सद्यस्थितीत उच्च शिक्षणात अमूलाग्र बदल घडून येत आहेत. शिक्षणाची उपलब्धता आणि संधी यापूढे एक पाऊल टाकून उच्च शिक्षणातील गुणवत्तेचा संबंध रोजंदारी देण्यायोग्य असे मनुष्यबळ तयार करण्याशी आहे. केवळ पदवी आणि गुण मिळवून हे उद्दिष्ट साध्य होत नाही. त्यामूळेच सध्याच्या शिक्षण पद्धतीमध्ये बदल घडवून आणण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. कृतीशील आणि संकल्पनात्मक शिक्षणाचा विचार हा त्याचा पाया आहे. त्यामूळे कौशल्य विकासाला चालना मिळून विद्यार्थ्यांच्या क्षमतांचा विकास होण्यास मदत होईल. कौशल्य विकासाचा विचार अनेक दशंकापासून होत असला तरी उच्च शिक्षणावरील त्याचा प्रभाव नगण्यच राहिला आहे. कौशल्य हा पारंपारिक अभ्यासक्रमाचा अंतर्भूत घटक न होण्यामुळे हे घडले. आता ‘निवडीवर आधारित श्रेयांकन पद्धत’ अनिवार्य केल्यामूळे कौशल्य विकासाला चालना मिळेल. कारण या पद्धतीत कौशल्य विकासाची चौकट तयार करण्यात आली आहे. कौशल्यावर आधारित अभ्यासक्रमांना पारंपारिक अभ्यासक्रमाशी समकक्षता देण्यात आली आहे. पारंपारिक महाविद्यालयाबरोबरच कम्युनिटी कॉलेजची संकल्पना राबविण्यात येत आहे.
व्यवसाय योग्य मनुष्यबळ तयार करण्याच्या पद्धतीत मूलभूत क्षमता विकासाबरोबरच उद्योगात असणे जरूरीचे असते. एकविसाव्या शतकात हाच कळीचा मूद्दा आहे. तंत्रज्ञानात होणारे बदल हे झटपट आणि अनपेक्षित असे आहेत. अशा वेळी विद्यार्थ्यांनर पदवी शिक्षणाच्या काळात कोणती कौशल्ये विकसित करावीत? या प्रश्नाचे उत्तर देणे अवघड जाते. अशा वेळी अब्जांशी तंत्रज्ञानाचा विचार लाभदायक ठरू शकतो. कारण अब्जांशी तंत्रज्ञान हे भविष्यकालीन तंत्रज्ञान आहे. या तंत्रज्ञान विकासाच्या अमर्याद शक्यता आहेत. त्यात खूप आव्हाने असून प्रत्येक स्तरावर सहभागाची आणि योगदानाची संधी आहे.
संशोधन हा तंत्रज्ञान विकासाचा पाया असतो. अब्जांशी तंत्रज्ञानाच्या विकासासाठी अब्जांशी कणांची निर्मिती हा आवश्यक घटक आहे. यासाठी भौतिक, रासायनिक आणि जैविक पद्धतीचा वापर केला जातो. भौतिक आणि रासायनिक पद्धती या विषारी घटक निर्माण करतात. यामूळे पर्यावरणाला धोका संभवतो. जैविक पद्धती या सुरक्षित आणि पर्यावरण रक्षणाला पूरक आहेत. या पद्धतीच्या विकासाला वाव आहे. अणूंच्या हव्या तशा रचना करण्यासाठी खूप प्रगत, गुंतागुंतीच्या आणि कल्पक पद्धतींचा वापर करणे आवश्यक आहे. जगातील प्रगत प्रयोगशाळेत याविषयीचे प्रयोग सुरू आहेत. अद्यापही अशा पद्धतींचा विकास पू्र्णत्वाने झालेला नाही. पदवी आणि पदव्यूत्तर स्तरावर अशा पद्धतींना पूरक अशा प्राथमिक कौशल्यांची ओळख आणि प्रशिक्षण देता येईल.
