संस्कृत-प्राकृत भाषिक संघर्ष इसवी सनपूर्व चौथ्या पाचव्या शतकापासून वैदिक परंपरेशी काही तत्त्वांवर विरोध करणाऱ्या जैन बौद्ध परंपरांचा उगम झाला. जैन परंपरेचे संस्थापक किंवा उद्धारक महावीर आणि बौद्ध परंपरेचे संस्थापक गौतम बुद्ध हे जवळजवळ एकमेकांचे समकालीन होते आणि या परंपरांचा उगम मगधासारख्या पूर्वेकडच्या प्रदेशात झाला. या दोघांचा जन्म क्षत्रिय राजघराण्यात झाला होता आणि त्यांनी सन्यास स्वीकारून त्यांना झालेल्या साक्षात्कारातून जन्माला आलेल्या धर्माचा प्रसार बहुजनांमध्ये स्थानिक प्राकृत भाषा वापरून करायला सुरुवात केलीयाउलट वैदिक परंपरेत वेदाध्ययनाचा अधिकार फक्त ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या त्रैवर्णिकांनाच होता आणि वेदाध्यापनाचा अधिकार फक्त ब्राह्मणांनाच होता. बहुजनांना वेदाध्ययनाचा अधिकार नव्हता. अशा प्रकारे वैदिक परंपरा आणि बौद्धजैन परंपरांमध्ये एक प्रकारे सामाजिक आणि भाषिक संघर्ष होता. बहुजनांसाठी वापरल्या जाणाऱ्या प्राकृत भाषा  निम्न दर्जाच्या होत्या असेही नाही, कारण सम्राट अशोकाच्या भारतातील शिलालेखांमध्ये केवळ प्राकृत भाषाच वापरलेल्या आहेतम्हणजे प्राकृत भाषा देखील क्षत्रियांसारखे उच्चवर्णीय वापरत होते ; परंतु संस्कृत परंपरेत या प्राकृत भाषांना अपभ्रंश हे नाव लावून त्यांचा जरा निम्न दर्जा संस्कृत भाषेचा देववाणी म्हणून केलेला गौरव दिसून येतो. बौद्ध धर्माची थेरवादी परंपरा त्यांच्या त्रिपिटक नावाच्या धर्मग्रंथांत वापरलेल्या पालीमागधी भाषेला सर्व प्राणिमात्रांची मूलभाषा मानते. तसेच जैन परंपरेत वापरलेली अर्धमागधी ही प्राकृत भाषा देवांची भाषा मानली आहे आणि जेव्हा महावीर या भाषेत प्रवचन देत असत तेव्हा त्या प्रवचनाचे रूपांतर सहजपणे ऐकणाऱ्याच्या भाषेत होत असे असे वर्णन जैन ग्रंथांमध्ये दिसते. ब्राह्मणी धर्मशास्त्रीय ग्रंथांमध्ये समाजाच्या चार वर्णांचा क्रम ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र असा दिसतो तर पाली बौद्ध ग्रंथांमध्ये हाच क्रम क्षत्रिय, ब्राह्मण, वैश्य, शूद्र असा दिसतो. तेविज्जसुत्तासारख्या पाली वाङ्मयात वेदांचे कर्ते वैदिक धर्मतत्त्वज्ञान शिकविणारे ब्राह्मण हे अडाणी असून ते एखाद्या अंधपरंपरेने आंधळ्यांच्या मागे जाणारे आहेत असे दाखविले आहे. त्यांना ज्याचा कधी साक्षात्कार झाला नाही त्या ब्रह्माच्या प्राप्तीचा मार्ग शिकवून ते इतरांची फसवणूक करीत आहेत असे प्रतिपादन केले आहे. हा बुद्धाचा उपदेश ऐकणारे दोन ब्राह्मण तरूण शेवटी गौतम बुद्धाला शरण जातात असे या सुत्तात दाखविले आहे. बौद्ध परंपरेत असाही उल्लेख येतो की बुद्धाला शरण जाऊन त्याचे शिष्य झालेले काही ब्राह्मण त्याच्या उपदेशाचे संस्कृतात (छन्दसा आरोपेम) रूपांतर करण्याचा प्रस्ताव मांडत होते ; परंतु गौतम बुद्ध या प्रस्तावाला परवानगी देता, त्यांना ते ज्या ज्या प्रदेशात जातील तिथल्या लोकभाषेत धर्माचा उपदेश करण्याचा आदेश देतात. बौद्ध आणि जैन परंपरा आर्य हा शब्दही स्वत:च्या परंपरांना लावून आम्ही खरे आर्य वैदिक परंपरा खरी आर्य नव्हे असे सांगताना दिसतात. या नव्या आर्यतेचा जन्माशी काही संबंध नसून धार्मिकआध्यात्मिक उच्चतेशी किंवा शुद्धतेशी आहे. बुद्धाचा आर्य मार्ग स्वीकारणारे सारे शिष्य या अर्थाने आर्य झाले होते. या नव्या अर्थाने अर्धमागधी पाली या भाषाही जैनबौद्ध परंपरांमध्ये आर्यभाषा मानल्या जाऊ लागल्या होत्या.

संदर्भ :

  • Deshpande, Madhav M., Sociolinguistic Attitudes in India : An Historical Reconstruction, Karoma Publishers, Ann Arbor (USA), 1979.

Key Words: #वैदिक-अवैदिक भाषिक संघर्ष, #बौद्ध परंपरेचे भाषाविषयक मत, #जैन परंपरेचे भाषाविषयक मत