प्राकृत भाषांपैकी एक भाषा. वररुचीने शौरसेनी प्राकृतला पैशाची प्राकृतचे मूळ मानले आहे. मार्कण्डेयाने पैशाचीला कैकय,शौरसेन आणि पांचाल या तीन भेदांमध्ये विभागले आहे. संस्कृत आणि शौरसेनी भाषेला कैकय पैशाचीचे आणि कैकय पैशाचीला शौरसेन पैशाचीचे मूळ मानले जाते. पांचाल पैशाचीचे मूळ त्यांनी सांगितले नाही.लक्ष्मीधराने षड्भाषाचन्द्रिकामध्ये पैशाची भाषेला पिशाचांची भाषा अर्थात देव व मनुष्य यांच्या मधली पिशिताशी/कुत्सित योनीची भाषा मानली आहे. पिशिताशी ही भूतयोनी समजली जाते म्हणून पैशाची भाषा ही भूतभाषा मानली जाते. हीरालाल जैन यांच्या मते पैशाची ही वायव्येकडची भाषा आहे.वायव्य भारतातील आधुनिक भाषा पुश्तु मध्ये पिशाच हा शब्द उपलब्ध आहे. पशायदीर क्षेत्रातील एका नगराचे नाव पिशात आहे.पसाई हा शब्द वायव्य भागातील काफिरांच्या समूहामध्ये अजूनही उपाधिरूपाने वापरला जातो. पिशाच हे वायव्य भागातील जनसमुदायाचे नाव असून या भाषेचे नाव त्यावरून पडले असावे व तिचे मूलस्थान पेशावर (पिशाचपूर) व त्याच्या आसपासचा प्रदेश असावा. पिशाच या जमातीतील लोकांनी भारतातील अनेक प्रांतांत वसाहती केल्या आहेत.
पैशाची भाषेच्या काळाचा विचार करता सुरुवातीच्या साहित्यात या भाषेतील कोणत्याही ग्रंथाचा उल्लेख दिसत नाही. गुणाढ्याचा बड्ढकहा (संस्कृत बृहत्कथा) हा ग्रंथ पैशाची भाषेत रचला गेला. तो सध्या उपलब्ध नाही. ह्या काळातील व्याकरण, नाटक आणि काव्यामध्ये पैशाची भाषेचे जे उल्लेख सापडतात, ते मध्ययुगातील पैशाची भाषेचे आहेत. तिचा काळ साधारण इसवी सनाचे दुसरे शतक असा मानला जातो.
पैशाची भाषेची लक्षणे/उदाहरणे वररुचींच्या प्राकृत-प्रकाश, आचार्य हेमचंद्र याच्या सिद्धहेमशब्दानुशासनांतर्गत प्राकृत-व्याकरण, मार्कण्डेय याच्या प्राकृत-सर्वस्व व क्रमदीश्वर याच्या संक्षिप्तसार इ. प्राकृत व्याकरणग्रंथांमध्ये आढळून येतात. याशिवाय आचार्य हेमचंद्र याच्या कुमारपालचरित तसेच काव्यानुशासनामध्ये; मोहराजपराजय नावाच्या नाटकामध्ये आणि षड्भाषाशास्त्रामध्येही पैशाची भाषेचे उल्लेख मिळतात. भरताच्या नाट्यशास्त्रामध्ये या भाषेचा उल्लेख आढळत नाही; परंतु त्यानंतरच्या रुद्रट, केशवमित्र इ. संस्कृत अलंकारशास्त्रकारांनी तिचा उल्लेख केला आहे. वाग्भटाने या भाषेचा भूतभाषित या नावाने उल्लेख केला आहे. त्याने तसेच केशवमिश्राने अनुक्रमे भूत आणि पिशाचांसारख्या पात्रांसाठी तसेच षड्भाषाचन्द्रिकाकार लक्ष्मीधराने राक्षस, पिशाच आणि नीच पात्रांसाठी या भाषेचा वापर करावा असे सांगितले आहे. प्राकृत व्याकरणकारांनी पांड्य, पांचाल, गौड, मागध, व्राचड, कैकय, बाहीक, सिंह (? सह्य) नेपाळ, कुंतल, सुधेष्ण, भोज, गांधार, हैवक, कन्नौज आणि दाक्षिणात्य शाबर, द्राविड या देशांची गणना पिशाच देशांमध्ये केली आहे.
