जागतिक स्तरावर बँक व्यवसाय करणारी तसेच जगातील अनेक राष्ट्रांच्या केंद्रीय बँकांची बँक म्हणून कार्यरत असलेली सर्वांत जुनी वित्तसंस्था. पहिल्या महायुद्धात पराभूत झालेल्या जर्मनीवर विजयी दोस्तराष्ट्रांनी व्हर्सायचा तह (Treaty of Versailles) याद्वारे जी युद्ध नुकसानभरपाई लादली होती ती वसूल करणे, तिचे प्रशासन व व्यवस्थापन करणे इत्यादी कामांत येणाऱ्या अडचणी दूर करण्याच्या हेतूने तत्कालीन हेग करार करण्यात आला. त्यानुसार बेल्जियम, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान आणि इंग्लंड या देशांतील केंद्रीय बँका आणि अमेरिकेचे प्रतिनिधित्व करणारी एक वित्तसंस्था यांनी पुढाकार घेवून १७ मे १९३० रोजी स्वित्झर्लंड येथील बाझेल येथे आंतरराष्ट्रीय तडजोडविषयक बँकेची (B. I. S.) स्थापना केली. आज साठ देशांतील केंद्रीय बँका आणि जागतीक स्तरावरील काही वित्तसंस्था या बँकेचे सदस्य आहेत. या बँकेचे मुख्य कार्यालय बाझेल येथेच असून हाँगकाँग आणि मेक्सिको सिटी येथे प्रादेशिक प्रातिनिधिक कार्यालये स्थापन करण्यात आली आहेत.
आरंभीच्या काळात या बँकेची कारकीर्द काहीशी वादग्रस्त ठरली होती. त्या सुमारास जर्मनीमध्ये ॲडॉल्फ हिटलर (Adolf Hitler) यांच्या फॅसिस्ट राजवटीचा उदय होत होता. त्या वेळी B. S. I.ची तत्कालीन कार्यपद्धती या राजवटीला पोषक ठरत होती. या बँकेने जुलै १९३२ मध्ये जर्मनीवर असलेले कर्ज माफ करून तेथील उद्योगांसाठी नव्याने मोठ्याप्रमाणात कर्ज उभारणी केली. हिटलरच्या राजवटीने अंकित केलेल्या राष्ट्रांच्या स्वत:कडील ठेवी व सुवर्ण जर्मनीच्या खात्यात वळविण्यास संमती दिली. त्यांनी विविध मार्गांनी लुटलेले सुवर्ण बँकेने स्वीकारून त्या मोबदल्यात त्याला विदेशी चलन उपलब्ध करून देण्यात आले. या सर्व कारणांमुळे B. S. I.वर टीका होऊन जुलै १९४४ मध्ये ब्रेटनवुड्स येथे पार पडलेल्या दोस्तराष्ट्रांच्या परिषदेत या बँकेचे विसर्जन करण्याचा ठराव घेण्यात आला; परंतु अशा प्रकारच्या आंतरराष्ट्रीय बँकेची आवश्यकता लक्षात घेता प्रसिद्ध ब्रिटिश अर्थतज्ज्ञ जॉन मेनार्ड केन्स (John Maynard Keynes) यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने या ठरावास विरोध दर्शविल्यामुळे हा ठराव प्रत्यक्षात अमलात आणला गेला नाही. पुढे एप्रिल १९४५ मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष हॅरी ट्रुमन आणि ब्रिटिश सरकार यांच्या पुढाकाराने B. S. I.चे विसर्जन रद्द करून तिच्या ध्येय धोरणात आमूलाग्र बदल करण्यात आले.
आज B. S. I.द्वारे केंद्रीय बँकांना मुद्राविषय आणि वित्तीय स्थिरता साध्य करण्यासाठी मदत करणे, या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय सहकार्याला चालना देणे आणि केंद्रीय बँकांची बँक म्हणून कार्य करणे या मुख्य उद्दीष्टांची पुर्तता पुढील मार्गाने केली जाते.
- (१) चर्चेला उत्तेजन देऊन सहयोगाची संधी उपलब्ध करून देणे.
- (२) वित्तीय स्थिरतेला चालना देण्यासाठी इतर जबाबदार अधिकाऱ्यांशी संवादाचे समर्थन करणे.
- (३) मुद्राविषयक आणि वित्तीय स्थिरतेशी संबंधित प्रसंगोपात्त प्रश्नांवर संशोधन आणि धोरण विश्लषण करणे.
- (४) वित्तीय देवाणघेवाणीत केंद्रीय बँकांसाठी एक प्रमुख प्रतिपक्ष म्हणून कार्य करणे.
