(प्लांट). जीवसृष्टीतील हरितद्रव्ययुक्त आणि बहुपेशीय सजीवांचा समूह. वनस्पती स्वयंपोषी असून त्या स्वत:चे अन्न स्वत: निर्माण करतात. त्यांच्या पेशी दृश्यकेंद्रकी असून त्यांना पेशीभित्तिका असते; ती सेल्युलोजने बनलेली असते. पेशीभित्तिकेचे आवरण कठीण असल्याने पेशींचा आकार ठराविक असतो (पहा : पेशी). वनस्पती सहसा एका जागेवरून हलत नाहीत, एका जागी स्थिर राहतात. परंतु त्यांच्यात चलनवलन घडत असते. उदा., त्यांची वाढ, परागण, फळनिर्मिती आणि फळ व बीजप्रसार इत्यादी. वनस्पतींचा शास्त्रीय अभ्यास जीवविज्ञानाच्या एका स्वतंत्र शाखेत केला जातो, तिला वनस्पतिविज्ञान (बॉटनी) म्हणतात. वनस्पतिसृष्टीत वृक्ष, झाडे, झुडपे व गवत, वेली, नेचे, शेवाळी वनस्पती आणि हिरवे शैवाल इत्यादींचा समावेश केला जातो. मात्र कवके आणि बिनहरित शैवाल ही वनस्पती नसल्याने त्यांचा समावेश वनस्पतिसृष्टीत केला जात नाही.

बहुतेक वनस्पती जमिनीवर वाढतात. त्यांची मुळे जमिनीखाली वाढतात आणि खोडे जमिनीवर वाढतात, पाणी व खनिजे जमिनीतून मुळांद्वारे शोषली जातात, ती खोडावाटे पानांपर्यंत पोहोचतात. काही वनस्पती पाण्यावर तरंगतात. वनस्पतीच्या मुळांनी शोषलेले पाणी त्यांच्या पानांपर्यंत पोहोचण्यामागे काही प्रमाणात केशाकर्षण ही क्रिया असली तरी मुख्यत: दाबाच्या फरकामुळे पाणी वरवर चढते. वनस्पतींच्या मुळांमध्ये पाणी परासरणाद्वारे शोषले जाते आणि पाण्याबरोबर विरघळलेले घटक काष्ठ ऊतींमधून पानांपर्यंत वाहून नेले जातात. उंच वनस्पतींमध्ये, शेंड्याकडील पानांच्या पर्णरंध्रातून पाणी वातावरणात टाकले जाते. त्यामुळे तेथील पाण्याचा दाब कमी होतो आणि मुळांकडून शोषलेले पाणी (गुरुत्वाकर्षण बलाच्या विरुद्ध दिशेने) जोराने वर ढकलले जाते (पहा : बाष्पोत्सर्जन). वनस्पतींना अन्ननिर्मितीसाठी सूर्यप्रकाश, कार्बन डायऑक्साइड, पाणी आणि खनिजे इ.ची गरज असते. वनस्पतींची पाने वेगवेगळ्या आकाराची आणि आकारमानाची असतात. पानांच्या हरितलवकांमध्ये हरितद्रव्य असते, ते प्रकाश ऊर्जा शोषून घेते आणि अन्ननिर्मिती होत असते. या प्रक्रियेला ‘प्रकाशसंश्लेषण’ म्हणतात (पहा : प्रकाशसंश्लेषण). म्हणून पानांना वनस्पतीचा अन्ननिर्मितीचा कारखाना म्हणतात. वनस्पतींचे अन्न ग्लुकोज या शर्करेच्या स्वरूपात तयार होते. त्याचे नंतर पेशीद्रव्यात स्टार्चसारख्या कर्बोदकांमध्ये रूपांतर होते. हे तयार झालेले अन्न साठविण्यासाठी किंवा उपयोगासाठी वनस्पतींच्या इतर अवयवांकडे म्हणजे मूळ, खोड यांच्याकडे अधोवाहिनीद्वारे पाठवले जाते. वनस्पतींना लागणारी खनिजे त्यांच्या वाढीसाठी आणि इतर प्रक्रियेसाठी लागतात. उदा., प्रथिनांच्या निर्मितीसाठी नायट्रोजन, एटीपी (ॲडिनोसीन ट्रायफॉस्फेट) व ऊर्जा चक्रासाठी फॉस्फरस, पाणी नियमनासाठी पोटॅशियम, पोषक अन्नपदार्थांच्या वहनासाठी कॅल्शियम, विकर निर्मितीसाठी मॅग्नेशियम, काही ॲमिनो आम्लासाठी सल्फर किंवा गंधक आणि पेशीभित्त‍िकेसाठी सिलिकॉन ही खनिजे मोठ्या प्रमाणावर लागतात. तसेच काही खनिजे अल्प प्रमाणात लागतात; आयनांच्या समतोलासाठी क्लोरीन, प्रकाशसंश्लेषण प्रक्रिया आणि विकर निर्मितीसाठी लोह व झिंक, शर्करावहन आणि पेशीविभाजनासाठी बोरॉन, हरितलवकांसाठी मँगॅनीज, पेशींमध्ये तसेच पेशींभोवती पाण्याचे संतुलन राखण्यासाठी व इतर अनेक कारणांसाठी सोडियम, प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेसाठी तांबे, विकरांसाठी निकेल व मॉलिब्डेनम यांची आवश्यकता असते.

