एक-दोन महिन्याच्या अंतराने द्यावी म्हणजे सुरुवातीची वाढ चांगली होते. पाच वर्षानंतर पूर्ण वाढलेल्या प्रत्येक झाडास बहार धरताना मे-जूनमध्ये संपूर्ण शेणखत जमिनीत चांगले मिसळून द्यावे व संपूर्ण स्फुरद आणि पालाश अर्धे नत्र खोडापासून दूर फांद्यांच्या परिघाखाली रिंग करून देऊन व झाकून पहिले पाणी द्यावे. उरलेल्या अर्ध्या नत्राची मात्रा एक महिन्याच्या अंतराने दोन हप्त्यात विभागून द्यावी.
काढणी व उत्पादन :सीताफळ झाडास फळे येऊन ती पक्व होण्यास ४ ते ५ महिने लागतात. उन्हाळ्यात पाण्याची सोय असेल तर लवकर बहार धरून फळे जून-जुलै महिन्यात काढणीस येतात, परंतु पाण्याची सोय नसेल तर जून महिन्यात बहार धरून फळे सप्टेंबर-नोव्हेंबरमध्ये काढणीस येतात. लागवड केल्यानंतर कलमी झाडांना चौथ्या वर्षी व बियांपासून अभिवृद्धी केलेल्या झाडांना सहाव्या वर्षी फळे येण्यास सुरुवात होते. सीताफळाच्या ६ ते ७ वर्षाच्या झाडापासून सरासरी ५० ते ७५ फळे मिळतात. फळांचे सरासरी वजन १०० ते २५० ग्रॅमपर्यंत मिळते.फळे पक्व झाल्यावर फळांचा रंग फिकट हिरवा होतो, डोळे उघडून दोन डोळ्यांमधील भाग पांढरट पिवळसर रंगाचा दिसू लागतो तसेच फळांचे खवले उंच होऊन फळांची साल डोळ्यामधून फाटण्यास सुरुवात होते. अशा प्रकारची फळे काढणीस योग्य असतात.
सीताफळांच्या जाती : सीताफळामध्ये जवळपास ४० ते ५० प्रजाती असून १२० जाती आहेत. फुले पुरंदर,बाळानगर,अर्का सहान,धारुर – ६ या सीताफळांच्या जातींची लागवड करतात.
संदर्भ :
- पाटील,अ .व्य.;कारंडे,ए. आर. महाराष्ट्रातील फळझाडे,कॉन्टिनेन्टल प्रकाशन,पुणे,१९८०.
समीक्षक – भीमराव उल्मेक
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.
Khup Chaan Mahiti…