शहामृग (स्ट्रुथिओ कॅमेलस)

(ऑस्ट्रिच). पक्ष्यांमध्ये आकारमानाने सर्वांत मोठा परंतु उडू न शकणारा पक्षी. शहामृगाचा समावेश स्ट्रुथिऑर्निफॉर्मिस गणाच्या स्ट्रुथिओनिडी कुलात केला जातो. सामान्य शहामृगाचे शास्त्रीय नाव स्ट्रुथिओ कॅमेलस आहे. तो आफ्रिकेच्या निरनिराळ्या भागात तसेच टर्की या देशाच्या रेताड वाळवंटी प्रदेशात, वर्षावनांमध्ये आणि मोकळ्या प्रदेशात आढळतो. मध्य पूर्वेकडील देशांत त्याची मोठ्या प्रमाणात शिकार झाल्यामुळे विसाव्या शतकात तेथे त्याचे अस्तित्व संपुष्टात आले. सर्वांत वेगाने पळणारा पक्षी आणि पक्ष्यांमध्ये सर्वांत मोठे अंडे देणारा पक्षी अशीही त्याची वैशिष्ट्ये आहेत. भारतातील बिरबल साहनी इन्स्टिट्यूट या संस्थेने केलेल्या जीवाश्मांच्या संशोधनातून सु. २५,००० वर्षांपूर्वी भारतात शहामृग राहात असल्याचे आढळले आहे. आता मात्र भारतात तो आढळत नाही.

शहामृगाच्या पूर्ण वाढलेल्या नराची उंची २.१–२.८ मी., मान व पाय लांब असल्यामुळे त्याचे डोके जमिनीपासून सु. २.८ मी. उंचीवर असते. तसेच तो कोणत्याही दिशेला मान फिरवू शकत असल्याने भक्षकाची जाणीव त्याला दूरवरून होते. वजन ६३–१५० किग्रॅ. असते. शहामृगाचे डोके व मान खूपच लहान असून त्यावर तुरळक कोमल पिसे असतात. डोळे तपकिरी असून सर्व पृष्ठवंशी प्राण्यांमध्ये ते मोठे असतात. डोळ्यांभोवती काळसर वलये असतात. पाय लांब व बळकट असतात. पायाच्या फटकाऱ्याने तो सिंहासारख्या प्राण्याला जायबंदी करू शकतो. पायाला दोन बोटे असतात; त्यांपैकी एक लहान व एक मोठे असते. मोठे बोट ३९–५३ सेंमी. लांब असते आणि त्यावर टोकदार नख असते. त्यांचा उपयोग तो शस्त्राप्रमाणे संरक्षणासाठी करतो. नर मादीपेक्षा आकारमानाने मोठा असतो व आकर्षक दिसतो. त्याच्या शरीरावर मऊ काळी पिसे व आखूड पंख असतात. शेपटीची पिसे पांढरी असतात. मादीचा रंग भुरकट अथवा फिकट तपकिरी असतो.

शहामृग सर्वभक्षी आहे. तो बिया, गवत, झुडूप, पाने, फळे, फुले, कीटकांच्या अळ्या, टोळ इ. खातो. तो रसाळ वनस्पती, वेली खात असल्याने बराच काळ पाण्याशिवाय राहू शकतो. म्हणून त्याला इंग्लिश भाषेत  ‘कॅमल बर्ड’ असेही म्हणतात. प्रजननकाळात व अवर्षणकाळात शहामृग ५ ते ५० च्या थव्याने राहतात आणि अनेकदा ते झीब्रा, काळवीट यांच्यासोबत वावरतात. त्यांची दृष्टी व श्रवणशक्ती तीव्र असल्याने सिंहासारखे भक्षक प्राणी ते लांबून ओळखू शकतात आणि ते इतर प्राण्यांना भक्षक प्राण्यांपासून सावध करतात. साधारणपणे सकाळी व संध्याकाळी ते अधिक सक्रिय असतात. विश्रांती घेताना शहामृग मान व डोके जमिनीवर पसरून बसतो, त्यामुळे लांबून पाहणाऱ्यास एखादा मातीचा ढिगारा जमिनीवर असावा असे वाटते. संकटाची जाणीव झाल्यावर तो मोठ्याने आवाज करीत पळतो. त्याचा पळण्याचा वेग ताशी सु. ७० किमी. असू शकतो. एका ढांगेत तो ४-५ मी. अंतर पार करतो. कोंडी केल्यास तो जोरात धडक देतो. पंखांचा उपयोग तो पळताना तोल सांभाळण्यासाठी आणि वेग कमीजास्त करण्यासाठी करतो.

शहामृगाचा प्रजननकाळ मार्च-एप्रिल पासून सप्टेंबरपर्यंत असतो. नराचे एका वेळी ५-६ माद्यांवर वर्चस्व असते. पक्ष्यांमध्ये शहामृग व एमू यांना मैथुन इंद्रिय म्हणजे शिस्न असते. प्रणयाराधनाच्या वेळी मादीला आकर्षित करण्यासाठी तो विशिष्ट आवाज काढतो व फुत्कारतो. नर सर्व माद्यांबरोबर मीलन करत असला तरी त्यातील एका मुख्य मादीबरोबर तो जोडीने राहतो. प्रत्येक मादी सहा ते आठ अंडी घालते. एका खड्ड्यात १५ ते ६० अंडी आढळतात. अंडी उबवताना दुबळ्या मादीने घातलेली अंडी वेगळी केली जातात. अशा प्रकारे घरट्यात सु. २० अंडी ठेवली जातात. अंड्यांचा आकार १५ सेंमी. लांब व १३ सेंमी. रुंद असून वजन सु. १.४ किग्रॅ. असते. माद्या दिवसा, तर नर रात्री अंडी उबवितो. सु. ४० दिवसानंतर पिले बाहेर येतात. काही तासांतच पिले मात्यापित्याबरोबर फिरू लागतात. तीन-चार वर्षांत पिलांची वाढ पूर्ण होते. शहामृगाचा आयु:काल ४०–४५ वर्षे असतो.

शहामृगाचे कुल एकच असून त्याच्या पुढील उपजाती आहेत: (१) दक्षिणेतील आफ्रिकन शहामृग (स्ट्रुथिओ कॅमेलस ऑस्ट्रॅलिस), (२) उत्तरेतील आफ्रिकन शहामृग (स्ट्रुथिओ कॅमेलस कॅमेलस), (३) मसाई शहामृग (स्ट्रुथिओ कॅमेलस मसाईकस), (४) सोमाली शहामृग (स्ट्रुथिओ कॅमेलस मॉलिब्डोफॅन्स) आणि (५) अरेबियन शहामृग (स्ट्रुथिओ कॅमेलस सिरियाकस). त्यांपैकी अरेबियन शहामृग ही उपजाती शिकार व पिसांसाठी हत्या केल्याने १९६६ च्या सुमारास नष्ट झाली आहे.

एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला शहामृगाच्या पिसांना मागणी वाढल्याने त्यांची मोठ्या प्रमाणावर शिकार झाली. शहामृगाच्या कातडीपासून बूट, पट्टे, पिशव्या, बटवे इ. वस्तू तयार करतात. सध्या आफ्रिकेत त्यांच्या संवर्धनासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत.