गर्भावरणाभोवती असलेल्या उल्बी द्रवाची चिकित्सा. हे एक वैद्यकीय चिकित्सा तंत्र असून यामार्फत गर्भाच्या गुणसूत्रांमधील अपसामान्यता आणि संसर्ग यांचे जन्माअगोदर निदान केले जाते. गर्भाभोवती असलेल्या गर्भावरणामुळे गर्भाचे संरक्षण होते. गर्भावरणाभोवती एक आवरण असते. या आवरणाला उल्ब आवरण म्हणतात. गर्भावरण आणि उल्ब आवरण यांच्यामध्ये गर्भजल असते. गर्भजलात गर्भऊती असतात. यातील थोडेसे गर्भजल काढून त्याच्यातील आनुवंशिक दोष पाहण्यासाठी गर्भाच्या डीएनएनचे (डीऑक्सिरिबोन्यूक्लिइक आम्लाचे) परीक्षण केले जाते.

गर्भजल चिकित्सा पद्धती
गर्भजल चिकित्सा पद्धती

गर्भजल चिकित्सा करताना मातेला स्थानिक बधिरक दिले जाते आणि तिच्या उदरात सुई टोचून ती उल्बापर्यंत नेली जाते. श्राव्यातीत (अल्ट्रासॉनिक) लहरींच्या साहाय्याने सुई उल्बात टोचण्याची जागा गर्भापासून दूर राहील हे पाहिले जाते. नंतर त्या जागेतून साधारण २० मिलि. गर्भजल बाहेर काढले जाते. मिळालेल्या नमुन्यातून गर्भाच्या पेशी वेगळ्या केल्या जातात आणि ऊती संवर्धन तंत्राने त्यांची वाढ केली जाते. सूक्ष्मदर्शकाखाली या पेशीतील गुणसूत्रांचे त्यांच्यातील विकृती पाहण्यासाठी निरीक्षण केले जाते. त्यांतून मुख्यत्वे डाऊन सिंड्रोम, एडवर्ड सिंड्रोम व टर्नर सिंड्रोम या गुणसूत्रांच्या विकृती पाहिल्या जातात. साधारणतः २४ ते ४८ तासांत उल्बाची जखम भरून येते. तसेच या अवधीत गर्भाजलाची पातळी पूर्ववत होते.गर्भजलचिकित्सा गर्भारपणाच्या १६ ते २० आठवड्यांत करता येते. त्याआधी गर्भजल चिकित्सा केल्यास गर्भपाताचा धोका असतो, तसेच अर्भकाच्या अवयवांना इजा होऊ शकते. हा धोका कमीत कमी करण्यासाठी ही चिकित्सा बहुधा १८ व्या आठवड्यात करतात. ३५ वर्षांहून कमी वयाच्या स्त्रीच्या गर्भामधील दोषांचे प्रमाण कमी असल्यामुळे आणि कुटुंबामध्ये गुणसूत्रामधील दोषांचा वैद्यकीय इतिहास नसेल, तर या वयातील गरोदर स्त्रियांना ही चिकित्सा करून घेण्याचा सल्ला दिला जात नाही. मात्र प्रौढ गरोदर स्त्रियांमध्ये अर्भकात गुणसूत्र दोष होण्याचे सरासरी प्रमाण वाढत जाते. तसेच गरोदरपणात मातेला मधुमेह असल्यास गर्भजलचिकित्सेचा सल्ला दिला जातो.

गर्भजलचिकित्सा गरोदरपणाच्या योग्य कालावधीत केल्यास गर्भाच्या डोक्याची अपुरी वाढ (अ‍ॅनेसेफाली), पाठीचा दुभंगलेला कणा (स्पिना बायफीडा), डाऊन सिंड्रोम अशा गुणसूत्रांच्या दोषाचे निदान करता येते. ही चिकित्सा गरोदरपणात नंतरच्या कालावधीत केल्यास गर्भाला झालेला संसर्ग, फुप्फुसांची अपुरी वाढ, माता आणि बालक यांच्या रक्तातील आरएच घटक न जुळणे अशा अन्य प्रकारच्या समस्य़ांचेही निदान होऊ शकते.

जगभर चालू असलेल्या संशोधनातून असे दिसून आले आहे की, उल्ब द्रवातून मध्यजनस्तर, रक्तनिर्मिती, चेता, अभिस्तर आणि अंतःस्तरातील मूलपेशींचा उत्तम स्रोत उपलब्ध होऊ शकतो. हृदय, यकृत, वृक्क (मूत्रपिंड) आणि प्रस्तिष्क ऊतींमध्ये दोष निर्माण झालेल्या रुग्णांसाठी उल्ब द्रवापासून मिळालेल्या ऊती उपकारक ठरू शकतात.

गर्भजलचिकित्सा ही गर्भामधील गुणसूत्र दोष आणि गर्भलिंग निश्चित करण्यासाठी अचूक आणि विश्वासार्ह चाचणी आहे. मात्र या चिकित्सेद्वारे लिंग निश्चिती करण्यास कायद्याने बंदी आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा