(सायप्रस). सामान्यपणे सुरू या नावाने ओळखल्या जाणाऱ्या व लागवडीखाली असलेल्या वृक्षांचा समावेश पाइनॅलिस गणाच्या क्युप्रेसेसी कुलात केला जातो. पूर्वी हा गण कॉनिफेरेलीझ नावाने ओळखला जात असे. या गणातील वनस्पतींचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे प्रजनन इंद्रिय शंकूच्या आकाराचे असते. क्युप्रेससखेरीज जूनिपेरस, टेट्रॅक्लिनिस, थुजा, कॅमीसायपेरिस, सिकोइया अशा सु. २७–२९ प्रजाती आणि १३०–१४० जातींचा समावेश क्युप्रेसेसी कुलात होतो.

सुरू (क्युप्रेसस प्रजातीतील) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सर्व वनस्पतींचे मूळ विखुरलेले असून उत्तर गोलार्धातील उष्ण प्रदेश, जसे अमेरिका, आफ्रिका, हिमालयाचा भाग, चीन, व्हिएटनाम येथील आहे. जगातील अनेक बागांमध्ये त्यांची लागवड मोठ्या प्रमाणात झाल्याने त्या विविध स्वरूपांत व आकारांत पाहायला मिळतात. क्युप्रेसस प्रजातीतील वनस्पती सदाहरित वृक्ष किंवा झुडपे असून त्या ५–४० मी. उंच वाढतात. पाने २–६ मिमी. लांब, खवल्यांसारखी, समोरासमोर व खोडावर सपाट चिकटल्यासारखी असतात. कोवळ्या वृक्षांवर पाने सुईसारखी, ५–१५ मिमी. लांब असतात. शंकू ८–४० मिमी. लांब, गोलसर किंवा लांबट गोल असून त्यांवर खवले असतात; ५–१४ महिन्यांत ती परागणाने पक्व होतात. बिया लहान, ४–७ मिमी. लांब असून त्यांना दोन्ही कडांवर पंख असतात.

हिमालयन सायप्रेस (क्युप्रेसेस टोरुलोजा) : (१) वृक्ष, (२) शंकू.

सुरू वृक्षकुलामध्ये विशेषकरून ज्ञात असलेला वृक्ष म्हणजे क्युप्रेसस सेंपरव्हिरन्स (भूमध्य सागरी सुरू) हा आहे. हा वृक्ष भूमध्य सागरालगतच्या सायप्रस, लिबिया, अल्बानिया, क्रोएशिया, टर्की, ईजिप्त, सिरिया, लेबानन, इटली, इझ्राएल इ. देशांत आढळतो. या वृक्षाला ‘इटालियन सायप्रस’, ‘पर्शियन सायप्रस’ असेही म्हणतात. दक्षिण यूरोपातील अनेक देशांत याची लागवड केलेली दिसते. या वृक्षांच्या फांद्या उभट असून उभ्या दिशेने वाढतात. भूमध्य सागरी प्रदेशात या वृक्षाच्या फांद्या आडव्या वाढलेल्या असल्यास त्याला पिरॅमिडसारखा आकार येतो व अशा प्रकाराला क्यु. सें. हॉरिझाँटेलिस म्हणतात. भारतात क्युप्रेसेस प्रजातीच्या ३-४ जाती आढळतात; त्यांपैकी एकाला हिमालयन सायप्रस (क्यु. टोऱ्यूलोजा) किंवा ‘देवदार’ म्हणतात. भारताच्या वायव्य भागात त्याचा ‘स्ट्रिक्टा’ हा प्रकार लागवडीखाली आहे.

राजदार, अश्विनी

भूमध्य सागरी सुरू वृक्ष सु. ३५ मी. उंच वाढतो. पर्णसंभार दाट व गर्द हिरवा असतो. पाने २–५ मिमी. लांब आणि गोलाकार कोंबावर येतात. नर-शंकू ४–८ मिमी. व मादी-शंकू २५–४० मिमी. लांब, लंबगोल, कोवळेपणी हिरवे असून २०–२४ महिन्यांनी पिकल्यावर पिवळसर राखाडी होतात; खवले ८–१४ व प्रत्येकावर टोकदार उंचवटा आणि ८–२० बिया असतात. हे वृक्ष शेकडो वर्षे जगतात. पाने व लाकूड यांच्यात बाष्पनशील सुगंधी तेल असते. ते सुगंधी पदार्थांमध्ये तसेच साबणांत मिसळतात. जपानमध्ये कॅमीसायपेरिस प्रजातीतील कॅ. ऑब्ट्युजा ही जाती लागवडीखाली आहे. हा वृक्ष ‘हिनोकी’ या नावाने प्रसिद्ध असून या वृक्षाचे लाकूड सुगंधी असून ते सर्व प्रकारच्या हवामानात टिकते.

सुरू वृक्ष शोभिवंत असल्याने जगातील अनेक पर्शियन पद्धतीच्या उद्यानांत त्याची लागवड करतात. आपल्या देशांत काश्मीरमधील शालीमार आणि निशात या बागा, आग्रा येथील ताजमहालाभोवतीची बाग ही पर्शियन पद्धतीची उद्याने आहेत. अशा उद्यानांना ‘मोगल उद्याने’ असेही म्हणतात. भारताच्या राष्ट्रपती भवनात अशाच प्रकारचे मोगल उद्यान आहे.