संस्कृतमध्ये व्याकरणशास्त्राला ‘शब्दानुशासन’ असे संबोधले जाते. सर्वप्रथम ही संज्ञा पतंजलीकृत महाभाष्याच्या प्रारंभी येते. भाष्याची सुरुवात ‘अथशब्दानुशासनम्’ या वार्तिकाने (टीकेने) होते. भाष्यकार पतंजलीने पाणिनीची ४००० सूत्रे, कात्यायन आणि इतर वार्तिककारांची त्यांवरील वार्तिके अशा ह्या विस्तृत ग्रंथसंभाराला उद्देशून शब्दानुशासन हा शब्द वापरला आहे. तदनंतर एकंदरच व्याकरणाला अनुलक्षून हा शब्द प्रचलित झाला असावा, असे काशिनाथशास्त्री अभ्यंकरांनी आपल्या संस्कृत व्याकरणावरील संज्ञाकोशामध्ये नोंदविले आहे. म्हणूनच पाणिनीनंतर अनेक वर्षांनी हेमचंद्राने रचलेल्या सिद्धहेमचंद्र या तत्कालीन प्राकृत भाषेच्या व्याकरणग्रंथालासुद्धा ‘हेमचंद्रानुशासनम्’ म्हटले गेले. त्याचप्रमाणे पाल्यकीर्तिशाकटायन आणि देवनन्दिनी यांचे व्याकरणविषयक ग्रंथसुद्धा अनुक्रमे शाकटायन शब्दानुशासन आणि जैनेन्द्र शब्दानुशासन म्हणून नावारूपाला आले.

‘शब्दानाम् अनुशासनम्’ ‒ शब्दानुशासनम् असा या समासाचा विग्रह होतो. सुब्रमण्यम् यांनी अनुशासनम् या शब्दाची व्युत्पत्ति ‘अनुशिष्यन्ते, असाधुशब्देभ्योविविच्य ज्ञाप्यन्ते, साधुशब्दाःअनेन इति’ अशी केली आहे. त्यामुळे अनुशासन म्हणजे स्पष्टीकरण, उपपत्ती अथवा व्यवस्था लावणे होय. एकंदर भाषेतील शब्दांचे प्रकृति-प्रत्ययविभाग कल्पून त्यांची योग्य ती उपपत्ती लावणे आणि त्यायोगे साधु-असाधू शब्दांचे विवेचन करणे, असा या शब्दाचा अर्थ होय. भाष्यारंभी आलेले अथशब्दानुशासनम् हे वचन म्हणजे संपूर्ण व्याकरणशास्त्रच आपल्या अधिकारकक्षेत घेणारे वचन आहे. याच अभिप्रायाने ‘शब्द’ हा या व्याकरणशास्त्राचा विषय होय असे पतंजली म्हणतो. हे वचनसूत्र आहे, वार्तिक आहे की महाभाष्यातलेच विधान आहे, याविषयी मतभेद आहेत. या वचनाचा अर्थ ‘यापुढे शब्दांचे विवेचन करणाऱ्या शास्त्राचा (व्याकरणाचा) प्रारंभ होत आहे’ असा होतो. या भाष्याची व्याख्या करताना कैयटाने असे स्पष्ट केले आहे की, व्याकरणाची अन्वर्थसंज्ञा म्हणजे शब्दानुशासन होय. याउलट, नागेशाने आपल्या उद्योत या टीकेमध्ये ‘शब्दांची फोड करण्याचे साधन’ अर्थात ‘शब्दव्युत्पत्तीचे एक साधन’ या अर्थी ‘शब्दानुशासन’ या शब्दाची उपपत्ती लावली आहे.

संदर्भ :

  • Abhyankar, Kashinath, A Dictionary of Sanskrit Grammar, Baroda, 1986.
  • Bhate, Saroja, Panini : Makers of Indian Literature, Sahitya Akademi, ISBN: 81-260-1198-X.
  • Shastri, Vidyaranya P. S. Subrahmanya, Lectures on Patanjali’s Mahabhashya, Vol. 1, Annamalai, 1944.
  • अभ्यंकर, काशीनाथ, श्रीमद्भगवन्पतञ्जलिकृत व्याकरणामहाभाष्य, प्रस्तावना खंड, भाग सातवा, पुणे, १९२८.
  • वर्मा, सत्यकाम, संस्कृत व्याकरण का उद्भव और विकास, दिल्ली, १९७१.
  • https://www.sanskritdictionary.com/%C5%9Babd%C4%81nu%C5%9B%C4%81sana/3763/40

समीक्षक – भाग्यलता पाटस्कर

प्रतिक्रिया व्यक्त करा