मिरिस्टिकेसी कुलातील वनस्पतींना सामान्यपणे जायफळ म्हणतात. मिरिस्टिका प्रजातीत सु. ८० जाती असून त्यांपैकी मिरिस्टिका फ्रॅग्रन्स जाती महत्त्वाची आहे. जे सामान्यपणे जायफळ म्हणून वापरले जाते ते या वृक्षाचे बी आहे. हा वृक्ष मूळचा इंडोनेशियाच्या मोल्यूका बेटावरचा असून त्याची लागवड मलेशिया, ग्रेनेडा (वेस्ट इंडिज), जावा, सुमात्रा, श्रीलंका तसेच पॅसिफिक व हिंदी महासागरांतील बेटांवर केली जाते. भारतात केरळ, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, गोवा, कारवार, कोकण इत्यादी भागांत जायफळाची लागवड होते.
जायफळ (मिरिस्टिका फ्रॅग्रन्स): फुलोऱ्यासह फांदी

जायफळ हा सदापर्णी वृक्ष १०-१२ मी. उंच वाढतो. पाने साधी, एकाआड एक, काळसर हिरवी, रुंद, भाल्याच्या आकाराची व गुळगुळीत असून ७-१४ सेंमी. लांब, ४ सेंमी. रुंद असतात. फुले पानांच्या बगलेत येतात. ती लहान, फिकट पिवळट व घंटेच्या आकाराची असून सुगंधी असतात. नर-फुले व मादी-फुले वेगवेगळ्या झाडांवर येतात. काही नर वृक्षावर अनेक वर्षांनंतर मादीफुले येतात. जायफळाचे झाड सहा-सात वर्षांचे होईपर्यंत ते नर का मादी आहे, ते कळत नाही. मृदुफळे प्रथम पिवळी, ५ सेंमी. व्यासाची, लंबगोलाकार, मांसल व सुवासिक असून ती नंतर तांबूस होतात. ती एकेकटी किंवा ४-५ च्या झुबक्यांत वर्षभर येतात. फळात एकच बी असते. बी लंबगोल असून बाह्यकवच गर्द पिंगट व शेंदरी जाळीदार आवरणाने आच्छादलेले असते; या आवरणाला जायपत्री म्हणतात. बाजारात आलेल्या ‘जायफळ’ बियांवरील कवच काढून पाठविलेल्या असतात.

मृदूफळातील बी

जायफळाला उग्र वास व तिखट चव असते. ते उत्तेजक, स्तंभक व वायुनाशी असून निद्रानाश, अतिसार, उलटी, उचकी, पोटफुगी, बद्धकोष्ठता व खोकला यांवर गुणकारी आहे. जायफळातून मिळणारे तेल रंगहीन किंवा फिकट पिवळे असते. त्यात कॅफिन हा घटक अधिक प्रमाणात असतो. या तेलाचा वापर सुगंधी प्रसाधने, दंतमंजन, औषधे, अन्नपदार्थ, तेल व साबण यांसाठी करतात. तेलात मिरिस्टिसीन हा विषारी घटक असतो. त्याच्या सेवनाने यकृतावर परिणाम होतो. पाने, फुले व साल उपयोगी असून त्यांच्यापासून बाष्पनशील तेल काढले जाते. जायपत्री तिखट, कडवट, रुचकर व उष्ण असून मसाल्यात व औषधात तिचा वापर करतात.

प्रतिक्रिया व्यक्त करा