वैशाख महिन्यात येणारी झाडीपट्टीतील अक्षय तृतिया. तिला तीज म्हटले जाते. पितृपूजेचा दिवस म्हणून हा सण अतिशय महत्त्वाचा मानला जातो. वर्षभरात दिवाळीसोबत या तिजेला घरच्या भिंती पोतण्याची पद्धती येथील प्रत्येक कुटुंबात आहे. शक्य असल्यास घराची जमीन लिंपून टाकतात. घरी लग्न होणार असेल तर हे लिंपणे अनिवार्य समजले जाते. या सणाला पूर्वजांची अथवा पितरांची तृष्णातृप्ती करावयाची असते. या करिता कुंभार खास मातीचे लाल मडके तयार करून देतो, त्याला झाडीबोलीत करसा म्हणतात. तसेच पाणी पिण्यासाठी तांब्याच्या आकाराचे छोटे तोटी असलेले मातीचे भांडे देखील सोबत असते, त्याला करुली म्हणतात.घरचा मुख्य माणूस स्वतः विहीरीवर करसा नेतो आणि बादलीने पाणी काढून करसा भरतो आणि आपल्या दोन हातांवर उचलून तो करसा घरी आणतो. तणसीला पीळ देऊन एक ‘येट’ म्हणजे बैठक तयार करण्यात येते.मातीची सात ढेकळे घेऊन त्यांना पाच वेढे सूत गुंडाळतात आणि ही ढेकळे येटीच्यामध्ये ठेवून येटीवर तो पाण्याने भरलेला करसा ठेवतात. त्यानंतर तीन किंवा पाच आंब्यांचा घड करस्यातील पाण्यात अशा प्रकारे बुडवून ठेवतात की त्याची ढेटी म्हणजे देठ बाहेर राहील. करस्यावर पारा म्हणजे सराऊ किंवा झाकण झाकतात आणि त्यावर करुली ठेवतात. करसा हा मृत वडिलांसाठी आणि करुली ही मृत आईकरिता असते असे समजतात. करस्याच्या तोंडाभोवती सुताचे पाच फेरे गुंडाळतात. करस्याची पूजा करून घरातील सर्व सदस्य त्याच्या पाया पडतात. तिजेच्या दिवसाच्या मुख्य पक्वान्नांमध्ये आंब्याचा पना म्हणजे पण्हे आणि शेवया असतात. तिजेच्या दिवसापूर्वी आंबा व त्याचे पण्हे खाणे वर्ज्य मानले जाते. तिजेपासून त्यांचे सेवन प्रारंभ होते. उन्हाळयात थंड पाणी पिण्याची सुरुवात याच दिवशी होते. तसेच पळसाच्या पानांनी तयार केलेल्या इस्तारीवर म्हणजे पत्रावळीवर या दिवशी जेवतात. पळसाच्या पानांचा उपयोग याच सणापासून सुरू होतो.
या सणाच्या दिवशी शेतकरी आपल्या पेरणीचा मुहूर्त करून ठेवतो. हातात खताची टोपली, पाण्याची झारी, पेरण्याकरिता धान्य आणि कुदळ घेऊन तो आपल्या शेतात जातो. तेथे कुदळीने थोडीशी जागा खणून काढून तेथे खत पसरतो, धान्याचे दाने फेकून मिसळतो आणि झारीतील पाणी शिंपडतो. या विधीला ‘‘मूठ टाकणे’’ असे म्हणतात. त्यानंतर पावसाळयात केव्हाही संधी साधून पेरणी करायला तो शेतकरी मोकळा असतो. करस्याखाली ठेवलेली सात ढेकळे पावसाच्या सात नक्षत्रांची प्रतीके असतात. दुस-या दिवशी सकाळी करसा बाजूला करून ही ढेकळे निरखून पाहतात. ती किती ओली झाली त्यावरून कोणत्या नक्षत्राला किती पाऊस पडेल याचा अंदाज शेतकरी लावत असतो. झाडीपट्टीतील विवाह समारंभ पूर्वी तिजेपासून प्रारंभ होत असत. इतकेच नाही तर पूर्वी या तिजेच्या मुहूर्तावरच सर्व या परिसरातल्या प्रत्येक गावातील सारे विवाह संपन्न होत असत.
संदर्भ :
- लांजे हिरामण, समग्र झाडीपट्टी, विवेक प्रकाशन,नागपूर, २००६.