अब्जांशी तंत्रज्ञान विकास आणि वापर यासाठी आवश्यक अशी मानसिकता विकसित करण्याची तितकीच आवश्यकता आहे. जीवाणूंचा शोध लागेपर्यंत डोळ्यांना न दिसणारे सजीव असू शकतात अशी कल्पनाही कोणी करीत नव्हते. सुक्ष्मदर्शकाद्वारे त्यांचे अस्तित्त्व सिद्ध झाल्यानंतर त्यांच्या परिणामांचा विचार सुरू झाला. त्यामुळे रोगांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. प्रचलित तंत्रज्ञानाकडून अब्जांशी तंत्रज्ञानाकडे जाताना हा बदल अपेक्षित असेल. टाचणीच्या टोकावर मावेल एवढ्या आकाराच्या कॅमेऱ्याची निर्मिती आणि वापर यासाठी मानसिकतेतील बदल आवश्यक ठरेल. सुक्ष्म घटकांचा अभ्यास करतांना सर्व बाबी डोळ्यांसमोर असतीलच असे नाही. अशावेळी अफाट कल्पनाशक्ती आणि आभासी पातळीवर विचार करण्याची क्षमता विकसित करावी लागेल.
सद्यस्थितीत अब्जांश तंत्रज्ञान निर्मितीसाठी आवश्यक संशोधनासाठी अनेक पद्धती आणि उपकरणांचा वापर करण्यात येतो. या पद्धतीमध्ये आणि उपकरणांच्या वापरासाठी त्याचप्रमाणे नवीन पद्धती विकसित करण्यासाठी कुशल मनुष्यबळाची गरज आहे. उच्च शिक्षणातील कौशल्य विकास घटकात यांचा समावेश करावा लागेल. आरोग्य, कृषी, सौंदर्य प्रसाधने, ऊर्जा, यंत्रमानव, पर्यावरण अशा अनेक क्षेत्रांमध्ये अब्जांशी तंत्रज्ञान उपयुक्त ठरणार आहे. यासाठी आंतरविद्याशाखीय विचारसरणी अवलंबावी लागेल.
कौशल्य विकासाचे प्रशिक्षण अभ्यासक्रम अनेक स्तरावर चालवले जातात. माध्यमिक स्तरांपासून या प्रशिक्षणाची सुरूवात होते. उच्च शिक्षणात पाचव्या स्तरानंतरचे अभ्यासक्रम येतात. महाविद्यालय आणि विद्यापीठ स्तरांवर अशा प्रशिक्षणाची सोय केली जाते. पारंपारिक पदवीचे शिक्षण घेतांना पूरक अभ्यासक्रमाद्वारे ही कौशल्ये आत्मसात करता येणे शक्य आहे. विशेषत: अब्जांशी तंत्रज्ञानाचे उपयोजन करण्यासाठी लागणारे तांत्रिक मनुष्यबळ याद्वारे निर्माण करता येईल.
सद्यस्थितीत वैद्यक क्षेत्रात प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी कुशल मनुष्यबळाची आवश्यकता असते. मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजींग (एमआरआय), कॉम्यटेड टोमोग्राफी (सीटीस्कॅन), अँजिओप्लास्टीमध्ये कॅथेटरचे नियोजन अशा अनेक उपकरणांच्या वापरासाठी कुशल तांत्रिक मनुष्यबळ लागते. अब्जांशी तंत्रज्ञानाच्या वैद्यकशास्त्रातील उपयोजनासाठी खास प्रशिक्षणाची आवश्यकता भासेल. उदाहरणार्थ यंत्राचा वापर करून योग्य त्या ठिकाणी औषध पोहचवाचे असेल तर ती पद्धत आत्मसात करावी लागेल. या बरोबरच पर्यावरण, ऊर्जा, संवेदकांचा आणि यंत्रमानवांचा उपयोग, खनिज तेलाचे उत्पादन या आणि अशा अनेक क्षेत्रात अब्जांशी तंत्रज्ञानाचे उपयोजन महत्त्वाचे ठरणार आहे. त्यासाठी तांत्रिक मनुष्यबळ निर्मितीचा पाया आताच घातला पाहिजे.
कौशल्य विकासासाठी राबविण्यात येणारे प्रचलित अभ्यासक्रम प्रचलित तंत्रज्ञानावर आधारित आहेत. यात अब्जांशी तंत्रज्ञानाशी संबंधीत तंत्रज्ञानाचा समावेश कसा करता येईल याचा विचार आत्तापासूनच करणे योग्य होईल. त्याची सुरवात अब्जांशी तंत्रज्ञानाच्या सर्व घटकांच्या ओळखीपासून करता येईल. स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाच्या मार्गदर्शनाखाली तयार केलेल्या या ज्ञानमंडळाच्या लेखननोंदी त्यासाठी पायाभूत ठरू शकतील. अशा प्रकारचे कार्य हे भविष्यकालीन तंत्रज्ञानाचा विकास आणि उपयोजन यासाठी टाकलेले महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.
समीक्षक : वसंत वाघ