भासनाटकचक्रातील एक नाटक म्हणजे मध्यमव्यायोग. त्याची कथा अशी – एकदा कोणी एक वृद्ध ब्राह्मण आपल्या पत्नी व तीन मुलांसह हिडिंबा वनातून चालला असताना त्याला हिडिंबेचा मुलगा घटोत्कच याने अडवले. घटोत्कचाने त्या ब्राह्मणाकडे आपल्या आईचा उपवास सोडण्यासाठी तिचा आहार म्हणून एका मुलाची मागणी केली. थोरला वडिलांना प्रिय तर धाकटा आईचा लाडका. त्यामुळे ब्राह्मणाने मध्यम नावाच्या आपल्या मधल्या मुलाला देऊ केले. घटोत्कचाच्या परवानगीने पाणी पिण्यासाठी गेलेला तो मध्यम बराच वेळ झाला तरी आला नाही हे पाहून घटोत्कचाने त्याला “मध्यम, मध्यम” अशा हाका मारल्या. त्या हाका आपल्यालाच मारल्या आहेत असे वाटून कुंतीपुत्र पांडवांपैकी ‘मध्यम’ म्हणजे भीम तेथे आला. तेव्हा त्या वृद्ध ब्राह्मणाने त्याच्याकडे मदतीची याचना केली. ब्राह्मणपुत्र मध्यमाला सोडवण्यासाठी पांडव मध्यम घटोत्कचाला सामोरा गेला  व त्याने ब्राह्मणपुत्राचा जीव वाचवला. पांडव मध्यमाने ब्राह्मणपुत्र मध्यमाला वाचवले म्हणून ह्या व्यायोगाचे नाव ‘मध्यमव्यायोग’. भीम व घटोत्कच यांच्या युद्धांनतर घटोत्कच भीमाला घेऊन आपली आई हिडिंबा हिच्या समोर येतो, तेव्हा ती भीमाला पाहून घटोत्कचाला ते त्याचे वडील असल्याचे सांगते  व ह्याद्वारे त्या दोघांची भेट होते. अशी या व्यायोगाची कथा आहे.

व्यायोग एक रूपकप्रकार. भरतमुनींनी नाट्यशास्त्राच्या १८ व्या अध्यायात नाट्यलक्षणे सांगताना नाट्याचे म्हणजे रूपकाचे दहा प्रकार सांगितले आहेत. त्यांपैकी एक म्हणजे व्यायोग. नाट्यशास्त्रात व्यायोगाची लक्षणे पुढीलप्रकारे सांगितली आहेत –

व्यायोगस्तु विधिज्ञै: कार्यः प्रख्यातनायकशरीरः|

अल्पस्त्रीजनयुक्तस्त्वेकाहस्तथा चैव||

बहवश्च तत्र पुरुषा व्यायच्छन्ते यथा समवकारे|

न च तत्प्रमाणयुक्तः कार्यस्वेकाङ्क एवायम्||

न च दिव्यनायककृतः कार्यो राजर्षिनायकनिबद्धः|

युद्धनियुद्धाधर्षणसंघर्षकृतश्च कर्तव्यः||

एवंविधस्तु कार्यो व्यायोगो दीप्तकाव्यरसयोनि:| (नाट्यशास्त्र १८.८२-८५)

नाट्याचे नियम जाणणाऱ्यांनी प्रसिद्ध नायक व कथानक असलेला, थोड्या स्त्रिया असलेला, तसेच एका दिवसातील वृत्तांत असलेला, अशा प्रकारे व्यायोगाची रचना करावी. समवकाराप्रमाणेच त्यात पुष्कळ पुरुषांचे चेष्टित असते; परंतु त्याचा विस्तार समवकाराइतका नसतो. फक्त एकच अंक असलेला असा हा व्यायोग करावा. त्यात दिव्य नायक नसावेत, तर राजर्षी नायक असलेला असा व्यायोग करावा आणि युद्ध, द्वंद्व युद्ध, आह्वान, संघर्ष यांनी युक्त असलेला असा करावा. अशाप्रकारे आवेशयुक्त रसांचे काव्य असलेल्या व्यायोगाची रचना करावी.

दहा रूपकप्रकारांपैकी पाच रूपकप्रकार एक अंकी आहेत, त्यांपैकी एक व्यायोग. त्याचा नायक ख्यातकीर्त असावा, परंतु तो राजा नसावा. तर साहित्यदर्पणकाराने तो मंत्री, सेनापती असावा,  कोणीतरी दिव्य असावा, वीररसाने युक्त असावा असे म्हटले आहे. व्यायोगात मुख्यत्वे युद्ध, द्वद्वं युद्ध, आह्वान, संघर्ष यांचे चित्रण केलेले असावे. संपूर्ण व्यायोगात एकाच दिवसातला वृत्तांत चित्रित केलेला असावा.

साहित्यदर्पणकार विश्वनाथाने ‘सौगन्धिकाहरण’ नावाच्या व्यायोगाचा निर्देश केला आहे.

संदर्भ :

  • कंगले,र.पं, दशरूपक विधान, महाराष्ट्र राज्य साहित्य-संस्कृती मंडळ, मुंबई, १९७४.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा