चिनाराची साल शिर्क्यात उकळून अतिसार, आमांश, अंतर्गळ व दातदुखीवर लावतात. स्कर्व्ही या रोगाला रोधक असे गुणधर्म सालीत आहेत. ताजी पाने कुस्करून त्याचा लेप डोळे आल्यास डोळ्यांवर लावतात. लाकूड पांढरे असून त्यावर पिवळी किंवा तांबूस छटा असते. ते सुबक, मध्यम कठीण व वजनदार असले तरी बळकट नसते. सावलीत ते चांगले टिकते. रापवताना वेडेवाकडे होते, रंधून चांगले गुळगुळीत होते आणि त्याला उत्तम झिलई करता येते. जम्मू व काश्मीरमध्ये त्याचा उपयोग लहान पेटया, भिन्न आकाराची तबके व तत्सम वस्तूंसाठी केला जातो. नंतर या वस्तू लाक्षारस व रंगलेप लावून रंगवितात. यूरोपात व आशियात त्याचा उपयोग कपाटे, पृष्ठावरणाचे तक्ते, गाडया, कोरीव व कातीव कामे आणि लगदा यांसाठी करतात. या वृक्षाच्या डहाळ्या आणि मुळे यांपासून कापडाला दिले जाणारे रंग मिळवितात. शोभेचा वृक्ष म्हणून पंजाब आणि जम्मू व काश्मीर या राज्यांत या वृक्षाला महत्त्व आहे. रस्त्याच्या दुतर्फा सावलीसाठी मुद्दाम लागवड करतात. चिनार वृक्षाला हिपॉक्राटीझचा वृक्ष असेही म्हणतात. हिपॉक्राटीझ (इ.स.४६०—इ.स.३७९) हा प्राचीन ग्रीक वैदयक. त्याला पाश्चिमात्य वैदयकशास्त्राचा जनक म्हणतात. त्याने याच वृक्षाखाली त्याच्या विदयार्थ्यांना वैदयकशास्त्र शिकविले, अशी आख्यायिका आहे.
मागील काही वर्षांत बेसुमार वृक्षतोडीमुळे काश्मीरमधील चिनार वृक्षांची संख्या निम्म्याने घटली आहे. त्यामुळे राज्य सरकारने चिनारच्या लागवडीचा व्यापक कार्यक्रम हाती घेतला आहे.