कोकिळा, पावशा वगैरे पक्ष्यांबरोबरच चातक या पक्ष्याचाही क्युक्युलिडी कुलात समावेश होत असून तो आफ्रिका व आशिया खंडांत आढळतो. त्याच्या प्रमुख तीन उपजाती पायका, सीरेटसयाकोबिनस मानल्या जातात. पायका ही उपजाती दक्षिण आफ्रिका, वायव्य भारतीय उपखंड, उत्तर भारत, नेपाळ व म्यानमार येथे आढळते. सीरेटस ही मध्य आफ्रिकेत आढळते, तर याकोबिनस दक्षिण भारत व श्रीलंकेत दिसते. तो भारतात हिमालयात सस.पासून सु.२,४४० मी. उंचीपर्यंत आढळतो. याचे शास्त्रीय नाव क्लेमेटर याकोबिनस आहे. चातक हा स्थलांतर करणारा पक्षी आहे. उत्तर भारतात पावसाळ्यात नेहमी आढळणारी त्याची सीरेटस ही प्रजाती आफ्रिकेतून प्रजननासाठी स्थलांतर करते.
चातक (क्लेमेटर याकोबिनस)

चातक आकाराने साधारणत: साळुंकीएवढा असतो, पण त्याचे शेपूट लांब असते. शरीराचा वरील सर्व भाग, डोके व त्यावरचा चोचीसारखा दिसणारा ठसठशीत तुरा काळ्या रंगाचा असतो. हनुवटी, मान व पोटाचा भाग पांढरा असतो. पंखांवर रुंद पांढरा पट्टा असल्यामुळे उडतानाही हा पक्षी ओळखता येतो. शेपटीतील पिसांची टोके पांढरी असतात. डोळे तांबडे तपकिरी, चोच काळी व पाय काळसर निळे असतात. नर व मादी सारखेच दिसतात. हे एकेकटे किंवा यांची जोडी असते.

दमट आणि भरपूर पाणी असणारे प्रदेश चातकाला विशेष आवडतात. तो नेहमी दाट झाडीत राहतो. तसेच, मनुष्यवस्तीच्या आसपासच्या झाडांवरही आढळतो. टोळ, नाकतोडे, केसाळ सुरवंट, मुंग्या, कोळी व क्वचित काही फळे हे त्याचे भक्ष्य असते. वृक्षवासी असला तरी भक्ष्य मिळविण्यासाठी कधीकधी तो जमिनीवर उतरतो. तो भित्रा किंवा एकलकोंडा नाही. तो पी-पी-पिऊ, पिऊ-पिऊ-पी-पी-पिऊ असे आवाज काढतो.

चातकाची वीण जूनपासून ऑगस्टपर्यंत होते. मीलन काळात हे पक्षी खूप गोंगाट करतात. कोकिळेप्रमाणे याही पक्ष्यात भ्रूण परजीविता दिसून येते. मादी आपली अंडी छोट्या सातभाई पक्ष्याच्या घरट्यात घालते. अंडी घालण्यासाठी ती सकाळची वेळ निवडते. ती सरळ सातभाईच्या घरट्याजवळ जाते. सातभाई हा लहान पक्षी असल्यामुळे भिऊन घरट्यातून पळून जातो व काही आडकाठी न येता तिला सातभाईच्या घरट्यात अंडे घालता येते. अंड्याचा रंग सातभाईच्या अंड्याप्रमाणेच आकाशी असतो. सप्टेंबरच्या सुमारास सातभाईची पिले अंड्यांतून बाहेर येतात. त्यांमध्येच चातकाचे पिल्लू असते. आपल्या पिलांबरोबर सातभाई चातकाच्या पिलाला वाढवितात. चातकाचे पिल्लू तपकिरी रंगाचे असून त्याच्या पंखांवर पिवळसर आडवा पट्टा असतो. त्यामुळे ते सहज ओळखू येते.