सामान्य मार्गाने केलेली कर्मचाऱ्यांची घट म्हणजे रोजगार कपात. राजीनामा, ग्राहक संख्येतील घट अथवा विशिष्ट प्रदेशातील व्यावसायिक लक्ष्य यांपैकी कोणत्याही कारणाने कर्मचारी कपात करून औद्योगिक संस्था रोजगार कमी करीत असतात. रोजगार कपातीद्वारे औद्योगिक संस्था मजुरीवरील खर्च कमी करण्याचा प्रयत्न करतात.

कर्मचाऱ्यांचे वेतन आणि इतर भत्ते यांचे व्यवस्थापन या दोन्ही महत्त्वपूर्ण खर्चिक बाजू असतात. काही वेळा मजुरीचा खर्च कमी करण्यासाठी औद्योगिक संस्था नैसर्गिक रीत्या रोजगार कपात होण्याची अथवा कर्मचारी घटण्याची प्रतिक्षा करतात. नैसर्गिक रीत्या कर्मचारी कपातीची वाट पाहणे औद्योगिक संस्थेचे उत्तम मनोधैर्य दर्शविते; तथापि काही वेळा कर्मचारी कपात नकारात्मक परिणाम घडवू शकते. नवीन नेमणुका स्थगित केल्या जातात, तर काही वेळा प्रचंड प्रमाणात निर्दयी व तीव्र रोजगार कपात केली जाते. कोणताही जादा भत्ता न मिळता रिक्त पदाच्या कामाचा भार इतर कर्मचाऱ्यांवर पडला, तर त्यांचे मनोधैर्य खचून त्याचा रोजगार उलाढालीवर दूरगामी परिणाम संभवतो. व्यवस्थापनातील बदल, व्यावसायिक संरचना इत्यादी कारणांमुळे कर्मचारी उत्स्फूर्तपणे काम सोडून जाऊ शकतात. तसेच काही वेळा औद्योगिक संस्था स्वत: कर्मचाऱ्यांची व कामाची कपात घडवून आणतात.

रोजगार कपात आणि रोजगार उलाढाल या दोन भिन्न संकल्पना आहेत. या दोन्ही संकल्पनांत अंतिमत: कर्मचाऱ्याला आपला रोजगार सोडून जावे लागत असले, तरी फक्त रोजगार त्याग याच प्रक्रियेत कर्मचाऱ्याला काही वेतन भत्ते व निवृत्तीचे फायदे मिळतात; मात्र रोजगार उलाढालीत ते दिले जात नाहीत. रिक्त झालेल्या पदांवर नवीन कर्मचाऱ्यांच्या नेमणुका कराव्यात की नाही, याबाबतची धोरणे महत्त्वपूर्ण असतात. रोजगार उलाढाल म्हणजे, वर्षभऱ्यात एखाद्या आस्थापनेतील किती कामगार आपला रोजगार स्वेच्छेने सोडून गेले, त्याचे एकूण कामगार संख्येशी टक्केवारी प्रमाण होय. त्यांनुसार रोजगार उलाढाल या प्रक्रियेतील रिक्त झालेल्या पदांवर नवीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाते; मात्र रोजगार कपात प्रक्रियेत कुठलीही नियुक्ती किंवा नेमणुका न करता संबंधित पद रिक्त ठेवण्यास प्राधान्य असते. रोजगार उलाढालीमध्ये कर्मचाऱ्यांच्या विविध कृतींमुळे ते काम सोडून जातात. उदा., राजीनामा, नोकरी खंडित करणे, नोकरी सोडून दुसऱ्या ठिकाणी नोकरीस जाणे इत्यादी. रोजगार कपातीमध्ये कर्मचाऱ्यांना जबरीने स्वेच्छा निवृत्ती घ्यायला भाग पाडले जाते अथवा त्यांना कामावरून दूर केले जाते. त्यामुळे त्यांची सेवा निरस्त होते.

औद्योगिक संस्थांना नवीन व्यावसायिक प्रयोग, कर्ज, बंद पडलेल्या शाखांमुळे होणारे नुकसान इत्यादी बाबींचे व्यवस्थापन करण्याकरिता वारंवार रोजगार कपात करावी लागते. रोजगार कपात किंवा रोजगार उलाढाल सक्तीची किंवा उत्स्फूर्त असू शकते. कामगारांना कामावरून कमी करण्याविषयीचे रोजगार धोरण असणे, कामगारांची अकार्यक्षमता, अतिरिक्त गैरहजेरी, कामाच्या ठिकाणी गैरशिस्त, सरकारी धोरणांतील बदल इत्यादी कारणांमुळे सक्तीची रोजगार कपात केली जाऊ शकते. कामगार संख्येतील कपात, सक्तीच्या सुट्ट्या किंवा विशिष्ट पदे रद्द घोषित करणे, ही सक्तीच्या रोजगार कपातीची ठळक वैशिष्ट्ये मानली जातात; कारण अशा वेळी रोजगार संबंध मालक अथवा व्यवस्थापनाद्वारा निश्चित केले जातात. असे रोजगारसंबंध कामगारांनी कामावर येणे सुरू ठेवायचे की, बंद करायचे, यावर अवलंबून नसतात.

जेव्हा कामगार स्वत:च्या कौटुंबिक, वैयक्तिक कारणास्तव किंवा व्यावसायिक जीवनात अधिक चांगल्या संधीच्या शोधार्थ आपला चालू रोजगार सोडून स्थलांतरित होण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा त्यास उत्स्फूर्त किंवा ऐच्छिक रोजगार कपात असे संबोधले जाईल. जेव्हा काही व्यवस्थापनाकडून योग्य उमेदवारांच्या शोधार्थ भरतीप्रक्रिया सुरू करून रिक्त जागा भरल्या जातात, तेव्हा श्रमबाजारात श्रमिकांकरिता असलेली मागणी वाढते आणि उत्स्फूर्त किंवा ऐच्छिक रोजगाराची संधी मिळते. सेवानिवृत्तीचे पर्यवसानही उत्स्फूर्त रोजगार कपातीमध्ये घडून येते. सेवानिवृत्त झालेल्या कामगारांच्या जागी नवीन नेमणुका केल्या जात नाहीत, अशा घटनेसही उत्स्फूर्त रोजगार कपात असेच संबोधले जाते. जेव्हा औद्योगिक संस्थेस तोटा संभवतो, तेव्हा औद्योगिक संस्थेद्वारा उत्पादन बंद करणे, उत्पादन घटविणे, सक्तीची रजा किंवा रोजगार कपातीचे धोरण अवलंबविणे इत्यादी कार्य केले जाते. या प्रकारासही रोजगार कपात असेच संबोधन वापरले जाते. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे, उद्योजक अशा वेळी कामगार पुनर्भर्तीपासून परावृत्त असतो.

खालील सूत्राद्वारे एखाद्या उद्योगसंस्थेतील रोजगार कपातीचा वार्षिक दर काढता येतो. तसेच याच सूत्रामध्ये कालबदल करून मासिक, त्रैमासिक अथवा इतर कोणत्याही कालखंडाकरिता उद्योग संस्थेतील रेाजगार कपात दराची परिगणना केली जाऊ शकते.

संबंधित वर्षात रोजगार सोडणाऱ्या कामगारांची संख्या

                                  रोजगार कपातीचा वार्षिक दर   = —————————————————————————————

              संबंधित वर्षातील कामगारांची एकूण संख्या

समीक्षक – श्रीराम जोशी

प्रतिक्रिया व्यक्त करा