- (५) आंतरराष्ट्रीय वित्तीय व्यवहारात एक एजंट किंवा विश्वस्त म्हणून कार्य करणे इत्यादी. तसेच B. S. I.च्या विविध विभागांमार्फत केंद्रीय बँकांच्या ठेवी, विदेशी विनिमय, सुवर्ण राखीव, निरनिराळे रोखे इत्यादी संबंधिचे व्यवहार केले जातात. कर्ज देणे आणि सुवर्ण व विदेशी विनिमय यांच्या खरेदी विक्रिसंबंधातील बँकेचे व्यवहार अल्पमुदतीचे असतात.
B. S. I.चे शासन व व्यवस्थापन वेळोवेळी संशोधित केलेल्या परिनियमांनुसार चालते. त्यात सर्वसभा, संचालक मंडळ आणि व्यवस्थापक वर्ग अशी त्रिस्तरीय व्यवस्थापनपद्धती स्वीकारण्यात आली आहे. याशिवाय त्यात अनेक विभाग व समित्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. या समित्यांपैकी बँकिंग पर्यवेक्षणावरील ‘बाझेल समिती’ विशेष प्रसिद्ध आहे. या समिती मार्फत जगातील व्यापारी बँकांना विविध जोखमांपासून संरक्षित करणे, त्यांच्या कार्यात सुसूत्रता आणणे, पारदर्शकता निर्माण करणे, हिशेबाच्या संरचनेत एकवाक्यता ठेवणे इत्यादींसाठी आतापर्यंत १९८८, २००४ व २०१० असे तीन वेळा या ऐच्छीक स्वरूपाच्या नियमावल्या जाहीर करण्यात आल्या आहेत.
https://www.youtube.com/watch?v=q1Nd4IBbwQ4
B. S. I.बँकेच्या व्यवस्थापनात पाश्चात्य देशांचा वरचष्मा असल्याचे दिसून येते. बेल्जीयम, फ्रान्स, जर्मनी, इंग्लंड आणि अमेरिका या देशांतील केंद्रीय बँकांच्या गव्हर्नर्स यांना पदसिद्ध सदस्यत्व तसेच या देशातीलच इतर सहा व्यक्तींना दर तीन वर्षांसाठी सदस्यत्व देण्यात येते. इतर देशांतील केंद्रीय बँकांमधून दोन तृतीयांश बहुमताने नऊ सदस्यांची निवड केली जाते. भारताने सप्टेंबर १९९६ मध्ये या बॅंकेचे सदस्यत्व स्वीकारले असून, नोव्हेंबर १९९६ मध्ये Reserve Bank Of India (R. B. I.)चे माजी गव्हर्नर रघुराम गोविंद राजन (Raghuram Govind Rajan) यांची या बँकेच्या उपसभापती पदी तीन वर्षांसाठी निवड झाली होती.
बँकेच्या सर्वसभेची बैठक वर्षातून एक वेळा, संचालक मंडळाची सहा वेळा, तर असाधारण बैठका आवश्यकतेप्रमाणे घेतल्या जातात. २००४ पासून B. I. S.द्वारा हिशेबाचे एकक म्हणून Special Drawing Rights (S. D. R.) या आंतरराष्ट्रीय चलनाचा अवलंब केला जातो. त्यापूर्वी यासाठी सुवर्णफ्रँक हे चलन वापरले जात होते. बँकेद्वारा आपले लेखापरिक्षीत वित्तीय विवरणपत्र नियमीतपणे ३१ मार्च रोजी वार्षिक अहवालातून प्रकाशित केले जाते. ३१ मार्च २०१६ रोजी या बँकेचा ताळेबंद २३१.४ अब्ज S. D. R. इतका होता, तर तिच्या जवळील मत्ता आणि देयता अनुक्रमे २,३५,७१९.३ दशलक्ष आणि २,१६,६८२.६ दशलक्ष S. D. R.एवढा होता. १९४५ सालचा अपवाद वगळता बँकेला दरवर्षी नफा झालेला आहे.
B. S. I. ही आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्य करणारी एक शक्तीशाली वित्तसंस्था असून, तिचा पतदर्जा नेहमी ‘अ’ किंवा त्यापेक्षा जास्त राहिलेला आहे. जगाच्या विशेषत: युरोपच्या मुद्राविषयक व वित्तीय जडणघडणीत या बँकेने महत्त्वाची भूमीका पार पाडली आहे. युरोपीय चलनविषयक संघ आणि युरोपीयन केंद्रीय बँक यांद्वारे युरोपचे चलनविषयक एकीकरण घडवून आणण्यासाठी या बँकेने व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. या बॅकेला स्वित्झर्लंड सरकारतर्फे एखाद्या राजदूतावासासारखा विशेष दर्जा बहाल करण्यात आला आहे. त्यामुळे तिच्या दैनंदिन कामकाजाविषयी व विविध बैठकांतील चर्चेविषयी किंवा कराराविषयी प्रसारमाध्यमांपासून गुप्तता राखली जाते.
संदर्भ :
- Lebor, A., Tower of Basel : The Shadowy History of the Secret Bank that Runs the World, New York, 2013.
समीक्षक – अनिल पडोशी
👍👍👌