उच्चारणाद्वारे केल्या जाणाऱ्या कृती म्हणजे भाषिक कृती. माणूस भाषेचा उपयोग फक्त माहिती देण्यासाठी करतो असे नाही तर भाषेद्वारे काही वेळा तो एखादी कृतीपण करतो. विनंती करणे, आज्ञा करणे, क्षमा मागणे, निमंत्रण देणे, वचन देणे, तक्रार करणे, प्रशंसा करणे या सगळ्या भाषिक कृती आहेत. भाषावापरशास्त्राच्या क्षेत्रात भाषिक कृतींच्या अभ्यासाला Speech Act Theory असे संबोधले जाते. ब्रिटिश तत्त्वज्ञ जे. एल. ऑस्टिन यांनी १९६२ मध्ये या विषयाची प्रथम मांडणी केली. तिचा विस्तार पुढे दुसरे ब्रिटिश तत्त्वज्ञ जॉन सर्ल व इतर अनेकांनी केला.

वक्ता जेव्हा बोलतो तेव्हा ऐकणाऱ्याला आपले बोलणे कळणार आहे हे त्याला माहीत असते. कारण वक्ता आणि श्रोता एकाच भाषिक पर्यावरणात असतात. भाषिक पर्यावरण महत्त्वाचे असते याचे कारण भाषिक कृतींचा अर्थ त्यांच्या संदर्भातच ठरतो. उदा.’काय चित्रपट होता तो!’ हे वाक्य चित्रपटाची प्रशंसा करणारे आहे की टीका करणारे आहे हे वक्ता-श्रोत्याच्या सामायिक भाषिक पर्यावरणातच एकमेकांना कळू शकते.

कोणत्याही प्रसंगी उच्चारल्या जाणाऱ्या भाषिक कृती तीन प्रकारच्या असतात.

  • मूळ उच्चारण कृती–फक्त उच्चारण.
  • संप्रेषण कृती – वाक्य उच्चारताना, त्या उच्चारणामागे संप्रेषणाची तीव्र प्रेरणा असते. उदा. ‘मी जाणार आहे आज नाटकाला.’ हे वाक्य उच्चारताना दुसऱ्या व्यक्तीला आमंत्रित करण्याची प्रेरणा असेल किंवा त्या नाटकाविषयी आपण उद्या बोलू, असे सांगायचे असेल. जे असेल ते संप्रेषित करण्याची प्रेरणा त्या वाक्यामागे असते.
  • परिणामसापेक्ष/पर्यवसायीभाषिक कृती – आपल्याला आपल्या वाक्याचा काही परिणाम अपेक्षित असतो. म्हणूनच आपण बोलतो. आपल्या वाक्याचा अपेक्षित परिणाम म्हणून श्रोत्याकडून कृती केली गेली तर ती परिणामसापेक्ष कृती ठरते. उदा.

‘दूध आत ठेवलंयस ना तू?’ असं बायको विचारते तेव्हा नवऱ्याने उठून दूध आत ठेवले आहे का ते बघणे किंवा ठेवले नसल्यास आत ठेवणे ही कृती परिणामसापेक्ष होय.

 

या तिन्ही कृतींपैकी संप्रेषण कृतीचीच चर्चा अधिक झाली आहे. किंबहुना, भाषिक कृती या संकल्पनेचा अर्थ कधी कधी संकुचितपणे उद्गारामागील संप्रेषणाची प्रेरणा एवढाच घेतला जातो. एखाद्या उद्गारामागील संप्रेषणाची प्रेरणा नेमकी ओळखणे तितकेसे सोपे नाही. ‘उद्या बोलू.’ हे साधे वाक्य घेतले तर

  • उद्या भेटण्याचे वचन.
  • विषयाची टाळाटाळ.
  • या प्रश्नातून मार्ग काण्याचे आश्वासन.

अशा दोन-तीन संप्रेषण प्रेरणा संभवतात. अशावेळी नेमकी कोणती प्रेरणा गृहीत धरावी हा प्रश्न पडतो. आपली संप्रेषण प्रेरणा श्रोत्याला कळणार आहे हे वक्त्याला कुठल्या गोष्टीमुळे कळते हे विचारात घेताना दोन बाबी महत्त्वाच्या ठरतात.

  • संप्रेषण प्रेरणा दर्शवणारे घटक
  • उचिततेच्या अटी.

संप्रेषण प्रेरणा दर्शवणाऱ्या घटकांपैकी पहिला स्पष्ट घटक म्हणजे क्रियापदाचे रूप.