वनस्पती एका जागेहून दुसऱ्या जागी जात नसल्या, तरी त्यांच्यात चलनवलन होते. ज्याच्यामुळे प्रकाशसंश्लेषण, परागण, फलन, वाढ आणि प्रसार इ. क्रिया घडत असतात. वनस्पतींमध्ये शरीरक्रियांसाठी प्राण्यांप्रमाणे विशिष्ट संस्था नसतात. उदा., चेतासंस्था, पचन संस्था, उत्सर्जन संस्था इत्यादी. बाह्य संवेदनांना वऩस्पतीचा प्रतिसाद प्राण्यांच्या तुलनेत सावकाश असतो (पहा : वनस्पतींची हालचाल). वनस्पतींमध्ये प्रजनन म्हणजेच पुनरुत्पादन शाकीय, अलैंगिक आणि लैंगिक पद्धतीने होते. शाकीय प्रजनन मुकुलन, कलम वगैरे प्रकारांनी, तर अलैंगिक प्रजनन बीजाणूंद्वारे होते. लैंगिक प्रजननात नर-युग्मक आणि मादी-युग्मक यांच्या मिलनातून युग्मनज तयार होऊन नवीन वनस्पती निर्माण होते. शाकीय प्रजनन शैवालांमध्ये तसेच अनेक इतर वनस्पतींमध्ये घडून येते, अलैंगिक प्रजनन शेवाळी, नेचे, अपुष्प वनस्पती व सपुष्प वनस्पतींमध्ये घडते, तर लैंगिक प्रजनन काही मोजक्या वनस्पती वगळता सर्वच वनस्पतींमध्ये घडते.

वनस्पती विविध आकारांत आढळतात. यात काही मिलिमीटर लांबीचे असलेले सर्वांत लहान डकवीड, तर ३० मी. किंवा त्याहीपेक्षा अधिक उंचीचे कॅलिफोर्नियातील सीक्काया वृक्ष यांचा समावेश होतो. वनस्पतींच्या सु. ३,२०,००० जाती आहेत; त्यांपैकी २,६०,००० ते २,९०,००० जाती बीजी वनस्पती आहेत. वनस्पतींमध्ये विविधता दिसून येते आणि त्यानुसार त्यांचे विभाग केले जातात; अबीजी वनस्पती [शैवाल (हरित शैवाल), शेवाळी वनस्पती (ब्रायोफायटा, यकृतका, शृंगका, शेवाळ), टेरिडोफायटा (नेचे)] आणि बीजी वनस्पती [सायकॅड, गिंको, शंकुधारी, नेटोफाइट, सपुष्प वनस्पती] इत्यादी.

