संधी : संधी हे संस्कृत भाषेचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. संधी याचा शब्दशः अर्थ ‘जोड’ असा होतो. दोन वर्ण एकमेकांना जोडून उच्चारले जाताना अनेकदा उच्चारण-सौकर्यासाठी त्यांच्यात काही बदल घडून येतात. साधारणतः हेच बदल व्याकरणशास्त्रामध्ये संधी म्हणून ओळखले जातात. संधी घडून येण्यासाठी संहिता अर्थात् वर्णांमधील अत्यंत सांनिध्य गरजेचे आहे. वर्णांमध्ये संहिता असेल तर संधी होतोच.

संस्कृत भाषेत प्राचीन काळापासून प्रातिशाख्य वगैरे विविध ग्रंथांमध्ये संधि-नियमांचा सखोल विचार केलेला दिसून येतो. संधींची विभागणीही अनेकप्रकारे केलेली दिसते. याज्ञवल्क्यशिक्षा या ग्रंथामध्ये संधीचे लोप, आगम, विकार व प्रकृतिभाव असे चार प्रकार सांगितलेले आहेत. पाणिनीने अष्टाध्यायीमध्ये संधीची व्याख्या केलेली नसली तरी सहाव्या व आठव्या अध्यायांमध्ये संधिकार्ये सांगितलेली आहेत. सिद्धांतकौमुदी या प्रक्रियाग्रंथामध्ये ही संधिकार्ये पाच प्रकारात विभागलेली आहेत – अच्-संधी, प्रकृतिभाव, हल्-संधी, विसर्ग-संधी आणि स्वादि-संधी. याखेरीज अंतःसंधी (एका पदामध्ये घडून येणारा संधी) व बहिःसंधी (दोन पदे एकमेकांच्या नजीक उच्चारली असता घडून येणारा संधी) अशीही संधीची विभागणी अलीकडे केलेली दिसून येते. यांतील काही महत्त्वाचे संधिनियम पुढीलप्रमाणे सांगता येतील.

अच्-संधी / स्वर-संधी : हा संधी दोन स्वरांमध्ये घडून येतो.

 • ह्रस्व अथवा दीर्घ अ, इ, उ, ऋ या स्वरांपुढे त्यांचे सवर्ण म्हणजेच सजातीय स्वर आल्यास त्या दोहोंच्या जागी त्यांना सवर्ण असा दीर्घ स्वर येतो. उदा. क्रीडाङ्गणम् (क्रीडा + अङ्गणम्), कवीन्द्रः (कवि + इन्द्रः), भानूदयः (भानु + उदयः), पितॄणम् (पितृ + ऋणम्).
 • अ किंवा आ च्या पुढे ह्रस्व अथवा दीर्घ अ, इ, उ, ऋ, लृ आल्यास दोन्ही स्वरांच्या जागी अनुक्रमे ए, ओ, अर्, अल् येतात. अ, ए, ओ या स्वरांना ‘गुण’ अशी संज्ञा आहे. म्हणून हा संधी गुणसंधी होय. उदा. पूर्णेन्दुः (पूर्ण + इन्दुः), गीतोपदेशः (गीता +उपदेशः), देवर्षिः (देव + ऋषिः), तवल्कारः (तव + लृकारः).
 • अ किंवा आ च्या पुढे ए किंवा ऐ आल्यास दोन्ही स्वरांच्या जागी ऐ होतो आणि पुढे ओ किंवा औ आल्यास दोन्ही स्वरांच्या जागी औ होतो. आ, ऐ, औ या स्वरांना ‘वृद्धि’ अशी संज्ञा आहे. म्हणून हा संधी वृद्धिसंधी होय. उदा. तवैव (तव + एव), मतैक्यम् (मत + ऐक्यम्), गङ्गौघः (गङ्गा + ओघः) मधुरौषधम् (मधुर + औषधम्).
 • ह्रस्व अथवा दीर्घ इ, उ, ऋ, लृ या स्वरांपुढे असवर्ण म्हणजेच विजातीय स्वर आल्यास त्यांच्या जागी अनुक्रमे य्, व्, र्, ल् येतात. उदा.नद्यवतरति (नदी + अवतरति), भवत्विति (भवतु + इति), पित्रत्र (पितृ + अत्र), लाकृतिः (लृ + आकृतिः).
 • ए, ऐ, ओ, औ यांच्यापुढे कोणताही स्वर आल्यास त्यांच्या जागी अनुक्रमे अय्, आय्, अव्, आव् येतात. मात्र हे अय् वगैरे आदेश पदाच्या शेवटी आल्यास त्यांतील य् आणि व् चा विकल्पाने लोप होतो आणि शिल्लक राहिलेल्या स्वरांमध्ये पुढे संधी होत नाही. उदा. नायकः (नै + अकः), पावकः (पौ + अकः); पण समीपयेव / समीपे एव (समीपे + एव), तस्मायिदम् / तस्मा इदम् (तस्मै + इदम्), विष्णविति / विष्ण इति (विष्णो + इति), द्वावपि / द्वा अपि (द्वौ + अपि).
 • ए, ओ पदाच्या शेवटी असून पुढे ह्रस्व अ आल्यास त्या अ चा लोप होतो व लोप झालेल्या ठिकाणी अवग्रह-चिह्न (ऽ) येते.उदा. लोकेऽस्मिन् (लोके + अस्मिन्), भानोऽत्र (भानो + अत्र)

