सूर्याकडून प्रेषित होणाऱ्या विद्युत चुंबकीय तरंगांच्या (Electromagnetic waves) रूपातील ऊर्जेला सौरऊर्जा असे म्हणतात. हे तरंग जेव्हा एखाद्या वस्तूवर (matter), घन किंवा द्रव पदार्थावर आदळतात, तेव्हा त्या तरंगांमध्ये असलेल्या ऊर्जेमुळे पदार्थातील रेणू कंप पावू लागतात. ह्या कंपनांमुळे उद्दीपीत होऊन रेणू आपापल्या जागा सोडू लागतात. ह्या चलनवलनामुळे उष्णता निर्माण होते. सौर ऊर्जेमधील ह्या उष्णतेचा वापर औद्योगिक व घरगुती वापरांकरिता मोठ्या प्रमाणावर केला जातो. घरगुती वापरातील एक महत्त्वाचा उपयोग म्हणजे सौरचूल. सौरचूल हे एक असे उपकरण आहे ज्यामध्ये पदार्थ शिजविण्याकरिता किंवा उकळविण्याकरिता थेट सूर्यकिरणांमध्ये असलेल्या उष्णतेचा उपयोग केला जातो. सौरचूलीचे पेटीसदृश सौरचूल व अन्वस्तीय सौरचूल असे दोन प्रकार पडतात.

अन्वस्तीय सौरचुलीमध्ये सूर्यकिरणे परावर्तकाद्वारे परावर्तित होऊन एका बिंदूपाशी केंद्रीत होतात. अन्वस्तीय सौरचुलीची रचना करताना खालील बाबींचा अंतर्भाव होतो.

  • अन्वस्तीय तबकडी : अन्वस्तीय तबकडी लोखंडाच्या गजापासून किंवा पातळ पत्र्यापासून बनविलेली असते.
  • परावर्तक (Reflector): परावर्तक पदार्थ हा त्यावर पडलेली सूर्यकिरणे परावर्तित करतो. ज्या पदार्थांची परावर्तनशीलता जास्त असते असे पदार्थ परावर्तक म्हणून वापरण्यात येतात. उदा., आरशाचे तुकडे, चकचकीत ॲल्युमिनिअमचा पत्रा इ. परावर्तक पदार्थ अन्वस्तीय तबकडीच्या आतील बाजूला चिकटवतात अथवा स्क्रूच्या साहाय्याने  जोडतात.
  • मांडणी अथवा सांगाडा : तबकडीला आधार देण्याकरिता तसेच तबकडी तीनही अक्षात फिरवण्याकरिता मांडणीचा उपयोग होतो.
  • अन्वस्तीय तबकडीच्या मध्यभागी अन्न शिजवण्यासाठीचे भांडे ठेवण्याची व्यवस्था असते.
अन्वस्तीय सौरचूल

गच्चीत, मोकळ्या जागी किंवा सावली नसलेल्या ठिकाणी अन्वस्तीय सौरचूल ठेवण्यात येते. सौरचुलीचा परावर्तक असलेला भाग सूर्यकिरणांच्या दिशेकडे तोंड करून ठेवतात. सूर्य पूर्वेकडे  उगवून पश्चिमेकडे मावळतो . त्यामुळे दिवसभरात साधारण दर वीस मिनीटांनी सूर्यकिरणे  आपले  स्थान थोड्या अंशाने बदलत असतात. त्यामुळे सौर चुलीचा परावर्तक असलेला भाग सूर्यकिरणांच्या दिशेकडे तोंड करून ठेवण्यासाठी तीनही अक्षात तबकडी फिरविता येईल अशा रीतीने तबकडी ठेवण्यासाठीची मांडणी केलेली असते. अशा रचनेमुळे परावर्तकावर पडलेली सूर्यकिरणे परावर्तित होऊन केंद्रीय बिंदूवर एकत्रित होतात. सूर्यकिरणांच्यात असलेली उष्णता केंद्रीभूत बिंदूपाशी एकवटली जाते आणि ह्या बिंदूपाशीचे तापमान वाढते. केंद्रीय बिंदूपाशी अधिकतम तापमान ३५० सेल्सिअस पर्यंत मिळू शकते. अन्न शिजवण्यासाठीच्या भांड्याच्या  तळभागावर केंद्रीय बिंदू असेल अशा तऱ्हेने अन्वस्तीय तबकडीची रचना केलेली असते. त्यामुळे भांडे लवकर तापते आणि अन्न कमी वेळात शिजते.

अन्वस्तीय सौरचुलीचा वापर केवळ वरण, भात, बटाटे, बीट वगैरे शिजवण्यासाठीच होतो असे नाही तर ह्या सौरचुलीत रवा व शेंगदाणे उत्तम भाजले जातात. दूध आटवून बासुंदीही बनवता येते. गैरशाकाहारी पदार्थ शिजविण्याकरिताही याचा उपयोग होतो. अन्वस्तीय सौरचूल वापरल्याने एल.पी.जी.च्या खर्चात बचत होते. तसेच पर्यावरण प्रदूषण कमी होण्यास साहाय्‍य होते.

लहान मोठ्या व्यासाच्या अन्वस्तीय सौरचुली बाजारात उपलब्ध आहेत. अशा काही चुलींची छायाचित्रे येथे अंतर्भूत केली आहेत.

 

संदर्भ :

  • Garg, H. P.; Prakash J., Solar Energy Fundamentals and Apllication, McGraw Hill Education.
  • Rai, G. D., Non Conventional Energy Sources, Khanna Publishers, New Delhi.

समीक्षक – एन. एम. गायकवाड

प्रतिक्रिया व्यक्त करा