सालई (बॉस्वेलिया सेराटा) : (१) वृक्ष, (२) फुले, (३) फळे.

(इंडियन ऑलिबॅनम ट्री). एक मध्यम आकाराचा पानझडी वृक्ष. सालई हा वृक्ष बर्सेरेसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव बॉस्वेलिया सेराटा आहे. तो वृक्ष मूळचा भारतातील आणि खासकरून पंजाबमधील असून भारताच्या मध्याकडील आणि उत्तरेकडील सर्वच डोंगराळ व रुक्ष प्रदेशांत आढळून येतो.

सालई वृक्ष ९ ते १५ मी. उंच वाढत असून खोडाचा घेर १.५ ते २ मी. असतो. खोडाची साल जाड, पिवळट किंवा हिरवट असून तिचे अनियमित पातळ तुकडे गळून पडतात. खोडाला जमिनीपासून १-२ मी. वर फांद्या येतात. पाने संयुक्त, एकाआड एक, १५–४० सेंमी., पिसासारखी असतात; दले १५–४० असतात; प्रत्येक दल बिनदेठाचे, भाल्यासारखे, तळाशी असमान (मध्यशिरेच्या दोन्ही बाजूंना सारख्या आकाराचे नसलेले), दातेरी (करवती काठाचे), काहीसे लवदार व टोकांना गोलसर असते. सर्व दलके समोरासमोर व सर्व पाने फांद्यांच्या टोकांना झुबक्यांनी येतात. फुले लहान व पांढरी असून ती पानांच्या बगलेत किंवा फांद्यांच्या टोकावर मंजरीत येतात. पानांपेक्षा फुले लहान असतात; निदलपुंज संयुक्त, गळून न पडणारा, ५–७ दातेरे असलेला असून दातेरे लहान व त्रिकोणी असतात. दलपुंज ५–७, सरळ, मुक्त, ०.५ सेंमी. लांब असतात. फळ आठळीयुक्त असून त्रिधारी असते व तीन शकले होऊन फुटते. त्यात हृदयाच्या आकाराच्या तीन आठळी असतात. बिया चपट्या आणि पंख असलेल्या असतात. एका आठळीत एकच बी असते.

सालई गुग्गूळ

सालई वृक्षाचे लाकूड व त्यापासून मिळणारी राळ ही व्यापारीदृष्ट्या महत्त्वाची उत्पादने आहेत. सालईचे लाकूड मध्यम प्रतीचे, कठीण व टिकाऊ असून त्यापासून सजावटी सामान, खोकी, पेट्या, तक्ते, फळ्या, आगकाड्या, खेळणी इ. तयार करतात. कोळसा व सरपण यासाठीही ते वापरतात. वृक्षाच्या खोडावर खाचा मारून त्यातून गळणारा रस म्हणजेच राळ जमा करतात; त्याला ‘ओलिओ गम रेझीन’ म्हणतात. सालईची राळ चिकट व सोनेरी पिवळी असून सुगंधित असते. त्याला ‘सालई गुग्गूळ’ म्हणतात.

सालईच्या राळेमध्ये बॉसवेलिक आम्ल असते. ही राळ लवकर जळते आणि ती जळताना सुगंध दरवळतो म्हणून ती धूपाकरिता वापरतात. सालईची राळ मूत्रल (लघवी साफ करणारी), स्तंभक (आकुंचन करणारी), आर्तवजनक (स्त्रियांचा मासिक स्राव सुरू करणारी), त्वचेच्या विकारावर उपयुक्त असते. तसेच संधिवातावर गुणकारी असल्यामुळे ती संधिवातावर लावण्याच्या मलमांत मिसळतात.