*प्रकृतिभाव – काही वेळा दोन स्वरांमध्ये संधीचा प्रसंग असूनसुद्धा संधी होत नाही. यालाच प्रकृतिभाव म्हणतात. जसे, शब्दाच्या द्विवचनी रूपाच्या शेवटी ई, ऊ किंवा ए हे स्वर आल्यास त्यांचा पुढील स्वराशी संधी होत नाही. उदा. हरी एतौ (हरी + एतौ), धेनू इति (धेनू + इति), विद्ये इति (विद्ये + इति).

हल्-संधी / व्यंजन-संधी : एका व्यंजनापुढे दुसरे व्यजन किंवा स्वर आला असता हा संधी होतो.

 • स् व त वर्गातील व्यंजन यांचा श् व च वर्गातील व्यंजन यांच्याशी संवंध आला असता स् च्या जागी श् व त वर्गातील व्यंजनाच्या जागी अनुक्रमानुसार च वर्गातील व्यंजन येते. तसेच, त्यांचा ष् व ट वर्गातील व्यंजन यांच्याशी संवंध आला असता स् च्या जागी ष् व त वर्गातील व्यंजनाच्या जागी अनुक्रमानुसार ट वर्गातील व्यंजन येते. उदा. बहिश्शेते (बहिस् + शेते), अधश्च (अधस् + च), तच्चरितम् (तत् + चरितम्).
 • अनुनासिक व अन्तःस्थ व्यंजन सोडून इतर कोणत्याही व्यंजनापुढे अघोष व्यंजन आले असता मागील व्यंजनाच्या जागी त्याच्या वर्गातील पहिले व्यंजन येते, तर पुढे स्वर किंवा घोष व्यंजन आले असता मागील व्यंजनाच्या जागी त्याच्या वर्गातील तिसरे व्यंजन येते. उदा. क्षुत्पीडा (क्षुध् + पीडा), एतत्त्वया (एतद् + त्वया), वागीशः (वाक् + ईश), समिदाहरणम् (समिध् + आहरणम्), तद्गच्छति (तत् + गच्छति), सम्राड्जयति (सम्राट् + जयति).
 • पदाच्या शेवटी आलेल्या वर्गीय व्यंजनापुढे अनुनासिक व्यंजन आले असता मागील व्यंजनाच्या जागी विकल्पाने त्याच्याच वर्गातील अनुनासिक होते व अनुनासिक न झाल्यास त्याच्या वर्गातील तिसरे व्यंजन येते. मात्र प्रत्ययातील अनुनासिक व्यंजन पुढे आल्यास मागील व्यंजनाच्या जागी नित्य अनुनासिक होते. उदा. तावन्मम / तावद्मम (तावत् + मम), वाङ्मधुरा /वाग्मधुरा (वाक् + मधुरा), तन्नामधेयम् / तद्नामधेयम् (तत् + नामधेयम्), तन्मय (तत् + मय), तन्मात्रम् (तत् + मात्रम्).
 • ज्यांच्या मागे र्हस्व स्वर आहे असे ङ्, ण्, न् पदाच्या शेवटी आल्यास व पुढे कोणताही स्वर आल्यास ङ्, ण्, न् या व्यंजनांचे द्वित्व होते. उदा. तस्मिन्नुत्सवे (तस्मिन् + उत्सवे), प्रत्यङ्ङात्मा (प्रत्यङ् + आत्मा), सुगण्णीशः (सुगण् + ईशः).
 • ऊष्म व्यंजन वगळून इतर कोणतेही व्यंजन पुढे आल्यास अनुस्वाराच्या जागी पुढील व्यंजनाशी सवर्ण असलेले अनुनासिक येते. एका पदात हा संधी नित्य होतो. पण अनुस्वार जर पदाच्या शेवटी असेल तर हा संधी विकल्पाने होतो. उदा. गङ्गा, कुण्ठितः, शान्तम्, कम्पितः, हरिं पूजयति / हरिम्पूजयति, यं लोकम् / यल्ँलोकम्.
 • त-वर्गातील व्यंजनाच्या पुढे ल् आला असता त-वर्गातील व्यंजनाच्या जागी ल् येतो व न् च्या जागी ल्ँ येतो. उदा. तल्लयः (तत् + लयः), विद्वाल्ँलिखति (विद्वान् + लिखति).
 • ह्रस्व किंवा दीर्घ स्वरापुढे छ् आला असता छ् च्या जागी च्छ् येतो. मात्र पदाच्या शेवटी दीर्घ स्वर आला असून त्यापुढे छ् आला असता च्छ् विकल्पाने होतो. उदा. शिवच्छाया (शिव + छाया), लक्ष्मीच्छाया / लक्ष्मी छाया (लक्ष्मी + छाया)

विसर्ग-संधी

 • विसर्गाच्या मागे अ व पुढे अ अथवा घोष व्यंजन आले असता त्या विसर्गाच्या जागी उ येतो. मागील अ बरोबर उ चा संधी होऊन दोहोंच्या जागी ओ येतो. उदा. मयूरो नृत्यति (मयूरः+ नृत्यति), गोपालोऽस्ति (गोपालः +अस्ति).
 • विसर्गाच्या मागे अ व पुढे अ खेरीज कोणताही स्वर आल्यास त्या विसर्गाचा लोप होतो व पुढे संधी होत नाही. उदा. नृप आगच्छति (नृपः +आगच्छति), गणेश उपास्यते (गणेशः+ उपास्यते).
 • विसर्गाच्या मागे आ व पुढे कोणताही स्वर अथवा घोष व्यंजन आल्यास त्या विसर्गाचा लोप होतो व पुढे संधी होत नाही. उदा. बालिका इच्छन्ति (बालिकाः + इच्छन्ति), सूक्ष्मा एव (सूक्ष्माः+ एव),वृक्षा राजन्ते (वृक्षाः + राजन्ते).
 • विसर्गाच्या मागे अ अथवा आ सोडून कोणताही स्वर असून पुढे कोणताही स्वर अथवा घोष व्यंजन आल्यास त्या विसर्गाचा र् होतो. उदा. रिपुर्वदति (रिपुः + वदति), मतिर्मम (मतिः + मम)
 • विसर्गाच्या पुढे च्, छ्, श् आल्यास विसर्गाच्या जागी श् होतो, पुढे ट्, ठ्, ष् आल्यास विसर्गाच्या जागी ष् होतो व पुढे त्, थ्, स् आल्यास विसर्गाच्या जागी स् होतो. उदा. वायुश्शीतलः(वायुः + शीतलः), कवेश्चरितम् (कवेः + चरितम्), धेनुष्टीकते (धेनुः + टीकते) कार्तिकेयष्षाण्मातुरः (कार्तिकेयः + षाण्मातुरः), नद्यास्तटः (नद्याः + तटः), बालकस्समाविष्टः (बालकः + समाविष्टः).
 • सः आणि एषः यांच्यापुढे अ खेरीज कोणताही वर्ण आला असता त्यांच्या विसर्गाचा लोप होतो. उदा. स वदति (सः + वदति), एष गजाननः (एषः + गजाननः)

थोडक्यात, संधी करताना वर्णांमध्ये अनेक प्रकारे परिवर्तन घडून येते. वाक्यामध्ये संहिता वक्त्याच्या इच्छेवर अवलंबून असल्याने संधिकार्ये बंधनकारक ठरत नाहीत. मात्र इतरत्र म्हणजेच एक पद, धातू व उपसर्ग आणि समास यांमध्ये संधी नित्य होतो.

संदर्भ : १. Kantawala, S. G. (Gen. Ed.).,  A Dictionary of Sanskrit Grammar. No. 134, Oriental Institute,Baroda: 1986. २.दीक्षित, अमरनाथशास्त्री (संपा.), याज्ञवल्क्यशिक्षा’शिक्षावल्लीविवृतिसमलङ्कृता’, इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र,नवी दिल्ली.

३.देसाई, राजाराम दामोदर, संस्कृतप्रवेशः,  कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे, १९९४.

Keywords : #संहिता, #प्रातिशाख्य, #शिक्षाग्रन्थ, #अष्टाध्यायी