संस्कृतच्या अध्ययन- संशोधन विकासासाठी पुणे येथे स्थापन झालेली पहिली संस्था. ‘संस्कृतस्य उन्नत्यर्थमेव निर्मितः’ हे या संस्थेचे ब्रीदवाक्य. भारतीय संस्कृतीविषयक ग्रंथांचे संस्कृतमध्ये मुद्रण-पुनर्मुद्रण तसेच जुन्या हस्तलिखित पोथ्यांचे जतन व संवर्धन करण्याचे कार्य ही संस्था करते.
मुंबईच्या उच्च न्यायालयातील वकील महादेव चिमणाजी आपटे हे आनंदाश्रम या संस्थेचे संस्थापक. ४ नोव्हेंबर १८८७ रोजी त्यांनी आपली सर्व मालमत्ता खर्च करून ही भव्य वास्तू निर्माण केली. आपली मालमत्ता आपल्या नातेवाईकांत न वाटता ट्रस्टच्या आणि संस्थेच्या रूपात त्यांनी ती जतन केली. आपल्या वैयक्तिक संपत्तीचा अशाप्रकारे न्यास करणारे महाराष्ट्रातील ते एक प्रमुख गृहस्थ होत. १८८८ मध्ये त्यांनी रा. ब. वासुदेव बापूजी कानिटकर, शिवराम हरी साठे व गंगाराम बाळासो रेळे यांना विश्वस्त नेमून विश्वस्त मंडळ स्थापन केले. महादेव आपटे यांचे पुतणे मराठीतील श्रेष्ठ कादंबरीकार ह. ना. आपटे हे या संस्थेचे पहिले व्यवस्थापक.त्यांनी हे पद आमरण सांभाळले.
भारतीय संस्कृतीविषयक ग्रंथांचे संस्कृतमध्ये मुद्रण-पुनर्मुद्रण करणे व जुन्या हस्तलिखित पोथ्यांचे जतन व संवर्धन करणे हे या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट होय. धर्मशास्त्र, योगशास्त्र, उपनिषदे, मीमांसा, वेद व वेदांगे इत्यादी अनेक विषयांवरील सु. १४६ ग्रंथ या संस्थेने मुद्रित केले आहेत. तसेच २०१६ मध्ये तैत्तिरीय आरण्यकम् हा ग्रंथ प्रस्तावनेसह पुनर्मुद्रित केला आहे.या संस्थेत भारतभर भ्रमंती करून जमविलेल्या २६ विषयांवरील १५, १०३ इतक्या हस्तलिखित पोथ्यांचा संग्रह असून ज्योतिषरत्नमाला हे त्यांतील सर्वांत जुने म्हणजे १४४९ मध्ये लिहिलेले हस्तलिखित होय. हस्तलिखित पोथ्यांचा अभ्यास करण्यासाठी देशविदेशातून येणाऱ्या अभ्यासकांना संस्थेकडून त्या उपलब्ध करून दिल्या जातात. नवी दिल्ली येथील नॅशनल मिशन फॉर मॅन्युस्क्रिप्ट या संस्थेच्या मदतीने ८० टक्के हस्तलिखितांचे संगणकीय प्रतीमाचित्रण करण्यात आले असून सर्व संग्रह आता संगणकीय तबकडीच्या (डीव्हीडी)रूपात सुरक्षित करण्यात आले आहेत.आनंदाश्रम या संस्थेत संदर्भग्रंथमाला असून व्यक्ती व संस्था यांनी भेट दिलेली इंग्रजी, मराठी व संस्कृत या विषयांतील जवळजवळ २,२६४ अमूल्य ग्रंथ त्यात आहेत.संस्थेमध्ये विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची सोय आहे.गेल्या १३० वर्षांत ५०० हून अधिक विद्यार्थी येथे राहून शिकून गेले आहेत.