जीवरासायनिक प्रक्रियेत एखादा पदार्थ प्रत्यक्ष सहभाग न घेता परिसराच्या तापमानात व दाबात सहजी बदल घडवून आणतो; तेव्हा त्याला जैविक प्रेरक (Biological catalysts) म्हणजे विकर म्हणतात. दोन अथवा अधिक पदार्थांमध्ये होणारी रासायनिक प्रक्रिया एकतर उत्स्फूर्त अथवा अनुत्स्फूर्त असते. ज्या पदार्थांमध्ये अभिक्रिया होणार ते प्रक्रियेत बनणाऱ्या अंतिम उत्पाद पदार्थाहून अधिक ऊर्जासंपन्न असतात, तेव्हा त्यांच्यातील प्रक्रिया उत्स्फूर्त असते व ती ऊष्मोत्सर्गी (Exothermic) अथवा ऊर्जोत्सर्गी (Exergonic) असते. जेव्हा रासायनिक प्रक्रियेत  बनणारे पदार्थ, प्रक्रियेत भाग घेणाऱ्या पदार्थांच्या तुलनेत अधिक ऊर्जासंपन्न असतील, तेव्हा मात्र ती रासायनिक प्रक्रिया अनुत्स्फूर्त असते व ती घडून येण्यासाठी उच्च दाब, उच्च तापमान अथवा दोन्ही आवश्यक असतात. रासायनिक अथवा जैविक प्रेरकांच्या (विकरांच्या) उपस्थितीत मात्र हीच प्रक्रिया कमी दाब व कमी तापमानातही घडून येते. म्हणजेच ती ऊष्माग्राही (Endothermic) अथवा ऊर्जाग्राही (Endergonic) असते.

विकरांचे गुणधर्म : १) विकरे सामान्यत: उच्च रेणुभार असणारी प्रथिने असून त्यांचे अत्याधिक उष्णता, अत्याधिक कायिक क्षोभ, अल्कोहॉल, तीव्र आम्ल, तीव्र अल्कली व जड धातूंचे क्षार अशा गोष्टींशी संपर्क आल्यामुळे गुणनाशन (Denaturation)  होते, २) विकरे पाण्यात विद्राव्य असतात, त्यामुळे त्यांच्या उत्प्रेरण कार्यासाठी  माध्यम उपलब्ध  होते, ३) विकरे स्वत:च्या कार्यद्रव्याकरिता अत्यंत ठाम (Specific) असतात.

 विकरांची कार्यवैशिष्ट्ये : १) विकरे पेशीतील लक्षावधी जीवरासायनिक प्रक्रिया सभोवतालच्या परिस्थित घडवून आणतात, २) या कार्यासाठी विकरे अत्यंत कमी मात्रेत लागतात, ३) विकरांच्या उलाढालींचा वेग (Turnover speed) व उलाढाल संख्या (Turnover number) लक्षणीय रीत्या अधिक असतात, ४) विकरांच्या सर्वोत्कृष्ट कार्यासाठी अनुकूल (Optimum) अल्काम्लता (pH), तापमान, विकर संहती (Concentration of enzymes) व कार्यद्रव्याची संहती (Concentration of substrate) आवश्यक असते.

विकरांचे सामान्य वर्गीकरण व नामकरण :

क्र. वर्गाचे नाव रासायनिक प्रक्रियेचा प्रकार उदाहरणे
क्षपण-ऑक्सीकरण कारके (oxido-reductases) इलेक्ट्रॉन, हायड्रोजन किंवा ऑक्सिजन यांचे संक्रमण एका कार्यद्रव्याकडून दुसऱ्याकडे घडवून आणणे. हायड्रोजन विस्थापिके, ऑक्सिकारके
संक्रमणकारके (transferases)

 

विशिष्ट रासायनिक मूलकाचे संक्रमण एका विकार्याकडून दुसऱ्याकडे करणे. अमाइन  संक्रमके
जलीय अपघटनकारके (hydrolases) विकार्याचे पाण्याचा रेणू वापरून अपघटन घडविणे. विविध पाचक विकरे (एस्टरेझ)
समघटककारके (isomerases) रेणूंचे रूपांतरण समघटकांत घडवून आणणे फ्युमरेझ
विघटके (lyases) पाण्याचा रेणू न वापरता रासायनिक मूलकाचे विघटन घडवून आणणे. अल्डोलेझ, डीकॉर्बोक्सिलेझ
बंधके / संश्लेषके

 

दोन रेणूंना विविध रासायनिक बंधांनी जोडणे. सायट्रिक आम्ल संश्लेषक, ग्लुकोज संश्लेषक

विकरांचे नामाभिधान : सामान्यत:  विकरांना  त्यांच्या कार्यानुसार (उदा., विघटके, संश्लेषके), कार्यद्रव्यानुसार (माल्टेझ, डी. एन. एझ) अथवा  दोहोंनुसार (उदा., ग्लुकोज  ऑक्सिडेझ) नाव  दिले जाते. कार्य / कार्यद्रव्य यांना एझ (-ase) प्रत्यय जोडला  की, ते  विकराचे  नाव  बनते. विकर आयोगानुसार (Enzyme Commission) विकराच्या नावात प्रथम त्याचे कार्य, नंतर त्याचे विशिष्ट कार्य, त्यानंतर त्याचे कार्यद्रव्य व शेवटी कार्यद्रव्याचा सूक्ष्म प्रकार (अथवा उत्पाद) याचा उल्लेख. उदा., ‘EC : 3.4.11.4’ हे ट्रायपेप्टाइड अमायनोपेप्टिडेझ असून त्याच्या नावातील EC म्हणजे एंझाइम कमिशन; 3 म्हणजे जलीय अपघटनकारक वर्ग; 4 म्हणजे पेप्टाइड बंधावर होणारे त्याचे कार्य; 11 म्हणजे प्रथिन साखळीतील टोकाच्या ॲमिनो आम्लास पाण्याचा रेणू वापरून विलगणे आणि शेवटचा 4 म्हणजे तीन ॲमिनो आम्लांच्या साखळीतील शेवटच्या ॲमिनो आम्लांचे पाण्याचा रेणू वापरून होणारे विलगन.                                                                                                                                                                                         

                                                                                                                                                                                                                            समीक्षक : डॉ.बाळ फोंडके