पैशाची भाषा ही शौरसेनी प्रमाणे मानल्यामुळे तिच्यामध्ये जे लक्षणभेद आहेत ते प्रामुख्याने खालीलप्रमाणे सांगितले आहेत. अन्य सर्व लक्षणे/अंश शौरसेनीप्रमाणे मानावेत.
संस्कृत शब्दांमध्ये खालील प्रमाणे बदल होऊन पैशाची भाषेतील शब्द तयार होतात, ते असे :
१. संस्कृत ज्ञ, न्य आणि ण्य च्या जागी पैशाची ञ्ञ होतो –
जसे, प्रज्ञा – प्रञ्ञा, ज्ञान – ञ्ञान, कन्यका – कञ्ञका, पुण्य – पुञ्ञ, सर्वज्ञ – सर्वञ्ञ, संज्ञा – सञ्ञा
२. सं. ण आणि न च्या जागी पै.न होतो –
जसे, गुण – गुन, गुणगणयुत – गुनगनयुत, कनक – कनक
३. सं. त आणि द च्या जागी पै.त होतो –
जसे, भगवती – भगवती, मदन – मतन, देव – तेव, दामोदर – तामोतर, सदन – सतन
४. सं.लकाराचा पै.ळ होतो –
जसे, शील – सीळ, कुल – कुळ, कमल – कमळ
५. सं. टु च्या जागी पै. टु आणि तु होतो –
जसे, कुटुम्बक – कुटुम्बक, कुतुम्बक
६. सं.यादृश इ. शब्दांमधील दृ पै.ति मध्ये बदलतो –
जसे, यादृश – यातिस, सदृश – सतिस
७. सं. र्य-स्न-ष्ट च्या जागी क्रमाने पै. रिय-सिन-सट असा बदल होतो –
जसे, भार्या – भारिया, स्नात – सिनात, कष्ट – कसट
८. सं.अकारान्त शब्दाचे पंचमी एकवचन पै. मध्ये आतो आणि आतु होते –
जसे, जिनातो, जिनातु
९. शौरसेनीच्या दि आणि दे प्रत्ययांच्या जागी पै.ति आणि ते होतात–
जसे, गच्छति, गच्छते, रमति, रमते
१०. भविष्यकाळामध्ये शौरसेनी स्सि चा बदल पै.मध्ये एय्यमध्ये होतो –
जसे, भविष्यति – हुवेय्य
११. भावे आणि कर्मणी प्रयोगदर्शक शौरसेनी मधील ईअ तसेच इज्ज या स्थानी पै.इय्य होतो –
जसे, पठ्यते – पठिय्यते, हस्यते – हसिय्यते, गीयते – गिय्यते, रम्यते – रमिय्यते
१२. सं. त्वा प्रत्ययाच्या जागी पै. मध्ये काही ठिकाणी तून तर काही ठिकाणी त्थून आणि ध्दून असा बदल
होतो –
जसे, पठित्वा –पठितून, गत्वा – गन्तून, नष्ट्वा – नत्थून/नध्दून, तष्ट्वा – तत्थून/तध्दून
संदर्भ:
- जैन, जगदीशचन्द्र, प्राकृत साहित्य का इतिहास, चौखम्बा विद्याभवन, वाराणसी, १९८५.
- शास्त्री, नेमिचन्द्र, प्राकृत भाषा और साहित्य का आलोचनात्मक इतिहास, तारा पब्लिकेशन्स्,वाराणसी,१९६६.