क्रिओल : दोन किंवा अधिक भाषांच्या मिश्रणातून तयार होणारी भाषा. ही भाषा एका कार्यक्षेत्रापुरती मर्यादित न राहता एका सबंध पिढीची आणि त्यानंतर सबंध समाजाची निजभाषा किंवा मातृभाषा बनण्याची प्रक्रिया सुरू होते. अशा प्रकारे मर्यादित स्वरूपाच्या पिजिनमधून पूर्णकारी स्वरूप प्राप्त झालेल्या भाषेला क्रिओल म्हणतात आणि या प्रक्रियेला क्रिओलायझेशन म्हणतात. ही प्रक्रिया पिजिन तयार होण्याच्या प्रक्रियेच्या उलट दिशेने घडते. पिजिन तयार होताना भाषांचे आकुंचन होते, तर क्रिओल तयार होताना भाषेचा विस्तार होतो आणि ती हळूहळू जगण्याच्या सर्व कार्यक्षेत्रांसाठी उपयुक्त बनू लागते. तसेच व्यावहारिक दृष्ट्या आदान-प्रदानाची सामान्य लोकांची ती जनभाषा होते. ही प्रक्रिया होताना पिजिन भाषेच्या मर्यादित व्याकरणव्यवस्थेची पुनर्रचना झाली; पिजिनमधील वर्चस्व असणाऱ्या भाषेमधून अथवा इतर छोट्या-छोट्या बोलींमधून किंवा त्या दोन्हींमधून संयुक्तपणे शब्द घेऊन क्रिओल भाषेचा शब्दसंचय पुरेसा केला जातो. याची काही उदाहरणे अशी : अमेरिकेच्या दक्षिण कॅरोलिनातील सागरी बेटांवर बोलली जाणारी इंग्रजी भाषासाधित शब्द गुल्लाह किंवा सिएरा लिओनमधील क्रिओ; फ्रेंच भाषासाधित लुइझिअना क्रिओल किंवा हायसियन क्रिओल; स्पॅनिश आणि पोर्तुगीज भाषा साधित क्यूरॅकाओ, अरुबा व बॉनेअर बेटांवर बोलली जाणारी पॅपियामेंटो तसेच भारतामध्ये महाराष्ट्र राज्यातील कोर्लई गावात बोलली जाणारी मराठी-पोर्तुगीज भाषांच्या संकरातून निर्माण झालेली क्रियोल इत्यादी. वेस्ट इंडीज बेटांपैकी जमैका या बेटावर बोलली जाणारी जमेकन टॉक ही भाषा क्रिओलचे उत्तम उदाहरण आहे. १९५५ सालापासून इंग्रजी ही जमेकाची शासकीय भाषा असली, तरी जमेकन लोक (आफ्रिकी निग्रोवंशीय) त्यांच्या क्रिओल भाषेचाच वापर करतात. इंग्रजीची वाक्यरचना आणि मुळच्या आफ्रिकन भाषेचा हेल असा हा संकर झाला आहे. सुशिक्षित, शहरी, उच्चवर्गीय जमेकन लोक जी भाषा बोलतात, ती इंग्रजी भाषकाला समजते, परंतु अशिक्षितांची जमेकन क्रिओल इंग्रज भाषकाला समजायला अवघड जाते. जमेकातील शिक्षणाचे माध्यमही ही क्रिओल भाषा आहे. क्रिओल भाषांच्या निर्मितीबद्दल डेरेक बिकरटनने ‘बायोप्रोग्राम’ असा एक सिद्धांत मांडला आहे. लहान मुलामध्ये जन्मत: भाषा शिकण्याची क्षमता असते, या चॉम्स्कीच्या मताला बिकरटन दुजोरा देतात; पण लहान मुलाला जर जन्मल्यापासून फक्त पिजिन भाषाच प्रथमभाषा म्हणून ऐकायला मिळाली, तर त्याच्यातली भाषेच्या नियमांचे अनुमान करण्याची भाषाक्षमता पूर्णपणे वापरली जात नाही. त्यामुळे तो स्वत:ची नवीन भाषा तयार करतो. बायोप्रोग्राम म्हणजेच त्याची भाषिक क्षमता त्याला शब्द पुरवत नाही; पण वाक्यव्यवस्था आणि अर्थव्यवस्था आपोआप घडल्या जातात. मूल जसजसे मोठे होत जाते, तसतशी त्याची भाषा अधिक समृद्ध, अधिक पूर्णाकारी बनत जाते. याचाच अर्थ पिजिन भाषेची क्रिओल बनवण्यात लहान मुलाचा महत्वाचा वाटा असतो.

बिकरटनच्या मते पिजिनची निर्मिती हे एकप्रकारे द्वितीय भाषा संपादन असते; कारण लक्ष्यभाषा शिकण्याप्रमाणेच पिजिन शिकणा-याला अभिव्यक्तीचे कमी प्रकार अवगत होतात; परंतु क्रिओल शिकणे हे प्रथमभाषा भाषाग्रहणासारखे असते. बिकरटनने अभ्यासलेल्या सर्व क्रिओलाची रचना एकसारखी होती. परंतु त्या ज्या पिजिनपासून विकसित झाल्या होत्या, त्या पिजिनमध्ये अंतर्भूत असणाऱ्या छोट्या-छोट्या भाषा मात्र वेगवेगळ्या होत्या. त्याने सर्व क्रिओलमधे आढळणाऱ्या सर्वसामान्य अशा १२ व्याकरणाच्या रचनांची यादी केली आहे. या रचना म्हणजे बायोप्रोग्राम या संकल्पनेतले नैसर्गिक व्याकरण आहे. काही विद्वानांचे असे मत आहे, की ज्या युरोपियन भाषांपासून पिजिन आणि क्रिओल बनल्या, त्या भाषांची रचना बरीचशी सारखी होती. काही भाषावैज्ञानिकांच्या दृष्टिकोनातून हिंदीचा उगमही फार्सी-अरेबिक व स्थानिक बोली यांच्या संकरातून झाला असावा. साउथवर्थ या भाषावैज्ञानिकाच्या मते मराठीचे मूळही पिजिनमध्ये आहे. आर्य व द्रविड या संस्कृतींचा जेव्हा संपर्क आला, तेव्हा सुरुवातीच्या काळात पिजिन भाषा निर्माण झाल्या असाव्यात. उत्तर भारतात द्रविड लोकांवर आर्यांनी आपली भाषा लादली असावी. द्रविडांना आपल्या भाषेचा त्याग करणे भाग पडले असावे. त्यातून प्राकृत भाषांच्या आणि स्थानिक द्रविड बोलींच्या संकरातून पिजिन निर्माण झाल्या असाव्यात. कालांतराने त्यातून क्रिओल निर्माण झाल्या असाव्यात. म्हणजे मराठी ही क्रिओल झालेली भाषा आहे असे  फ्रॅन्कलीन साउथवर्थ यांचे मत आहे.

संदर्भ :

  • कुलकर्णी-जोशी,सोनल, सामाजिक भाषाविज्ञानातील संख्यात्मक पद्धती, भाषा आणि जीवन, दिवाळी अंक, २००९.
  • धोंगडे, रमेश सामाजिक भाषाविज्ञान,दिलीपराज प्रकाशन, पुणे, २००६.
  • मालशे, मिलिंद स.आधुनिक भाषाविज्ञान: सिद्धांत आणि उपयोजन, लोकवाङमयगृह, मुंबई, २००४.
  • हडसन, आर्. ए. सोसिओलिंग्विस्टिक्स. केम्ब्रिज, २००९.