वैद्यकीय क्षेत्रामध्ये अँटिबॉडीज म्हणजेच प्रतिपिंडे यांचा सहभाग रोगनिदान व उपचार या दोन्हींमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण आहे. प्रचलित पद्धतीने प्रतिपिंडाचे उत्पादन हायब्रीडोमा तंत्रज्ञानाने सस्तन प्राण्यांच्या प्रयोगशाळेमध्ये बनविण्यासाठी प्रयोग करण्यात येत आहेत. वनस्पतींमध्ये प्रतिपिंडे बनविणे सुरक्षित व आर्थिक दृष्ट्या परवडणारे आहे. त्याचबरोबर वनस्पतींमध्ये प्रथिनांवर होणारी प्रक्रिया ही प्राण्यांप्रमाणेच असते, तसेच तयार होणाऱ्या प्रतिपिंडोंचे रासायनिक गुणधर्म – उदा., त्यांना संलग्न असणारी कर्बोदके – हे प्रण्यांमध्ये तयार होणाऱ्या मूळ प्रतिपिंडांसारखेच असतात. वनस्पतींमध्ये प्रतिपिंड बनविण्यासाठी शास्त्रज्ञांना जनुकीय अभियांत्रिकीचा आधार घ्यावा लागतो. यामध्ये सस्तन प्राण्यांच्या पेशींमधील प्रतिपिंड बनविणारी जनुके वनस्पतींच्या पेशींमध्ये घातली जातात आणि अशा पेशींचे ऊतीसंवर्धनाद्वारे पूर्ण वनस्पतीमध्ये रूपांतर केले जाते. त्यानंतर अशा वनस्पतींच्या पानांचा अर्क काढला जातो व त्यामधून प्रतिपिंडाचे शुद्धीकरण केले जाते. तंबाखूच्या पोटजातीय वनस्पतींमध्ये काही विशिष्ट विषाणूंद्वारे परकीय जनुके घालणे सोपे असल्यामुळे प्रतिपिंड तयार करण्यासाठी सर्वात जास्त संशोधन या वनस्पतीमध्ये झाले आहे.
वनस्पतींमध्ये प्राणिजन्य प्रतिपिंडे बनविण्याचा पहिला प्रयोग १९८९ मध्ये करण्यात आला. या प्रयोगामध्ये उंदरामधील एक प्रतिपिंड तंबाखूच्या वनस्पतीमध्ये बनविण्यात आले व त्याची दंतक्षयासाठी कारणीभूत असलेल्या एका जीवाणूविरुद्ध असणारी कार्यक्षमता उंदरामधील मूळ प्रतिपिंडाएवढीच असल्याचे आढळून आले. गेल्या काही वर्षामध्ये अनेकविध आजारांवर उपयोगी ठरतील अशी प्रतिपिंडे वनस्पतींमध्ये बनविता येऊ शकतील यासाठी अनेक प्रयोग करण्यात येत आहेत. यामध्ये रक्ताचा कर्करोग, सांसर्गिक काळपुळी (अँथ्रॅक्स), इबोला, फुप्फुसांचा एक विषाणुजन्य आजार, एचआयव्ही, एका विषाणुजन्य आजारामुळे मेंदूला आलेली सूज, अन्नातून होणारी विषबाधा आदी आजारांचा समावेश आहे. त्याचबरोबर यकृतशोथ – ब (हिपॅटायटिस बी), एरंडाच्या बियांमधून होणारी विषबाधा व रक्ताचा कर्करोग या आजारांवरील प्रतिपिंड – स्वरूपातील लशी वनस्पतींमध्ये बनविण्यासाठी संशोधन चालू आहे. यातील बरेच संशोधन हे प्रायोगिक तत्त्वावर होत आहे. वनस्पतींमध्ये बनविलेली प्रतिपिंडे प्रत्यक्ष औषधांच्या दुकानांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होण्याकरिता आणखी काही वर्ष लागू शकतील.
समीक्षक – बाळ फोंडके