वनस्पतीची जनुके त्यांच्या वाढीचे नियमन करतात. उदा., गव्हाच्या काही नवीन जाती सु. ११० दिवसांत पीक देतात, तर गव्हाच्या इतर जाती सारख्याच पर्यावरणात पीक येण्यासाठी सु. १५५ दिवसांपेक्षा जास्त दिवस घेतात. वनस्पतींच्या वाढीसाठी पर्यावरणीय घटक जसे तापमान, पाणी, सूर्यप्रकाश, कार्बन डायऑक्साइड आणि पोषक घटक आवश्यक असतात. यांपैकी एकाही बाह्य घटकात बदल झाला, तर त्याचा परिणाम वनस्पतीच्या वाढीवर व वाढीच्या कालावधीवर होतो. शैवालासारख्या वनस्पतीचा आयु:काल कमी असतो, परंतु त्यांची समष्टी सामान्यपणे एक हंगाम टिकते. एकवर्षायू वनस्पती वर्षभर वाढतात आणि याच कालावधीत पुनरुत्पादन करतात. द्विवर्षायू वनस्पती दोन वर्षभर जगतात आणि दुसऱ्या वर्षी पुनरुत्पादन करतात. बहुवर्षायू वनस्पती अनेक वर्षे जगतात आणि पूर्ण वाढल्यानंतर वर्षातून एकदा पुनरुत्पादन करतात. ज्या वनस्पती आल्पीय किंवा समशीतोष्ण प्रदेशांत एकवर्षायू असतात, त्या उष्ण हवामानात द्विवर्षायू किंवा बहुवर्षायू म्हणून जगतात. संवहनी वनस्पतींच्या, बहुवर्षायू वनस्पतींपैकी सदाहरित वनस्पतींची पाने वर्षभर राहतात, तर पानझडी वृक्षांची पाने गळून पडतात.

वनस्पतींचे महत्त्व : पृथ्वीला वनस्पती असल्याने तिला हरित ग्रह म्हणतात. वनस्पतींशिवाय पृथ्वीवरील पर्यावरण आणि सजीवसृष्टी अशक्य आहे. वनस्पतींपासून मनुष्याच्या अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा पूर्ण होतात. वनस्पतींमुळे शुद्ध हवा, अन्न आणि पाणी आपल्याला मिळते. म्हणून रस्त्याच्या कडेने, मोकळ्या जागेत, शेतात, बागेत तसेच घरामध्ये कुंड्यातून आपण झाडे लावतो. जगातील अनेक आर्थिक बाबी वनस्पतींशी निगडित असून बहुतेक देशांची अर्थव्यवस्था कृषिउद्योगांवर अवलंबून असते. अनेक देशांतील लोक चरितार्थासाठी वनस्पतींपासून मिळणाऱ्या उत्पादनावर अवलंबून असतात.

पर्यावरणीय महत्त्व : पर्यावरण, हवामान आणि वनस्पती या एकमेकांशी निगडीत आहेत. वनस्पतींचा प्रभाव पर्जन्यमान, आर्द्रता, तापमान इ. घटकांवर पडतो. वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा समतोल बिघडतो आणि त्याचा अप्रत्यक्ष परिणाम मानवी जीवनावर होतो. पर्यावरणातील सर्व अन्नसाखळ्यांतील पायाच्या स्तरावर वनस्पती असतात आणि अन्नसाखळीतील इतर सर्व सजीवांना अन्न त्या पुरवतात.

