चंदनबटवा ही ॲमरँटेसी कुलाच्या चिनोपोडिओइडी उपकुलातील वनस्पती असून तिचे शास्त्रीय नाव ॲट्रिप्लेक्स हॉर्टेन्सिस आहे. पालक, बीट या वनस्पतीदेखील या उपकुलात समाविष्ट आहेत. पश्चिम आशिया हे तिचे मूलस्थान असून यूरोप व उत्तर अमेरिकेच्या काही भागांत ती आढळते. भारतात काश्मीर, पश्चिम बंगाल, आसाम, महाराष्ट्र आणि दक्षिण भागात या वनस्पतीची पालेभाजीसाठी लागवड करतात.

पानांफुलांसहित चंदनबटवा

चंदनबटवा सु. ०.५ मी. उंचीची वर्षायू वनस्पती असून ती रंगाने हिरवी, पिवळट व लालसर असते. या वनस्पतीला कापरासारखा वास येतो. तिला फांदया नसतात. पाने साधी, एकाआड एक असून खालची किंचित त्रिकोणी, तर शेंडयाकडची लांबट असतात. पाने रंगाने हिरवी, पिवळसर, केशरी, जांभळी किंवा लालसर जांभळी असतात. फुले स्तबकाने येत असून ती लहान, व्दिलिंगी, हिरवट किंवा लालसर असतात. बिया लहान व काळ्या असून त्यांवर पातळ व फिकट पिवळ्या रंगाचे आवरण असते.

प्राचीन काळापासून ही वनस्पती पालेभाजीसाठी उपयोगात आहे. पाने चवीला किंचित आंबट असतात. ती उकडून खातात किंवा सॅलडसाठी वापरतात. संग्रहणी, मूळव्याध या विकारांवर व कृमिनाशक म्हणून ही उपयुक्त आहे.