(ग्रीन बेल्ट). एखादे शहर, नगर व महानगर विकसित करीत असताना त्याभोवती राखून ठेवलेल्या अविकसित वनजमिनीला किंवा शेतजमिनीला हरित पट्टा म्हणतात. ही जागा शेती, बाग आणि वनीकरण यांकरिता वापरली जाते. तसेच ती मनोरंजनासाठीही वापरता येते. अशा जमिनीवर घरे, कारखाने इत्यादी बांधण्यास कायद्याने प्रतिबंध असतो.

हरित पट्टा ही मूळची पाश्चात्य राष्ट्रांत विकसित झालेली संकल्पना आहे. या संकल्पनेनुसार शहराभोवती लहानलहान वनांचे पट्टे निर्माण करून त्यात शेतीचे उपक्रम, बागांचे उपक्रम किंवा फुलपाखरू उद्यान यांसारखे उपक्रम राबवता येतात. त्यामुळे नैसर्गिक तसेच अर्धनैसर्गिक पर्यावरणाचे संरक्षण होते, शहरातील खालावलेल्या हवेचा दर्जा सुधारतो तसेच शैक्षणिक व करमणुकीचे कार्यक्रम राबवण्याच्या संधी उपलब्ध होतात. अशा उपक्रमांमधून ग्रामीण जनसमूहांची वैशिष्ट्ये शहरी संस्कृतीत मिसळू न देता तिचे जतन करून ती जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला जातो.

रस्त्याच्या कडेला असलेला हरित पट्टा

हरित पट्टा निर्माण करण्यासाठी शासनाने काही नियम व अटी घालून दिलेल्या आहेत. हरित पट्ट्याची लांबी किमान ५०० मी. ते एक किमी. असावी लागते. या परिसरात प्रदूषण शोषक, प्रदूषण रोधक व प्रदूषण निवारक अशा वनस्पतींची लागवड करतात. लागवड करण्यात आलेल्या वनस्पती उंच, मध्यम व लहान अशा वैविध्यपूर्ण असाव्या लागतात.

हरित पट्ट्यांत वनस्पतींची लागवड करताना स्थानिक प्रजातींना प्राधान्य द्यावे लागते. स्थानिक हवामान, पाऊस, जमिनीचा प्रकार व पोत यांनुसार वनस्पतींची निवड करावी लागते. शक्यतो माती धरून ठेवणाऱ्या, तसेच भूजल पातळीत वाढ करणाऱ्या प्रजातींची लागवड मुद्दाम केली जाते. जलद व दाट वाढणारी तसेच पाने मोठी, खडबडीत, केसाळ, तेलकट व जाड असणाऱ्या वनस्पती लावतात. या वनस्पती रस्त्यांच्या, कालव्यांच्या, नद्यांच्या तसेच रेल्वे मार्गांच्या कडेने लावतात. या वनस्पतींसाठी व त्यांच्या वाढीसाठी वापरले जाणारे पाणी हे पुनर्वापर केलेल असावे.

हरित पट्ट्यात लागवड करण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाने पुढील वनस्पती सुचवल्या आहेत : तामण किंवा जारूळ (राज्यफूल), पळस, पांगारा, जांभूळ, सातवीण, कदंब, आंबा, बहावा, करंज, अर्जुन, महोगनी, कडुनिंब, वड, पिंपळ, फणस, शिवण, सुबाभूळ, पुत्रजीवी, डिकेमाली, टेटू, असाणा, अनंतमूळ, आपटा, गजगा, दात्रंग, चित्रक, बेहडा, आवळा, गेळा, रामेटा, माकडलिंबू, वावडिंग, लोखंडी, मुरूडशेंग, भेर्लीमाड, गोलदार, अंजन, काळाकुडा, तोरण, कांगणी, धावडा, दिंडा, कळक, कडूकवठ, कुचला, उंबर, हिरडा, शिकेकाई, गारंबी इत्यादी. दुष्काळात खाद्य म्हणून वापरल्या जाणाऱ्या शेंडवेल, भारंगी, अळू, इत्यादी; वाळू धरून ठेवणाऱ्या समुद्रवेल, स्पिनिफेक्स इत्यादी आणि जिथे शक्य असेल, तिथे खारफुटीतील ॲव्हिसिनीया व सोनेरेशिया वनस्पती लावल्या जातात.

एक कल्पना अशीही आहे की, हरित पट्ट्यांचा विकास शक्यतो उद्योगक्षेत्रांकडून करून घ्यावा. जेथे उद्योग पुढाकार घेत नाहीत, तेथे सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन उद्योगांच्या आर्थिक मदतीने हरित पट्टे विकसित करावेत. तसेच जेथे नगरपालिका व महानगरपालिका यांना विकास साधणे शक्य आहे, तिथे त्यांनी हरित पट्टे निर्माण करावेत.

सर्वांत महत्त्वाचे म्हणजे हरित पट्ट्यामुळे हवा शुद्ध होऊन प्रदूषण रोखण्यास मदत होते. शहरांभोवती हरित पट्टे निर्माण केल्याने प्राणी, पक्षी, फुलपाखरे यांसाठी नव्याने अधिवास निर्माण होतो. हरित पट्ट्यांमुळे नवी उद्याने निर्माण होऊन शहरांच्या सौंदर्यात भर पडते. त्याचप्रमाणे शहरी लोकांना मोकळेपणाने पायी चालण्यासाठी, मनोरंजनासाठी, लहान मुलांना सहलीसाठी, छोट्यांना खेळण्यासाठी, विद्यार्थ्यांना पर्यावरणातील जैवविविधतेचा अभ्यास करण्यासाठी आणि निसर्गप्रेमींसाठी एक नवीन संधी निर्माण होते. तसेच मानवाला निसर्गाशी जोडण्याचे काम हरित पट्टे करतात.

वाढते शहरीकरण आणि औद्योगिकीकरण यांमुळे हवेतील प्रदूषणाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. येणाऱ्या काळासाठी ही बाब अतिशय गंभीर आहे. याचा विपरित परिणाम पर्यावरणाच्या संतुलनावर होत आहे. तसेच यामुळे मानवी आरोग्य धोक्यात येऊन मानसिक स्वास्थ्य व सामाजिक स्वास्थ्य खालावत आहे. यावर उपाययोजना म्हणून अधिकाधिक हरित पट्ट्यांची निर्मिती करणे आवश्यक आहे. शहरातील लोकांना घरबांधणीसाठी उपलब्ध जागा कमी होते, म्हणून अनेक शहरांतून हरित पट्ट्यांना विरोध केला जातो. त्यामुळे हरित पट्ट्याचे महत्त्व लोकांना पटवून देऊन हरित पट्टानिर्मितीमध्ये लोकांनाही सामावून घेता येईल.