कवलापुरकर, शिवा-संभा : महाराष्ट्रात्तील नामवंत तमाशा कलावंत. शिवा-संभा हे दोन भाऊ. अत्यंत हजरजबाबी आणि उत्स्फूर्त अभिनय हे त्यांचे वैशिष्ट्य. शिवा-संभाचा जन्म सातु खाडे कवलापूरकर यांच्या घराण्यात कवलापूर ता. मिरज, जिल्हा सांगली येथे झाला. त्यांना वडिलोपार्जित तमाशाची परंपरा लाभलेली होती. शिवा-संभाचे वडील सातु खाडे यांनी त्यांचे बंधू हिरू यांच्या सोबतीने तमाशाचा फड उभा केला होता. तीच परंपरा शिवा-संभा नंतर काळू-बाळू यांच्या रूपाने कार्यरत राहिली. शिवा-संभाचे समकालीन भाऊ फक्कड उर्फ भाऊ मालोजी भंडारे, सुंडाप्पा, पट्ठे बापूराव हे होत. शिवा-संभाच्या तमाशात सुंडाप्पा हे हलगी (कडे) वाजवण्याची जबाबदारी पार पाडायचे तर भाऊ फक्कड नाच्या पोराची भुमिका निभावायचे.शिवा-संभाकडे सरदाराची भूमिका असायची.
शिवा-संभाच्या ऐन उमेदीच्या काळात संगीत रंगभूमी बहराला आली होती. तेव्हा संगीत रंगभूमीवर बालगंधर्व आपल्या प्रतिभेच्या जोरावर एक अनोखी छाप पाडत होते. तर शिवा-संभा तमाशाच्या बोर्डावर ग्रामजनांच्या मनावर अधिराज्य गाजवत होते. शिवा ऐतिहासीक पौराणिक रजवाडी वगातील भूमिका हुबेहूब वठवायचे. एकदा शिवा-संभाच्या तमाशात शिवाने गण गवळण-बतावणी झाल्यावर मणीमराठा नावाचा वग लावला. त्यात शिवाने मराठमोळ्या मराठी रांगड्या सरदाराची भूमिका बजावली, त्याची वेषभूशा मिशिचा पिळ आणि फेट्याची बांधणी अशी वैशिष्ट्यपूर्ण होती की, जणू काही छत्रपती शाहुमहाराज प्रत्यक्षात बोर्डावर उतरले. प्रेक्षकाना आश्चर्याचा धक्का बसला आणि सर्व प्रेक्षक शिवाला पाहून उभे राहीले व छत्रपती शाहूना मानवंदना देऊ लागले. लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. खेळ संपला ज्याच्या त्याच्या मुखावर शिवाच्या अभिनयाची चर्चा चालू होती. शिवाने वठवलेल्या भूमिकेची बातमी छत्रपती शाहूंना कळाली त्यांनी आपल्या संस्थानात बोलांवून शिवा संभाच्या तमाशाचे आयोजन केले. तेथे महाराजांनी जरीचा फेटा देवून त्यांचा सन्मान केला.
आपली प्रतिभा आणि गायकीच्या जोरावर ग्रामीण महाराष्ट्रासह शिवा-संभाने मुंबई गाजवली. त्याकाळी मुंबईत तमाशाचे बंदीस्त थिएटर नव्हते. महाराष्ट्रातील अनेक छोटे मोठे तमाशे मुंबई मध्ये यायला सुरुवात झाली. चाळीमधून तमाशाच्या सादरीकरणाचे फड उभे रहायला लागले. इथे तमाशाच्या अनेक झडती होवू लागल्या. शिवा-संभाचे समकालीन पट्ठे बापूराव, भाऊ फक्कड, उमा-आनंदा चांदोलीकर यांचे उघड्यावर तमाशे होवू लागले. शिवा-संभा आणि उमा-आनंदा चांदोलीकर यांच्या लढती पाहून प्रेक्षकांचे लोंढेचे लोंढे चाळीकडे ओढले जावू लागले. तमाशाला प्रेक्षक गर्दी करत आहेत. हे पाहून मुंबई मधील छोटूभाई यांनी डिलाइल रोड, शिवडी, नायगाव येथे पत्र्याचे बंदीस्त थिएटर निर्माण केले. पिला हाऊस थिएटर मध्ये तमाशा कलावंतांना हक्काचे व्यासपीठ मिळाले. त्यातून पैसा मिळू लागला. तमाशाची तिकिट विक्री झाल्यानंतर तमासगीरांना छोटूभाई यांना मानधन द्यावे लागत असे. सुपारी देऊन यात्रे-जत्रे निमित्ताने बोलावला जाणारा तमाशा आता करार पद्धतीने सादर करू लागला. शिवा-संभाने गण, हाळीची गवळण, तक्रारीची गवळण, विणवणीची गवळण, कटाव, धिलकार आणि टाकण्या असे तमाशातील अभिव्यक्ती प्रकार विपूल प्रमाणात लिहिले. शिवा-संभाचे वग हे तमाशाच्या उत्कर्ष काळातील रजवाडी बाजाचे होते. शिवा-संभा हे तुर्रा पक्षाचे होते. कलगी तुऱ्याच्या झडतीत उमा-आनंदा चांदीवलीकर व शिवा-संभा कवलापूरकर हे आध्यात्मिक भेदीक रचनांमध्ये लढती खेळायचे. आपल्या तमाशाला सुरवात करताना शिवा-संभा यांनी गणांच्या अल्प प्रमाणात रचना केलेल्या आढळतात.
शिवा-संभांच्या गणांबरोबर गोपी कृष्णावर आधारीत गौळणी कलात्मक दृष्ट्या रचलेल्या आढळतात. या प्रयोगसिद्ध गौळणीला शिवा-संभा कवलापूरकरानी खऱ्या अर्थाने न्याय दिलेला दिसतो. त्यांनी गवळणीची हाळीची गवळण, तक्रारीची गवळण, विणवणीची गवळण या तीन प्रकारांत विभागणी केलेली आढळते. त्यांनी आपल्या हाळीच्या, तक्रारीच्या (खुळीच्या), विनवणीच्या गवळणीतून राधा कृष्णाच्या श्रृंगाराचे दर्शन घडविले आहे. त्यात नाविन्यता, सहजस्फुर्तता, रसनिष्पत्ती, अलंकार, उपमा इत्यादी पहावयास मिळतात. शिवा-संभाने आपल्या तमाशा फडाच्या माध्यामातून नवीन काव्यरचना करून त्याला गोड चाली लावलेल्या आहेत. जुन्या पद्धतीची शिवा-संभाची गायकी आजही काळू-बाळूंच्या तमाशातून ऐकण्यास मिळते इतर तमासगीरांपेक्षा शिव-संभाचा तमाशा हा सामाजिक बांधिलकी आणि रसिकांचे ऋण व्यक्त करताना दिसतो. शिवा कवलापूरकर यांचा ५७ व्या वर्षी निधन झाले तर शाहीर संभा कवलापूरकरचा ८६ व्या वर्षी निघन झाले.
संदर्भ :
- कसबे, मिलिंद, तमाशा कला आणि कलावंत ,सुगावा प्रकाशन, पुणे, २००७.
- बनसोड, मंगेश, तमाशा रूप आणि परंपरा, अवे मारिया पब्लिकेशन, मुंबई २०१२.
समीक्षक : अशोक इंगळे