संभाषणातील संदर्भ सूचित करणारे भाषिक दुवे. उपयोजन ,अर्थविचार आणि भाषावापर या तीन दृष्टीकोनातून जागतिक पातळीवर बहुविध भाषांमध्ये संभाषणदर्शकांचा अभ्यास केला गेला आहे. भाषावापराचे घटक, संभाषणाचे घटक आणि संभाषणाचे दुवे मुख्यत: या पद्धतीने संभाषण दर्शकाचा उल्लेख केला जातो . वेगवेगळ्या संभाषण पातळ्यांवर काम करणारी संभाषणदर्शके ही  संभाषणाच्या संदर्भाची कळ असतात. वक्त्याची रणनीती, त्याचे अंत:स्थ हेतू याच विशिष्ट भाषिक दुव्यांद्वारे ओळखून श्रोता, वक्त्याला काय म्हणायचे आहे हे समजून घेतो. संभाषणात आणि संभाषणातल्या वक्ता बदलणे, विषयाचा ताबा घेणे किंवा नवीन मुद्दा मांडणे यांसारख्या मौखिक कृतीत संभाषणदर्शकांचा सहभाग असतो. संभाषणदर्शके कधी सुरतानात्मक (Prosodic),  कधी स्वनिमिक, रूपविचारात्मक, वाक्यविचारात्मक असतात.

मराठीतील संभाषणदर्शकाचे एक उदा. पाहू. बरं हे संभाषणदर्शक वेगवेगळ्या संभाषणांच्या संदर्भात वेगवेगळी कार्ये करताना दिसते.

  • बरं, आता कसंय तुमचं?’- इथे बरं हे फक्त ‘चौकशी’ चे, वक्त्याकडून आणखी माहिती मिळवण्यासाठी त्याला बोलायला प्रवृत्त करण्याचे कार्य करते. संभाषणातला श्रोत्याचा सहभाग अधोरेखित करते. इथे संभाषणाची सुरुवात करून देणारा हा दुवा आहे.
  • रोगी: माझ्या पोटात दुखतंय

डॉ. : बरं,

रोगी: आणि चक्करपण येतेय.

डॉ. : बरं?

या उदाहरणात संभाषणात सहभागी होणे, वक्त्याबरोबर सुसंवाद प्रस्थापित करणे, त्याला पुढील संभाषणाला प्रवृत्त करणे ही कार्ये बरं हे संभाषणदर्शक करते. इथे डॉक्टरांना रोग्याला आपण त्याचे बोलणे नीट ऐकतो आहोत असा विश्वास द्यायचा आहे. त्यामुळे या संभाषणातल्या बरं चे हे कार्य विनिमयाचे आहे , तर दुसरा बरं, प्रश्नात्मक सुरावटीतून आपल्याला श्रोत्याचे सांगणे खूप महत्वाचे वाटते आहे, असा विश्वास श्रोत्यामध्ये निर्माण करण्यासाठी आहे

  • बरं, मला असं सांग, मी उद्या येऊ की परवा?’

या उदाहरणात वक्त्याला नवीन विषय सुरू करायचा आहे. त्यात श्रोत्याकडून प्रतिसादाची, म्हणजेच भाषिक कृतीची अपेक्षा आहे.

  • मुलगी: आई, तू केव्हा येणार आहेस? काही खायला आणशील का?

आई: मला उशीर होणार आहे.

मुलगी: बरं, मग मी घरीच करते काहीतरी.

आई: बरं बरं.

या उदाहरणात पहिला बरं, माहितीला प्रतिसाद देऊन पुढील कृतीची सूचना देणारा आणि पर्याय सुचवणारा आहे, आणि दुसरा बरं बरं. ही पुनरावृत्ती संभाषणाच्या समारोपाची सूचना देणारी आहे.

मराठीत ‘बरं या एकाच संभाषणदर्शकाची मान्यता दर्शवणे, स्वीकृती, आज्ञापालन, पर्याय सुचवणे, नवीन विषय सुरू करणे, संभाषणाचा ताबा घेऊन दुसऱ्या वक्त्याचे लक्ष वेधून घेणे, विषयाचा समारोप करणे, एखाद्या निर्णयाप्रत येणे, माहितीत सहभागी होणे, भाषिक कृतीची सूचना देणे अशी अनेक कार्ये दिसतात, ‘बरं व्यतिरिक्त, म्हणजे, तर, तरी, आणि, आतापण, मग, म्हणून, शेवटी, याबरोबरच, कारणया सारखे अनेक शब्द संभाषणदर्शक म्हणून काम करतात. संभाषणदर्शकांपैकी अनेकांचे मूळ व्याकरणिक कार्य वेगळे असले तरी संभाषणात त्यांच्याकडून वक्त्याला विशिष्ट अर्थापर्यंत पोचवण्यासाठी मदत करण्याचे काम करवून घेतले जाते.

संदर्भ :

  • महाजन, सुजाता, ‘मराठीतील संभाषणदर्शके’,  वाङ्मयविमर्श, पद्मगंधा प्रकाशन, पुणे, २००९.

प्रतिक्रिया व्यक्त करा