दशरूपकांपैकी नववा रूपकप्रकार. भरताने नाट्यशास्त्रात याचे वर्णन पुढीलप्रमाणे केले आहे

आत्मानुभूतशंसीपरसंश्रयवर्णनाविशेषस्तु|

विविधाश्रयोहिभाणोविज्ञेयस्त्वेकहार्यश्च|| (१८.९९)

परवचनमात्मसंस्थंप्रतिवचनैरुत्तरित्तरग्रथितै:|

आकाशपुरुषकथितैरङ्गविकारैराभिनयेत्तत्|| (१८.१००)

धूर्तविटसंप्रयोज्योनानावस्थान्तरात्मकश्चैव|

एकाङ्कोबहुचेष्टःसततंकार्योबुधैर्भाणः|| (१८.१०१)

या रूपकात एकच पात्र असते – धूर्त किंवा विट. धूर्त म्हणजे अतिशय विद्वान व्यक्ती आणि विट म्हणजे कलांमध्ये निपुण व्यक्ती.कामसूत्रात विटाचे लक्षण असे सांगितले आहे की, ज्याने व्यसनीपणात आपली मालमत्ता गमावली आहे असा,गुणी,अनेक कला जाणणारा व त्या कलांचा उपयोग करून उपजीविका चालवणारा गृहस्थ म्हणजे विट.हे एकच पात्र आपला स्वतःचा वृत्तान्त, अनुभव कथन करते; तसेच इतरांच्या चेष्टितांचे वर्णन करते. एकाच पात्राच्या मुखाने रंगभूमीवर प्रवेश न केलेल्या पात्रांना देखील ‘भाण्यन्ते’ म्हणजे बोलायला लावले जाते म्हणून या प्रकाराला ‘भाण’ असे म्हणतात.

आकाश भाषितांचा फार मोठ्या प्रमाणात उपयोग हे भाण या प्रकाराचे प्रधान वैशिष्ट्य होय.आकाश भाषित म्हणजे एकच पात्र स्वतःचे संवाद बोलत असताना दुसऱ्या व्यक्तीचेही संवाद “अरे काय म्हणतोस?” असे म्हणून बोलते. असे करताना ते पात्र स्वतःच्या व प्रत्यक्ष रंगभूमीवर नसलेल्या पात्रांच्या तोंडची वाक्ये एकावेळी बोलत असते. म्हणजे दोघांचा परस्परांशी होत असलेला संवाद सादर करीत असते व अशाप्रकारे प्रेक्षकांना तो संपूर्ण संवाद समजतो.भाण एक-अंकी असला तरी अनेक प्रकारच्या अवस्थांचे आणि चेष्टितांचे यात एकाच पात्राद्वारे वर्णन करता येते.आंगिक हालचालींनाही भाणामधे महत्त्वाचे स्थान आहे.

भाणाची कथा वस्तू कविकल्पित असते. यात मुख्यतः शृंगार व वीर हे दोन रस येतात. तसेच प्रामुख्याने भारती ही वृत्ती दिसते. मुख आणि निर्वहण असे दोनच संधी असतात.संस्कृतात अनेक भाण आहेत. अर्थात ते सर्व बरेच अर्वाचीन आहेत. विशेषतः इसवी सनाच्या नवव्या-दहाव्या शतकातील चतुर्भाणी हा संग्रह प्रसिद्ध आहे. साहित्यदर्पणकाराने लीलामधुकर हे भाणाचे उदाहरण दिले आहे. कवीच्या सूक्ष्म निरीक्षणशक्तीची प्रचिती आणून देणारे वास्तव जीवनाचे चित्रण हे भाणाचे वैशिष्ट्य आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा