जीवाणूंचा एक संघ. सायनोबॅक्टेरिया संघातील जीवाणू प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेने ऊर्जा मिळवतात. ऑक्सिजन निर्माण करणारे ते एकमेव आदिकेंद्रकी सजीव आहेत. त्यांचा रंग निळसर-हिरवा (इंग्लिश भाषेत सायान) असल्याने त्यांना ‘नील-हरित जीवाणू’ अर्थात ‘सायनोबॅक्टेरिया’ असे नाव पडले आहे. नील-हरित जीवाणू आदिकेंद्रकी असले, तरी पूर्वी त्यांना ‘नील-हरित शैवाल’ म्हटले जात असे; परंतु आता ‘शैवाल’ ही संज्ञा दृश्यकेंद्रकी सजीवांसाठीच वापरली जाते. नील-हरित जीवाणूंच्या संरचनेत अंतर्गत पटले असतात. ही पटले म्हणजे चपट्या पिशव्या असून त्यांना ‘थायलाकॉइडे’ म्हणतात, ज्यांच्यात प्रकाशसंश्लेषण घडून येते. या जीवाणूंद्वारे ऑक्सिजन निर्माण होत असल्याने पृथ्वीवर ऑक्सिजनयुक्त वातावरण निर्माण झाले आणि विनॉक्सिजीवी सजीव जवळजवळ लोप पावले जाऊन पृथ्वीवरील सजीवसृष्टीचे स्वरूप बदलले, असे मानले जाते. नील-हरित जीवाणूंच्या सु. १५० प्रजाती आणि सु. २,००० जाती आहेत.

सायनोबॅक्टेरिया

नील-हरित जीवाणू एकपेशीय असतात; त्यांपैकी काही तंतूंसारखे असतात. ते ओल्या मातीत किंवा पाण्यात, मुक्तपणे किंवा वनस्पती व शैवाके यांच्यासमवेत सहजीवी स्थितीत राहतात; त्यांपैकी काही नायट्रोजन स्थिरीकरणात भाग घेतात. त्यांच्या वसाहती असून या वसाहती तंतूंसारख्या, कागदाप्रमाणे चपट्या किंवा पोकळ चेंडूसारख्या असतात. काही तंतुमय जातींच्या पेशींचे विभेदन वेगवेगळ्या प्रकारच्या पेशींमध्ये झालेले असते जसे की, शाकीय पेशी (व्हेजिटेटिव्ह) – या साध्या, प्रकाशसंश्लेषी पेशी असून त्यांची वाढ अनुकूल परिस्थितीत होते. निश्चेष्ट पेशी (मोशनलेस) – हे हवामानरोधी बीजाणू असून पर्यावरणाची स्थिती बिकट असताना तयार होतात आणि असमकोष्ठ (हेटेरोसिस्ट) – या पेशींची भित्तिका जाड असून त्यांच्यात नायट्रोजिनेझ विकर असल्याने ते नायट्रोजन स्थिरीकरणात भाग घेतात.

अनेक नील-हरित जीवाणूंच्या वसाहतीमधल्या काही पेशींचे चलतंतूंमध्ये रूपांतरण होते. त्यांना छन्नखंड (हॉर्मोगोन) म्हणतात. ते अंकुरणासाठी आणि इतर कोठेतरी नवीन वसाहत तयार करण्यासाठी मुख्य जैववस्तुमानापासून अलग होतात आणि वाहत जातात. छन्नखंडातील पेशी शाकीय असतात. नील-हरित जीवाणूंच्या पेशींची पेशीभित्तिका जाड व जिलेटिनयुक्त असते. त्यांना कशाभिका नसते; परंतु काही जातींचे छन्नखंड कडांवर सरकून हालचाल करू शकतात. ऑसिलोटोरिया प्रजातीचे तंतू एखाद्या लाटेसारखी हालचाल करतात. काही नील-हरित जीवाणूंमध्ये वायुपुटिका असतात. या वायुपुटिकांद्वारे हे जीवाणू पाण्यावर तरंगत पुढे जातात. मात्र या वायुपुटिका अंगके नसतात आणि ती मेदपटलांऐवजी प्रथिनांनी वेढलेली असतात.

काही नील-हरित जीवाणू विनॉक्सी परिस्थितीत असमकोष्ठ पेशींद्वारे ‘नायट्रोजन स्थिरीकरण’ घडवून आणू शकतात. असमकोष्ठ तयार करणाऱ्या जीवाणूंच्या जाती खास असून त्या नायट्रोजनचे रूपांतर अमोनिया, नायट्राइटस् किंवा नायट्रेट यांमध्ये करतात, ज्यांचे शोषण वनस्पतींद्वारे होऊन त्यांच्यापासून प्रथिने व न्यूक्लिइक आम्ले तयार होतात. काही नायट्रोजन स्थिरीकारक नील-हरित जातींचे मुक्त जीवाणू भाताच्या खाचरातील पाण्यात असतात. काही जीवाणू शैवाक, इतर वनस्पती, विविध प्रोटिस्ट आणि स्पंज यांच्यासमवेत सहजीवी म्हणून वाढतात व त्यांना ऊर्जा पुरवितात. उदा., ॲनाबीना प्रजातीच्या नील-हरित जीवाणूंच्या काही जाती आणि ॲझोला पिनाटा ही नेच्याची जाती सहजीवी म्हणून वाढतात. या दोन्ही सहजीवींची भातशेतीसाठी जैवखत म्हणून पद्धतशीर एकत्र वाढ केली जाते. काही जातींचे नील-हरित जीवाणू चारा प्रजातीच्या शैवालांच्या पृष्ठभागावर अपिवनस्पती म्हणून वाढतात.

काही जातींच्या नील-हरित जीवाणूंमध्ये प्राण्यांसाठी उपयुक्त असे प्रथिनयुक्त आहारघटक असल्याने त्यांची वाढ केली जाते. उदा., आर्थोस्पायरा प्रजातीतील नील-हरित जीवाणूंची वाढ करून त्यांना वाळवतात आणि आहारपूरक गोळ्या म्हणून विकतात. याकरिता आर्थोस्पायरा प्रजातीतील आ. प्लॅटेंसिस आणि आ. मॅक्झिमा या जाती मुद्दाम वाढवतात. या दोन्ही जाती निसर्गात उष्ण तसेच उपोष्ण प्रदेशांच्या अशा जलाशयांमध्ये वाढतात, ज्यांचा सामू अल्कधर्मी असतो आणि ज्यांच्या पाण्यात कार्बोनेट, बायकार्बोनेट यांची संहती अधिक असते. आ. प्लॅटेंसिस ही जाती आफ्रिका तसेच आशियामध्ये, तर आ. मॅक्झिमा ही जाती कॅलिफोर्निया आणि मेक्सिकोमध्ये आढळते. अमेरिका, थायलंड, भारत, तैवान, चीन, पाकिस्तान, म्यानमार, ग्रीस आणि चिली या देशांत त्यांचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते.

आर्थोस्पायरा प्रजातीत सु. ३० जाती आहेत. हे जीवाणू आकाराने दंडगोलाकार असून वाकडे, चंद्रकोरीसारखे किंवा सर्पिलाकार असतात. त्यांच्या लांबीत विविधता असून ते कमीअधिक सर्पिलाकार असतात; काही स्प्रिंगप्रमाणे वेटोळेकार, तर काही सरळ असतात. त्यांचे प्रजनन द्विविभाजन पद्धतीने होते. त्यांच्या पेशींची लांबी २–१२ मायक्रोमीटर असते.

आ. प्लॅटेंसिस आणि आ. मॅक्झिमा यांच्यापासून तयार केलेली आहारपूरके ‘स्पिरुलिना’ या नावाने विकली जातात आणि त्याच नावाने प्रसिद्ध आहेत. याचे कारण १९६२ पर्यंत या दोन्ही जातींचा समावेश स्पिरुलिना प्रजातीत केला जात असे. मात्र स्पिरुलिना ही नील-हरित जीवाणूंची एक वेगळी परंतु आर्थोस्पायरापासून भिन्न प्रजाती आहे आणि या प्रजातीत सु. ६३ जाती आहेत.

स्पिरुलिना या आहारपूरकामध्ये कर्बोदके २४ ग्रॅ., मेद ८ ग्रॅ., प्रथिने ३६ ग्रॅ., शर्करा ३.१ ग्रॅ., पोटॅशियम १३६३ मिग्रॅ., सोडियम १०४७ मिग्रॅ. असतात, तसेच आणि जीवनसत्त्वे, कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह इ. खनिजे असतात. त्याचा वापर जलसंवर्धन, जलजीवालय आणि कुक्कुटपालन उद्योगांमध्ये पूरक खाद्य म्हणून केला जातो. तोंडाच्या कर्करोगाविरुद्ध ती प्रभावी समजली जातात. तसेच जे रुग्ण अन्न चावू शकत नाहीत किंवा गिळू शकत नाहीत त्यांच्यासाठी किंवा शरीरात औषध प्रवाहीत करण्यासाठी हे वापरता येऊ शकते.

स्पिरुलिना प्रजातीतील नील-हरित जीवाणूंच्या काही जाती मायक्रोसिस्टिन गटातील जीवविषांनी (चेता, पेशी, शरीराच्या आतली इंद्रिये, यकृत इत्यादींची हानी करणारी विषे) दूषित झालेली असतात. परिणामी स्पिरुलिना आहारपूरकेही या जीवविषांनी दूषित होतात. मायक्रोसिस्टिनदूषित आहारपूरके दीर्घकाळ घेत राहिल्यास कर्करोग होऊ शकतो. काही वेळा तळ्यात किंवा पाण्यात वाढताना स्पिरुलिना आहारपूरकांमध्ये शिसे, पारा, अर्सेनिक इ. जड धातूंचे अंश आढळले आहेत. तेव्हा या आहारपूरकांचे सेवन काळजीपूर्वक करावे, असा सल्ला वैज्ञानिक देतात. संशोधनात असे दिसून आले आहे की, मायक्रोसिस्टिन विषे आणि जड धातू या दोन्ही प्रकारांची दूषके निर्माण होण्यामागे नील-हरित जीवाणूंबरोबर वाढणारी नील-हरित शैवाले कारणीभूत असतात.