वनस्पती वातावरणातील वायूंचा समतोल राखण्याचे कार्य करतात. प्राणी श्वसनक्रियेद्वारे हवेतील ऑक्सिजन शरीरात घेतात आणि कार्बन डायऑक्साइड बाहेर सोडतात. इंधनांच्या ज्वलनामुळे वातावरणात मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साइड निर्माण होतो. त्यामुळे वातावरणातील कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण वाढून समतोल बिघडतो (पहा : जागतिक तापन). परंतु वनस्पती वातावरणातील कार्बन डायऑक्साइड अन्ननिर्मितीसाठी वापरून त्याचे वातावरणातील प्रमाण कमी करतात. या प्रक्रियेत ऑक्सिजन वायू मुक्त होत असल्याने वातावरणात ऑक्सिजनचे प्रमाण वाढते आणि सजीवांना ऑक्सिजन उपलब्ध होतो. वनस्पती जमिनीचे क्षरण थांबवतात. जमिनीची धूप, वादळ, पाऊस, सोसाट्याचा वारा इ. कारणांमुळे जमिनीवरचा मातीचा थर उडून जातो. परंतु अशा ठिकाणी वनस्पती असल्यास अशा गोष्टींना प्रतिबंध होतो. वनस्पतींच्या हिरव्या पानांमुळे वातावरणातील उष्णता कमी होऊन आर्द्रता कायम राखली जाते. बाष्पोत्सर्जनामुळे वनस्पती वातावरणात आर्द्रता निर्माण करतात, त्यामुळे थंडावा निर्माण होऊन पाऊस पडायला मदत होते; वाळवंटात ते घडत नाही, म्हणून तेथे पाऊस कमी पडतो. पावसामुळे पिण्यासाठी, शेतीसाठी, उद्योगांसाठी पाणी उपलब्ध होते. म्हणून पर्जन्यवृष्टीसाठी वनस्पती आवश्यक असतात. वनस्पती जमिनीची सुपीकता कायम राखतात. वनस्पतींची पाने, फळे, फुले, खोडाच्या साली आणि इतर भाग जमिनीवर पडून कुजतात आणि कुथित मृदा तयार होते. अशा मृदेमुळे जमिनीची सुपीकता वाढते. कारण ती सूक्ष्मजीवस्नेही असते. नील-हरित शैवाल आणि जीवाणू जमिनीत नायट्रोजन स्थिरीकरण करायला मदत करतात. काही जीवाणू, कवके आणि प्राणी यांना पोषण तसेच आश्रय देण्याचे कार्य वनस्पती करतात. रणरणत्या उन्हापासून आणि जोरदार पावसापासून वनस्पतींमुळे प्राणी सुरक्षित राहतात.

अन्न, औषधे, इंधन इत्यादींसाठी वनस्पतींचा उपयोग : मनुष्य आणि पाळीव प्राणी अन्नासाठी वनस्पतींवर अवलंबून असतात. कृषिउद्योगात वेगवेगळी पिके, वनस्पती आणि फळे यांची लागवड करतात. सद्यस्थितीला अन्नाची गरज भागण्यासाठी वनस्पतींच्या सु. ३० जाती आवश्यक असल्या, तरी सु. ७,००० वनस्पतींच्या जातींची लागवड केली जाते. यात गहू, तांदूळ यांसारखी तृणधान्ये; बटाटा, कांदा इ. वनस्पती, वाटाणा, घेवडा इ. शिंबावंत वनस्पती; शेंगदाणा, सूर्यफूल, मोहरी इ. तेल वनस्पती तसेच जीवनसत्त्वे व खनिजे यांसाठी फळे यांचा समावेश होतो. इमारतीच्या लाकडांसाठी वनांची लागवड केली जाते.

