अंजन हा शिंबावंत वृक्ष लेग्युमिनोसी कुलातील असून याचे शास्त्रीय नाव हार्डविकिया बायनॅटा आहे. या वृक्षाच्या फुलांची रचना बरीचशी लेग्युमिनोटी कुलामधील सीसॅल्पिनिऑइडी उपकुलातील वनस्पतींप्रमाणे आहे. भारत, मलेशिया, थायलंड, पाकिस्तान, बांगला देश, अफगाणिस्तान इत्यादी देशांत हा आढळतो.

भारतात उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, कर्नाटक व महाराष्ट्र या राज्यांतील वनांत हा वृक्ष आढळतो.अंजन हा पानझडी वृक्ष असून सुमारे २५ – ३५ मी. उंचीपर्यंत वाढतो. त्याच्या खोडावर साधारणपणे १२ – १५ मी. उंचीपासून पुढे अनेक आडव्या फांद्या फुटतात. पाने लांब देठाची, एकाआड एक असतात. ती संयुक्त प्रकारची असून २-६ सेंमी. लांब आणि २-३ सेंमी. रुंद असतात. पानांच्या बगलेत किंवा फांद्यांच्या टोकास ऑक्टोबर ते जानेवारीत लहान, हिरवट-पिवळ्या रंगाच्या असंख्य फुलांचा फुलोरा येतो. या वृक्षाच्या शेंगा ६ – ९ सेंमी. लांब, चपट्या, पातळ, लवचिक असतात. शेंगा दोन्हीकडे टोकदार असून त्यामध्ये फक्त एकच बी असते. ती टोकाकडून बाहेर पडते.

अंजन या वृक्षाचा पाला गुरे खातात. तसेच या पाल्याचे खतही होते. अंजनाचे लाकूड टिकाऊ, जड, टणक असल्यामुळे घरबांधणी, शेतीची अवजारे, पुलांचे बांधकाम आणि कातीव व कोरीव कामास वापरले जाते. अंजनाचा डिंक, मुळांचा चीक आणि पानांचा रस यांचा उपयोग प्रमेहावर (गुप्तरोगावर) औषध म्हणून केला जातो. तसेच शोभिवंत वृक्ष म्हणूनही या वृक्षाची लागवड केली जाते.

प्रतिक्रिया व्यक्त करा