चौलमुग्रा हा वृक्ष अकॅरिएसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव हिद्नोकार्पस वायटीयाना आहे. हा उंच व सदापर्णी वृक्ष भारत, बांगला देश आणि म्यानमार या देशांत आढळतो. भारतात हा आसाम, त्रिपुरा येथील सदापर्णी वनांत आढळतो.
चौलमुग्रा वृक्षाची उंची १२ ते १५ मी. असते. याचे कोवळे भाग केसाळ असून साल तपकिरी किंवा काळी असते. सालीवर पांढरे ठिपके असून आतील बाजू पिवळट असते. पाने साधी, एकाआड एक, १६—२० सेंमी. लांब, जाड व चिवट असतात. फुले लहान, व्दिलिंगी, पिवळसर व पानांच्या बगलेत वल्लरीवर येतात; क्वचित एकलिंगी व भिन्न झाडांवर येतात.मृदुफळे पिगट,गोलसर व टोकदार असून त्यांची साल जाड, कठीण व मखमली असते.फळात अनेक लांब, तपकिरी व सपुष्प बिया असतात.बिया फार काळ टिकत नाहीत.
भारतीय तसेच चिनी पारंपरिक औषधांमध्ये चौलमुग्रा बियांपासून मिळणारे तेल कुष्ठरोगावर वापरले जाते. चौलमुग्रा बियांपासून पिवळट तेल मिळते. या पिवळट तेलाला चौलमुग्रा तेल म्हणतात. ते चवीने तिखट असून त्याला शिळ्या लोण्यासारखा वास येतो. तेल औषधी असून चर्मरोगावर बाहेरून लावतात. बियांची पेंड खताला उपयुक्त आहे. मात्र त्यातील विशिष्ट ग्लायकोसाइडामुळे गुरांना खाद्य म्हणून चालत नाही. मगज मत्स्यविष म्हणून वापरतात. परंतु या पद्धतीचा वापर करून पकडलेले मासे खात नाहीत. वेलीच्या सालीमध्ये अधिक प्रमाणात टॅनीन असते.