संभाषणात बोलल्या गेलेल्या संभाषितांचा वाच्यार्थापलीकडे जाणाऱ्या अर्थाला सूचित करणारा घटक. ही संकल्पना प्रथम ब्रिटिश तत्त्वज्ञ हर्बर्ट पॉल ग्राइस यांनी मांडली. Implicature ही संकल्पना मांडण्यामागे, संभाषक जे बोलतो त्याच्या पलीकडे असलेले संदर्भगत अव्यक्त स्पष्ट करणे हा हेतू होता. १. सांकेतिक अन्वयार्थक २. संभाषणातील अन्वयार्थक असे दोन प्रकार हर्बर्ट पॉल ग्राइस यांनी मानले आहेत.

कधी कधी संभाषणे अतोनात संदिग्ध असतात. उदा.

अ-‘’ तो आलाय ग”.

ब- “ आज नाहीयेत”.

या संभाषणाचा अर्थ त्यात सहभागी असणाऱ्या दोन्ही व्यक्तींना माहीत आहे.

१. कुणीतरी आलंय जे अ आणि ब दोघांच्या ओळखीचं आहे.

२. ब ही स्त्री आहे.

३. ब घराच्या अंतर्भागात कुठेतरी आहे.

४. पण कुणीतरी आलंय हे तिला कळलंय.

५. ते कुणीतरी कशासाठी आलंय हेही कळलंय.

६. ते ज्यासाठी आलंय ती गोष्ट आता नाही आहे.

या संभाषणावरून एवढा तर्क करता येतो. पण धोबी आला आहे आणि आज त्याला देण्यासाठी कपडे नाही आहेत  ही गोष्ट अ आणि ब जाणतात. ह्या माहितीचा ते परस्पर विनियोग करू शकतात ; कारण हे बोलणे ज्या अवकाशात घडते तो अवकाश ते एकत्र जगतात. वरच्या उदाहरणात फक्त पाच शब्द आहेत. त्यात दोन क्रियारूपे, एक सर्वनाम आणि एक कालवाचक क्रियाविशेषण आहे. असे काहीही गुणधर्म सांगितले तरी त्यातून धोबी आला आहे आणि त्याला द्यायला कपडे नाही आहेत हे कळू शकत नाही. याचाच अर्थ, संभाषण एकमेकांना कळण्यासाठी भाषेपलीकडील संदर्भांची गरज असते. वाक्यगत अर्थापलीकडचे काहीतरी तिथे काम करते. भाषेपलीकडील संदर्भातून संभाषणाला अर्थ प्राप्त करून देणारे हे घटक म्हणजे संभाषणात्मक अन्वयार्थक होत.

परस्पर सामंजस्याचे तत्त्व (Cooperative Principle) : संभाषक बोलत असतात तेव्हा ते संभाषित कळण्यासाठी संभाषकांमध्ये एक प्रकारच्या परस्पर सामंजस्याची गरज असते.  संप्रेषणाला, परस्पर विनिमयाला नियंत्रित करणारे संवादांमधील परस्पर सामंजस्याचे हे त्तत्त्व ग्राइस यांनी मांडले. ग्राइस यांनी माणसे संभाषणात कशा प्रकारचे वर्तन करतात याचा अभ्यास करून असा निष्कर्ष काढला, की संभाषणातील विनिमयाची प्रक्रिया परस्पर सामंजस्याच्या तत्त्वाने नियंत्रित केली जाते. या तत्त्वामुळेच बोलणे संदिग्ध असले तरी श्रोता ते समजून घेईल, असे वक्ता गृहीत धरतो.

संभाषणाच्या सीमा (Maxims):  ग्राइस यांनी संभाषणाच्या चार मर्यादा किंवा सीमा/परिसीमा मानल्या आहेत.

  • संख्या वा आकारमान- गरजेचे आहे तेवढेच बोलावे.
  • गुणवत्ता- जे खरे आहे असे आपल्याला माहीत आहे,तेच बोलावे.
  • संबंध- सुसंगत बोलावे.
  • पद्धत- दुर्बोधता, संदिग्धता टाळावी.

थोडक्यात, बोलण्यातील क्रम पाळावा. संभाषणातील फापटपसारा , दुर्बोधता, संदिग्धता टाळून संभाषण सुसंगत, आटोपशीर बनवावे अशा मर्यादा संभाषणाला असतात.काही वेळा संभाषणातून एखादी गोष्ट वगळणे इष्ट असते. अशा वेळी संभाषणाच्या या मर्यादांचे उल्लंघन होते, संभाषकांमध्ये ती गोष्ट वगळण्याची कृती जाणीवपूर्वक केली जाते, तरीसुद्धा परस्पर सामंजस्याच्या तत्त्वामुळे श्रोता अर्थ समजून घेण्याची धडपड करतो.

वरील उदाहरणात  पहिली आणि दुसरी मर्यादा पाळली आहे; पण तिसऱ्या आणि चौथ्या मर्यादेचे उल्लंघन करण्यात आलेले आहे. ‘ब’ ने मर्यादांचे उल्लंघन केले असले तरी त्यातून अर्थ काढायचा ‘अ’ या व्यक्तीने प्रयत्न करणे; आणि आपण जे बोलतो आहोत, त्यात संभाषणाच्या मर्यादांचे उल्लंघन झाले असले तरीही त्यातून अर्थ काढायचा ‘अ’ ही व्यक्ती प्रयत्न करेल, असे ‘ब’ या व्यक्तीने मानणे म्हणजे परस्पर सामंजस्याचे तत्त्व पाळणे.  यामुळेच संभाषणाचा अर्थ कळायला बाधा येत नाही. मर्यादांचे उल्लंघन केले तरी हरकत नाही; पण परस्पर सामंजस्याचे तत्त्व टिकवले जाते.

अशा प्रकारे परस्पर सामंजस्याच्या मर्यादा पाळून किंवा त्यांचे उल्लंघन करून संभाषक जे बोलतात त्या वाक्यामधून सूचित होणारी संभाषणाची अन्वयार्थके आणि ती तपासण्यासाठी एक चांगली अभ्यासचौकट भाषावापरशास्त्राच्या कक्षेत ग्राइस यांनी उपलब्ध करून दिली. ग्राइस शिवायही डॅन स्पर्बर आणि देरद्रे विल्सन यांनी या विषयासंदर्भात काम केले आहे.

संदर्भ :

  • Grice,H.P.,Logic and Conversation,Academic Press,New York,1975.

प्रतिक्रिया व्यक्त करा