फॅबेसी कुलातील काही वनस्पती किंवा त्यांच्या शेंगा व दाणे यांना सामान्यपणे घेवडा म्हणतात. या शेंगांचा किंवा बियांचा उपयोग भाजी करण्यासाठी केला जातो. शास्त्रीय दृष्ट्या घेवड्याच्या सर्व जाती किंवा प्रकार एकाच प्रजातीतील नाहीत. मात्र, फॅसिओलस प्रजातीच्या सर्व वनस्पतींना घेवडा म्हणतात. तसेच ज्या वनस्पतींचे वर्गीकरण आधी फॅसिओलस प्रजातीत केले गेले होते आणि आता ज्यांचा समावेश अन्य प्रजातीत केला जातो, अशा काही वनस्पतींनाही घेवडा म्हटले जाते.फॅसिओलस प्रजातीतील सर्व वनस्पती वेलींच्या रूपात वाढतात. पाने संयुक्त व एकाआड एक असतात. फुले पांढरी, लालसर किंवा जांभळी असतात. फळे शिंबावंत (शेंगा) असतात. बिया मोठ्या, रंगीत व अनेक असतात.
तूर, गवार, बावची, वाटाणा, चवळी, मूग, शेंगदाणे, सोयाबीन इत्यादींना इंग्रजीत बीन म्हणत असले, तरी मराठीतील घेवडा या संज्ञेत त्यांचा समावेश केला जात नाही. भारतात घेवडा या नावाखाली पुढील वनस्पतींचा समावेश केला जातो. या सर्व वनस्पती मूळच्या दक्षिण अमेरिकेतील आहेत.

श्रावण घेवडा : या वनस्पतीच्या शेंगांना फरस बी म्हणतात. या वनस्पतीचे शास्त्रीय नाव फॅसिओलस व्हल्गॅरिस आहे. या जातीत अनेक बदल घडून आलेले आहेत. हिची वेल काहीशी ताठ सरळ वाढणारी असून ती २ – ३ मी. उंच वाढते. पाने संयुक्त, त्रिदली व एकाआड एक असतात. फुले पांढरी किंवा जांभळी असतात. शेंगा १० – २० सेंमी. लांब, पांढरट हिरव्या, वक्राकार, एक बाजू बहिर्गोल, पृष्ठभाग गुळगुळीत किंवा मऊ लवदार व चोचीदार टोकाच्या असतात. बिया वृक्काच्या आकाराच्या, चपटया, लांबट, पांढऱ्या किंवा तांबडया लालसर किंवा जांभळ्या रंगाच्या असतात. वाळलेल्या बियांना राजमा म्हणतात. घेवडयाच्या इतर बियांप्रमाणे या बियांमध्ये स्टार्च, प्रथिने आणि तंतुमय पदार्थ अधिक प्रमाणात असतात. याखेरीज लोह, पोटॅशियम आणि -समूह जीवनसत्त्वे असतात. या बियांच्या उत्पादनात भारत अग्रेसर आहे.

डफळ : (डबल बीन). या वनस्पतीचे शास्त्रीय नाव फॅसिओलस ल्युनॅटस आहे. ही वनस्पती वेलीसारखी किंवा झुडपासारखी वाढते. पाने संयुक्त, त्रिदली व एकाआड एक असतात. फुले पांढरी, शेंगा ५ – ७ सेंमी. लांब, चपटया, लवदार व चोचीदार टोकाच्या असतात. बिया चौकोनी ते लांबट, सपाट आणि पातळ असतात. बियांचा रंग पांढरा, तपकिरी किंवा लाल ठिपकेदार असतो.या बियांना लिमा बीन किंवा बटर बीन असेही म्हणतात. या बियांमध्ये तंतुमय पदार्थ आणि मेदमुक्त उच्च दर्जाची प्रथिने असतात.

चौधारी घेवडा : या वनस्पतीचे शास्त्रीय नाव सोफोकार्पस टेट्रॅगोनोलोबस आहे. सोफोकार्पस ही प्रजाती फॅसिओलस प्रजातीच्या जवळची आहे. मूळची न्यू गिनीतील ही वनस्पती फिलिपीन्स, इंडोनेशिया, भारत, म्यानमार, थायलंड, श्रीलंका इत्यादी देशांत लागवडीखाली आहे. ही वेल ३ – ४ मी. उंच वाढत असून ती कुंपणाच्या आधाराने वाढवितात. पाने संयुक्त व त्रिदली असतात. फुले मोठी व पांढरी असतात. शेंगा गर्द हिरव्या व १५ – २० सेंमी. लांब असतात. शेंगेवर चार धारा असून प्रत्येक धारेच्या टोकाला मऊ त्रिकोणी दाते असतात.भाजीसाठी हिरव्या शेंगा तसेच मुळे वापरतात. नायट्रोजन स्थिरीकरण करण्याची क्षमता या वनस्पतीमध्ये असल्याने तिच्या वाढीसाठी खतांची गरज सहसा भासत नाही.

पावटा : पावटा वा वाल या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या वनस्पतीचे शास्त्रीय नाव लॅबलॅब पर्प्यूरियस (डॉलिकस लॅबलॅब) आहे.या वनस्पतीचे मूळ स्थान भारत असून आफ्रिका, बांगला देश आणि इंडोनेशिया इत्यादी ठिकाणी ते पीक म्हणून घेतात. पाने संयुक्त, त्रिदली व एकाआड एक असून त्यांच्या बगलेत फुलोरे येतात. फुलांच्या मंजिऱ्या पांढऱ्या, लालसर किंवा जांभळ्या असतात. शेंगा २-१२ सेंमी. लांब, अरुंद, चपटया किंवा गोलसर, पांढऱ्या किंवा विविध रंगांच्या छटांमध्ये असतात. बिया चपटया, लंबगोल आणि करडया रंगाच्या असतात.

मुगा : या वनस्पतीचे शास्त्रीय नाव व्हिसिया फाबा आहे. हे वर्षायू झुडूप १ – ३ मी. पर्यंत उंच असून खोड पोकळ असते. पाने संयुक्त, २ – ६ पर्णिकांचे, पर्णिका ८ सेंमी. लांब असतात. फुले मोठी, पांढरी-जांभळे ठिपके असलेली आणि १ – ५ च्या गुच्छात येतात. शेंगा १ – ४ च्या गटाने व लांब असतात. बिया ६ – ८ हिरव्या किंवा पिवळ्या असतात. बिया भाजीसाठी उपयुक्त असतात. तसेच कबुतरे, कोंबडया, घोडे व डुकरांसाठी खादय म्हणून वापरतात. याला ब्रॉड बीन असेही म्हणतात.

घेवडयाच्या बियांचे पोषणमूल्य चांगले असते. त्यांमध्ये ३१% पर्यंत प्रथिने असून विद्राव्य तंतू, कर्बोदके (कार्बोहायड्रेटे), लोह व ‘ब’ समूह जीवनसत्त्वे असतात. विद्राव्य तंतूमुळे रक्तातील कोलेस्टेरॉलाची पातळी कमी होण्यास मदत होते. मात्र, घेवडयाच्या बियांमध्ये असलेल्या गंधकयुक्त प्रथिनांमुळे वातूळपणा वाढतो. वायूचा त्रास होऊ नये, म्हणून कच्च्या बियांतील फायटोहीमॅग्लुटिनिन नावाचे जीवविष काढून टाकण्यासाठी बिया प्रथम पाण्यात काही तास भिजत ठेवतात. हे पाणी फेकून देतात. नंतर वेगळ्या पाण्यात घेवडा कमीत कमी दहा मिनिटे उकळून घेतात.