वैदयकीय क्षेत्रात शरीराच्या आतील अवयवांच्या प्रतिमा निर्माण करण्यासाठी वापरण्यात येणारे एक तंत्रज्ञान. रोगनिदान, उपचार आणि उपचारानंतर पाठपुरावा करण्यासाठी शरीरातील अवयवांचे नेमके प्रतिमाकरण करणे आवश्यक असते.चुंबकीय अनुस्पंद प्रतिमा (एम्. आर्. आय्.) तयार करण्यासाठी तीव्र चुंबकीय क्षेत्राचा वापर केला जातो. त्यामुळे क्ष-किरण किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरल्यास रुग्णावर प्रारणांमुळे जसा अनिष्ट परिणाम होण्याचा धोका असतो तसा धोका हे तंत्र वापरल्यामुळे होत नाही. मेंदू, पाठीचा कणा, अर्बुद इत्यादींच्या प्रतिमा तयार करण्यासाठी तसेच छाती, पोट, सांधे आणि इतर अवयवांमधील बिघाड ओळखण्यासाठी हे तंत्रज्ञान अतिशय उपयुक्त असते. सध्या या तंत्राची विभेदनक्षमता १ मिमी. एवढी आहे. म्हणजे हे तंत्र वापरून मिळालेल्या प्रतिमेत एकमेकांपासून १ मिमी.पर्यंतच्या अंतरावर असणारे भाग सुस्पष्ट दिसू शकतात. दर वर्षाला जगभरातील सु.६० लाख नागरिक रोगाचे निदान करण्यासाठी या तंत्राची मदत घेतात.
चुंबकीय अनुस्पंद प्रतिमाकरण हे तंत्रज्ञान चुंबक व चुंबकीय क्षेत्र यांतील आंतरक्रियांवर आधारित असते. उदा., स्थिर अवस्थेत असताना चुंबकसूची पृथ्वीच्या उत्तर ध्रुवाकडे निर्देश करते. या सूचीला हाताने हळूच धक्का दिल्यास तिच्यात आंदोलने निर्माण होतात.या आंदोलनाची वारंवारता (कंप्रता) चुंबकीय क्षेत्राच्या शक्तीवर अवलंबून असते. जोपर्यंत धक्क्यामुळे मिळालेली ऊर्जा घर्षणादवारे पूर्णपणे उत्सर्जित होत नाही तोपर्यंत ही आंदोलने चालूच राहतात. थोडया वेळाने चुंबकसूची पूर्वस्थितीत येते म्हणजे स्थिर होते. आंदोलनाची वारंवारता चुंबकीय क्षेत्राच्या शक्तीवर अवलंबून असल्यामुळे चुंबकीय क्षेत्रातील अवकाशीय बदलांचा उपयोग करून चुंबकसूचीच्या स्थानाची प्रतिमा मिळविणे शक्य होते.
चुंबकीय अनुस्पंद प्रतिमाकरण तंत्रात रुग्णाच्या अवयवांच्या प्रतिमा मिळविण्यासाठी रुग्णाचे शरीर शक्तिशाली चुंबकीय क्षेत्रात ठेवतात. या यंत्रात एक किंवा दोन मोठया आकाराचे शक्तिशाली चुंबक, संगणक आणि रेडिओ तरंग पारेषित करण्यासाठी व ग्रहण करण्यासाठी आवश्यक उपकरणे यांचा समावेश असतो. या उपकरणाची हाताळणी आणि चित्रण प्रारणतज्ज्ञांमार्फत केले जाते. मानवी शरीरात पाणी मोठया प्रमाणात असते. पाण्याच्या रेणूत हायड्रोजनाचे दोन अणू असतात. या अणूंची केंद्रके चुंबकसूचीप्रमाणे कार्य करतात. यंत्रातील शक्तिशाली चुंबकाचे क्षेत्र पृथ्वीच्या क्षेत्रासारखे कार्य करते. या चुंबकाच्या प्रभावाखाली अणुकेंद्रकीय सूक्ष्मचुंबकसूची संरेखित होतात, म्हणजेच एका दिशेने एकमेकांना समांतर होतात. त्यानंतर या सूक्ष्मचुंबकसूचींच्या दिशेने रेडिओ तरंग पारेषित केले जातात. या रेडिओ तरंगांची वारंवारता आणि अणुकेंद्रकीय सूक्ष्मचुंबकसूचींच्या आंदोलनांची वारंवारता एकमेकांशी जुळल्यास अनुस्पंदनाची स्थिती निर्माण होते. या स्थितीमुळे रेडिओ तरंगांची ऊर्जा हायड्रोजनाच्या अणुकेंद्रकांदवारे शोषली जाते. रेडिओ तरंगांचे पारेषण थांबविल्यानंतर अणुकेंद्रके पूर्वस्थितीला येताना शोषलेली ऊर्जा क्षीण रेडिओ तरंगीय संकेतांच्या (सिग्नल) स्वरूपात उत्सर्जित केली जाते. ही ऊर्जा संवेदनाक्षम अभिग्राहकादवारा ग्रहण केली जाते. अभिग्राहकाकडून मिळालेले रेडिओ तरंगीय संकेत संगणकाला दिले जातात. आधुनिक संगणक या संकेतांचे गणितीय विश्लेषण करून त्यांच्यापासून सुस्पष्ट प्रतिमा निर्माण करू शकतात. अतिरिक्त चुंबक आणि विकसित संगणकीय तंत्रे वापरून त्रिमितीय प्रतिमादेखील मिळविल्या जाऊ शकतात.
रेडिओ तरंगीय संकेतांचे स्वरूप ऊतींच्या गुणधर्मावर अवलंबून असते. जसे, मेदयुक्त ऊतींपासून मिळालेले संकेत अन्य ऊतींपासून मिळालेल्या संकेतांपेक्षा वेगळे असतात. शरीरातील पाण्याच्या वितरणाची मोजणी या तंत्रादवारे करता येते. याचा उपयोग मेंदूतील चेतातंतूंची जोडणी आणि कार्य यांची प्रतिमा मिळविण्यासाठी करता येतो. या प्रतिमांचा उपयोग मेंदूच्या संरचनेचा तसेच चेताऊतींमध्ये बिघाड निर्माण करणाऱ्या रोगांचा अभ्यास करण्यासाठी होतो. चुंबकीय अनुस्पंद प्रतिमाकरणादवारे मेंदूच्या कोणत्या भागात रक्ताचा प्रवाह वाढला आहे तेही शोधून काढता येते.
चुंबकीय अनुस्पंद प्रतिमाकरणासाठी ०∙५ – ३ टेस्ला (५,००० ते ३०,००० गॉस ; १ टेस्ला = १०,००० गॉस) एवढ्या क्षमतेची चुंबकीय शक्ती वापरतात. पृथ्वीच्या पृष्ठभागावर पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र सु.०∙५ गॉस असते. कोणत्याही वयातील स्त्री-पुरुष, लहान बालके आणि गरोदर स्त्रियांसाठी या तंत्राचा वापर करता येतो. ज्या रुग्णांच्या शरीरात कृत्रिम सांधे, पेसमेकर यांसारखी धातूंनी बनलेली उपकरणे बसविलेली आहेत, त्या रुग्णांसाठी हे तंत्र वापरता येत नाही. चुंबकीय अनुस्पंद प्रतिमाकरण तंत्र पॉल लॉटेरबर (अमेरिका) आणि पीटर मान्सफिल्ड (इंग्लंड) या वैज्ञानिकांनी शोधून काढले. २००३ सालचे वैदयकीय क्षेत्रातील नोबेल पारितोषिक त्यांना देण्यात आले आहे.