कोंडा हा डोक्याच्या त्वचेचा एक विकार आहे. कोंडा पिवळा किंवा पांढरा आणि तेलकट असतो. सामान्यपणे डोक्यावरील त्वचेच्या मृत पेशी गळून पडत असतात. काही वेळा या मृत पेशींचा जाड थर तयार होऊन रवाळ बारीक खपल्या पडतात. यालाच सामान्यपणे कोंडा म्हणतात. कधीकधी प्रमाणाबाहेर मृत पेशी बाहेर टाकल्यामुळे अधिक प्रमाणात कोंडा निर्माण होतो. मॅलॅसेझिया ग्लोबोसा या बुरशीमुळे हे प्रमाण वाढते, असे आढळून आले आहे.

चेहर्‍यावरील पुटकुळ्यांप्रमाणे त्वचेवर मेणचट थराची अवास्तव निर्मिती हे कोंडा होण्याचे महत्त्वाचे कारण आहे. पुरुषांमध्ये आढळणारी संप्रेरके व कोंडा यांचा संबंध आहे. ही संप्रेरके जितकी जास्त प्रमाणात निर्माण होतात तेवढा हा मेणचट थर जास्त निर्माण होतो. कोंडा संसर्गजन्य नसला तरी त्वचेवर वाढणारी बुरशी संसर्गजन्य असल्यामुळे हा संसर्ग एका व्यक्तीपासून दुसर्‍या व्यक्तीला होऊ शकतो. बुरशीमुळे डोक्यात खाज येते. खाजविताना त्वचेला नखे लागून इजा होते. डोक्यातील कोंडा भुवयांवर पडला की, तेथेही त्याची लागण होते व नंतर तो पापणीच्या केसांवर पसरतो. कानातही काही वेळा कोंड्याचा प्रादुर्भाव होऊन कानाच्या बाह्यभागात खाज सुटते.

कोंड्याचा व खाण्याचा संबंध नाही, तसेच कोंड्यामुळे टक्कल पडत नाही. डोक्याला तेल जास्त लावले की कोंडा जास्त होतो. केस नियमित धुतल्याने सौम्य प्रमाणातील कोंडा आटोक्यात राहतो. पार्किन्सन व एड्स झालेल्या रुग्णांना कोंडा जास्त प्रमाणात होतो, असे हल्ली आढळून आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा