घोसाळे उष्ण प्रदेशातील एक वर्षायू वेल आहे. ही वनस्पती कुकुर्बिटेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव लुफा एजिप्टिका किंवा लुफा सिलिंड्रिका आहे. ही वेल मूळची भारतातील असून आशिया आणि आफ्रिका खंडांच्या उष्ण प्रदेशात लागवडीखाली आढळते.

पाने, फुले व फळांसहित घोसाळे

आधारावर वाढलेली घोसाळ्याची द्विलिंगाश्रयी वेल त्रिशाखी तणावाच्या साहाय्याने वर चढते. पाने साधी, मोठी, लवदार व हस्ताकृती असून पाच खंडांत विभागलेली असतात. नर फुले (पुं-पुष्पे) पानांच्या बगलेतील फुलोऱ्यावर ४/२० संख्येने येतात. नर फुले मोठी असून त्यांच्या पिवळ्या पाकळ्यांवर हिरवट रेषा असतात. मादी फुले (स्त्री-पुष्पे) एकेकटी, नर फुलांच्या फुलोऱ्याच्या तळाशी व स्वतंत्र देठांवर येतात. फळे मोठी, दंडगोलाकार, २०–२५ सेंमी. लांब, फिकट हिरवी असून त्यावर साधारणपणे १० उभ्या रेषा असतात. बिया काळ्या किंवा करडया व चपटया असतात.

घोसाळे मुख्यत: फळभाजीचे पीक आहे. कोवळी फळे भाजी, भजी किंवा भरीतासाठी वापरतात. जुने फळ चवीला कडवट लागते. कोवळे फळ मूत्रल व दुग्धवर्धक आहे. फळांचा रस रेचक असून काविळीवर नैसर्गिक उपचार म्हणून वापरतात. फळ भाजून व पूड करून वायुनाशी व कृमिनाशी म्हणून वापरतात. बिया वांतिकारक व सारक आहेत. त्यांचे तेल त्वचारोगावर वापरतात. वाळलेल्या फळापासून स्पंजासारखा उपयुक्त पदार्थ मिळतो.