औषधी वनस्पतींपासून विविध कार्बनी (सेंद्रिय) संयुगे मिळतात. त्यांचा वापर औषधे आणि शरीरक्रियांवर परिणाम घडण्यासाठी आणि विविध कार्बनी संयुगाच्या संश्लेषणासाठी केला जातो. यातूनच ॲस्पिरीन, मॉर्फिन, क्विनीन, रिसर्पिन, डिजीटॅलिस इ. औषधे प्रयोगशाळेत तयार केली गेली आहेत. काही वनस्पती औद्योगिक पिके (किंवा बिगरअन्न उत्पादने) म्हणून वाढवली जातात. यात बाष्पनशील तेले, रंग, रंगद्रव्ये, मेण, राळ, टॅनिने, अल्कलॉइडे, अँबर इत्यादींचा समावेश होतो. वनस्पतींपासून तयार केल्या जाणाऱ्या उत्पादनांमध्ये साबण, शॅम्‍पू, सौंदर्यप्रसाधने, रंगलेप (पेंट), रबर, चीक, वंगणे, शाई इ.चा समावेश होतो. वनस्पतींपासून कच्च्या पदार्थांचा पुरवठा होतो. त्यापासून मिळणाऱ्या लाकडाचा उपयोग घराचे बांधकाम, फर्निचर, स्वयंपाक इत्यादींसाठी होतो. तसेच वनस्पतींपासून जळाऊ लाकूड, जैवइंधने मिळतात. कोळसा, पेट्रोलियम उत्पादने, नैसर्गिक वायू वनस्पतींपासूनच उपलब्ध होतात. त्यापासून मिळणाऱ्या धाग्यापासून कापड विणले जाते.

वनस्पतींच्या हजारो जाती एखाद्या ठिकाणाचे सौंदर्यमूल्य वाढण्यासाठी, सावलीसाठी, वाहणाऱ्या वाऱ्याचा वेग कमी करण्यासाठी, परिसरातील आवाज कमी होण्यासाठी आणि मातीची धूप थांबवण्यासाठी लावल्या जातात. वनस्पती पर्यटन उद्योगात हातभार लावतात; जसे इतिहासकालीन बागा, राष्ट्रीय उद्याने, वर्षावने, वने यांना लोक आवर्जून भेटी देतात. वृक्ष-उद्याने आणि वनस्पती उद्यानांमध्ये जिवंत वनस्पतींचा संग्रह केला जातो.

जीववैज्ञानिकांनी वनस्पतिसृष्टीला पुढील जीवसहंतीमध्ये (वनस्पती, प्राणी आणि इतर सूक्ष्मजीवांचे नैसर्गिक समुदाय) विभागले आहे. पुढील तक्त्यात त्या प्रदेशात प्रामुख्याने आढळणाऱ्या वनस्पतींची उदाहरणे आहेत  :

प्रदेश उदाहरणे
१. टंड्रा खुरटी झुडपे, शेवाळ, हरिता, दगडफूल-लायकेन इ.
२. तैगा/बोरिअल प्रदेश (सदाहरित सूचिपर्ण वनस्पती) बाल्सम फर, कृष्ण स्प्रूस, जॅक पाइन, शुभ्र स्प्रूस इ.
३. समशीतोष्ण (शंकुधारी सूचिपर्ण वने) सीडार, डग्लस फर, बृहत्‌वृक्ष सीक्काया, हेमलॉक, पाइन रेडवुड इ.
४. समशीतोष्ण पानझडी वने बासवुड, ॲश, बीच, हिकरी, मॅपल, ओक, पॉप्लर, यलो पॉप्लर वॉलनट इ.
५. चॅपॅरल कॉर्क ओक, ओक, मॅनझानिटा, इतर औषधी वनस्पती इ.
६. वाळवंट कॅक्टस, इतर मांसल/रसाळ वनस्पती इ.
७. तृणभूमी गवत – स्टेप मधील लहान गवत आणि प्रेअरीतील उंच गवत इ.
८. सॅव्हाना गवत, बाभूळ, बेल, चिंच, गोरखचिंच, ताड इ.
९. उष्णकटिबंधीय वर्षावने दालचिनी, महोगनी, कोकाओ, साग इ.
१०. उष्णकटिबंधीय शुष्कवने बाभूळ, गोरखचिंच, पांढरी सावर, शाल्मली, कोलानट इ.

 

यासह पाण्यातही अनेक वनस्पती आढळतात. यात–झोस्टेरा, डकवीड, पाणकणीस, इलोडिया, सायपरेसी इ. यांचा समावेश होतो. (पहा : वनश्री).