  • मी वचन देतो…
  • मी शपथ घेतो…
  • मी आमंत्रित करतो…

ही सगळी त्या त्या कृती प्रत्यक्ष सादर करणारी क्रियापदांची रूपे आहेत. उदा.

वचन देण्याची कृती ‘मी वचन देतो…’ या क्रियापदातून प्रत्यक्ष पूर्ण होते. अशा क्रियापदांना प्रत्यक्ष कृती सादर करणारी क्रियापदे म्हणतात. पण प्रत्येक वेळी भाषिक कृतीत प्रत्यक्ष कृती सादर करणारी क्रियापदे असतीलच असे नाही. उदा.’मी झोपतोय’ या वाक्यात प्रत्यक्ष भाषिक कृती दिसत नसली तरी एखादी व्यक्ती टि. व्ही. लावत असताना जर दुसऱ्या व्यक्तीने हे वाक्य उच्चारले असेल तर ती टि. व्ही. न लावण्याची अप्रत्यक्ष ताकीद असू शकते.

‘मी झोपतोय’ – नवरा बायकोला झोपताना सांगतोय – या भाषिक घटनेतले हे वाक्य आणि एखादी व्यक्ती टि. व्ही. लावत असताना जर दुसऱ्या व्यक्तीने हे वाक्य उच्चारले असेल तर त्या भाषिक घटनेतले हे वाक्य ही दोन्ही वाक्ये वेगवेगळ्या भाषिक कृती असल्याने हे स्पष्टच आहे की एक वाक्य  = एक कृती असे समीकरण असू शकत नाही.

कृती सादर करणाऱ्या क्रियापदाच्या रूपाखेरीज सुरयोजन, शब्दक्रम वगैरे गोष्टी अर्थनिर्मिती करणाऱ्या महत्त्वाच्या घटकांपैकी आहेत.

मी झोपतोय     –           फक्त माहिती

मी झोपतोय?   –           काहीतरी काय बोलतोयस?

झोपतोय मी     –           इतका वेळ वाट पाहिली. आता मी थांबत नाही.

 

उचिततेच्या अटी: एखादी भाषिक कृती वक्त्याच्या मनातील भाव संप्रेषित करण्यासाठी योग्य ठरावी म्हणून स्थल, काल, परिस्थितीच्या काही अटीपण असतात. त्यांना उचिततेच्या अटी म्हणतात. “आता मी आजच्या वक्त्यांना विनंती करतो की त्यांनी चार शब्द बोलावेत.” ह्यातील ‘विनंती करतो’ ही भाषिक कृती एखाद्या सभेच्या ठिकाणी उचित आहे. जर एखाद्या व्यक्तीने हे वाक्य घरात उच्चारले तर ते व्याकरणिक दृष्ट्या योग्य असले तरी त्याचा अभिप्रेत अर्थ वरील वाक्यात जो असेल तो निश्चित नसणार. म्हणजे उच्चारण्याच्या स्थल, काल, परिस्थितीच्या मर्यादा किंवा अटी भाषिक कृतींना असतातच.

प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष भाषिक कृती:

भाषिक कृतीसामान्यत: तीन प्रकारच्या वाक्यरचनांमध्ये विभागता येतात.

  • विधानात्मक
  • प्रश्नात्मक
  • आज्ञार्थक

या तिन्ही प्रकारच्या वाक्यरचना अनुक्रमे विधान, प्रश्न आणि आज्ञा या संप्रेषण कार्यांशी सरळसरळ निगडीत आहेत.

  • तू पोहे खाल्लेस. (विधान)
  • तू पोहे खाल्लेस का? (प्रश्न)
  • तू पोहे खा. (आज्ञा)

जेव्हा रचना आणि कार्य यांचा असा सरळसरळ संबंध असतो तेव्हा ती प्रत्यक्ष भाषिक कृती असते. जेव्हा विधानात्मक = विधान, प्रश्नात्मक = प्रश्न आणि आज्ञार्थक = आज्ञा असा प्रत्यक्ष संबंध नसेल तेव्हा तिथे अप्रत्यक्ष भाषिक कृती घडते.

उदा. ‘उकडतंय का?’ हा प्रश्न पंखा लावण्याची विनंती म्हणूनही केला जाऊ शकतो. तेव्हा ती अप्रत्यक्ष भाषिक कृती होते.

संदर्भ :

  • Austin J. L., How to Do Things with Words, Oxford: Clarendon Press,1962.

प्रतिक्रिया व्यक्त करा