जगभर विपुल प्रसार असणार्या पोएसी (ग्रॅमिनी) कुलातील वनस्पतींना गवत म्हणतात. इंग्रजीत ‘ग्रास’ या संज्ञेत पोएसी कुलाबरोबरच सायपेरेसी आणि जुंकेसी या कुलामधील काही जातींतील वनस्पतींचा समावेश केला जातो, कारण या वनस्पती पोएसी कुलातील खर्या गवताबरोबरच वाढतात. ‘यवस्’ या संस्कृत शब्दापासून गवत या शब्दाची उत्पत्ती झाली आहे. गवताच्या जवळजवळ ६०० प्रजाती आणि १०,००० हून अधिक जाती आहेत. या वनस्पती एकदल आणि वर्षायू किंवा बहुवर्षायू असतात. तांदूळ, गहू यांसारखी तृणधान्ये, ऊस, बांबू, कुसळी, (मैदाने व बागा यांत वाढविलेली) हिरवळ (लॉन) ही सर्व गवते आहेत.
जे क्षेत्र पोएसी कुलातील वनस्पतींनी आच्छादलेले असते त्याला तृणभूमी म्हणतात ; पृथ्वीवरील वनश्रीपैकी जवळपास २० % भाग तृणभूमीने व्यापलेला आहे. गवताच्या ज्या जाती आर्द्रभूमी, वने आणि टंड्रा अशांसारख्या अधिवासात वाढतात, त्यांचा समावेश वरील तृणभूमीत केलेला नाही.
मानवाच्या अर्थकारणाच्या दृष्टीने, वनस्पतींच्या सर्व कुलांमध्ये पोएसी कुल सर्वांत जास्त महत्त्वाचे आहे ; यात जगभर घेतली जाणारी तृणधान्ये, हिरवळ आणि जनावरांची वैरण आणि (पूर्व आशिया तसेच आफ्रिकेच्या सहारा खंडात बांधकामासाठी वापरल्या जाणार्या) बांबूंचा समावेश आहे. गवताची मुळे तंतूसारखी असून ती जमिनीतून पाणी आणि पोषकद्रव्ये शोषून घेतात. खोडे पोकळ असतात आणि त्यावर कांडे आणि पेर असतात. पोकळ भागाला कांडे म्हणतात, तर भरीव भागाला पेर म्हणतात. पेरापासून गवताची पाने फुटतात. पाने एकाआड एक, द्विपंक्तिक (समोरासमोर व पंगत मांडल्याप्रमाणे) आणि समांतर शिराविन्यास असलेली असतात. गवताच्या पानांचे दोन भाग पडतात. १)खोडापासून फुटलेले व त्याला आलिंगून असलेले छद (आवरक) आणि २)रुंद व निमुळते होत जाणारे पाते. बहुतांशी गवतांची पाती त्यांच्यात असलेल्या सिलिका फायटोलीथमुळे (दगडासारखे सूक्ष्म कण) कठिण झालेली असतात. यामुळे चरणार्या गुरांपासून गवताचे संरक्षण होते. काही गवताच्या पात्यांमुळे माणसाची त्वचादेखील कापली जाते. छद आणि पाते एकत्र मिळतात तेथे केसाळ झालरीसारखा भाग असतो. याला जिभिका म्हणतात.
गवताची पाती तळापासून वाढतात. ती लांब वाढणार्या खोडापासून वाढत नाहीत. वनस्पतीला (गवताला) हानी न पोहोचता चरणार्या जनावरांना गवत नीट खाता यावे तसचे त्याची छाटणी करता यावी, म्हणून गवताची वाढ होताना अनुकूलन झालेले असावे, असे मानतात.
गवताच्या फुलांची रचना कणिशासारखी असून प्रत्येक कणिशात एक किंवा अनेक पुष्पके असतात. फुले उभयलिंगी असतात (केवळ मक्याची फुले एकलिंगी असतात) आणि परागण वार्यामार्फत होते. गवताच्या फळाला तृणफल म्हणतात. तृणफलात बीजावरण आणि फलभित्तिका एकमेकांत मिसळलेल्या असतात. त्या एकमेकांपासून अलग करता येत नाहीत.
कृषिक्षेत्रात खाद्यबियांपासून तृणधान्यांची वाढ केली जाते. मानवाला दैनंदिन जीवनात गरज असलेल्या ऊष्मांकांपैकी अर्धे ऊष्मांक (कॅलरीज) गहू, तांदूळ व मका यांपासून मिळतात. सर्व पिकांपैकी ७० % पिके गवत आहेत. माणसाला कर्बोदके आणि प्रथिने प्रामुख्याने तृणधान्यांपासून मिळतात. यात दक्षिण व पूर्व आशियात तांदूळ, मध्य व दक्षिण अमेरिकेत मका आणि यूरोप, उत्तर आशिया व अमेरिकेत गहू व बार्ली यांचा समावेश आहे. ऊस हा साखर निर्मितीसाठी प्रमुख स्रोत आहे. जनावरांना चारा आणि वैरण उपलब्ध करून देण्यासाठी इतर गवतांची लागवड केली जाते.
बांधकामासाठी गवतांचा उपयोग होतो. उदा., बांबूंपासून बांधलेली परांची चक्रीवादळाच्या वार्यांसमोर टिकून राहते, तर पोलादाची परांची तुटून पडते. मोठ्या आकाराचे बांबूचे पेरे मजबूत असल्यामुळे त्यांचा वापर इमारतीच्या लाकडांप्रमाणे केला जातो. भारतात विशेषतः ईशान्येकडील राज्यांत बांबूंपासूनच घरे बांधली जातात. कागद तयार करण्यासाठीही गवत उपयोगी पडते.
विविध प्रकारच्या हिरवळींकरिता गवताचा प्रामुख्याने उपयोग केला जातो. उतरत्या जमिनीवरील मातीची धूप थांबविण्यासाठी अनेक देशांत मुद्दाम हिरवळ वाढविली जाते. तसेच बागा आणि टेनिस, गोल्फ, क्रिकेट अशा खेळांच्या मैदानांत हिरवळ लावतात. इतर वनस्पतींप्रमाणे गवतातही हरितद्रव्य असते.