जरदाळूचा वृक्ष सु.१० मी. उंचीपर्यंत वाढतो. खोडाचा व्यास सु. ४० सेंमी. असून साल लालसर असते. पर्णसंभार भरपूर असतो. पाने साधी, अंडाकृती, ५-९ सेंमी. लांब, ४-८ सेंमी. रुंद असतात. पानाचे टोक अणकुचीदार असून कडा दंतुर असतात. फुले लालसर असून २-४, एकेकटी आणि बिनदेठाची असून ५-८ पाकळ्या असतात. फळे आठळीयुक्त व आकाराने मोठ्या आवळ्याएवढी असून सुरुवातीला पिवळी असतात व पिकल्यानंतर शेंदरी होतात. फळांत लालसर व गोड मगज असून तो खाद्य आहे. फळावर एका बाजूने जाड कंगोरा असतो. फळाप्रमाणे बियांवरदेखील कंगोरे असतात.
जरदाळूच्या फळांना भरपूर मागणी असते. ते सुकवूनही खातात. वेगवेगळ्या मिठाया, आइसक्रीम आणि खाद्यपदार्थांत गर व बियांचा वापर करतात. बियांमधील तेल सौंदर्यप्रसाधने व औषधांत वापरतात. तेल काढून उरलेली पेंड इंधन व खत म्हणून वापरतात. जगात क्रमवार तुर्कस्तान, इराण आणि उझबेकिस्तान या देशांत जरदाळूचे सर्वाधिक उत्पादन होते.