विद्युत चुंबकीय प्रारणातील (Electromagnetic spectrum) ज्या किरणांची तरंगलांबी जांभळ्या रंगाच्या तरंगलांबीपेक्षा कमी आहे आणि क्ष-किरणांपेक्षा जास्त आहे, अशा कंपनांनी वर्णपटाचा मोठा भाग व्यापलेला आहे. त्यांना जंबुपार प्रारण म्हणतात.

कंप्रतेनुसार ( frequency, दर सेकंदास होणारी कंपनसंख्या) किंवा तरंगलांबीनुसार (wavelength) विद्युत चुंबकीय वर्णपट स्थूलमानाने सहा भागांत विभागला जातो. लहान तरंगलांबीपासून (किंवा उच्च ऊर्जेपासून)  ते मोठ्या तरंगलांबीपर्यंत हे सहा विभाग पुढीलप्रमाणे : विश्वकिरण (Cosmic Ray), गॅमा किरण (Gamma Ray), क्ष-किरण (X-Ray), जंबुपार किरण (Ultravoilet Ray), दृश्य प्रकाश (यात जांभळा ते तांबडा असे सात रंग येतात; Visible light), अवरक्त  किरण (Infrared Ray), सूक्ष्मतरंग (Microwaves) व रेडिओ तरंग (Radiowavews). यातील जंबुपार किरण विद्युत् चुंबकीय वर्णपटात क्ष-किरणांच्या नंतर असतात व त्यांचे साधारणपणे तीन भाग पाडतात. (१) समीप जंबुपार किरण (near ultravoilet rays) अथवा काळे किरण (black light)-अंदाजे ४,००० Å तरंगलांबीपासून ३,००० Å पर्यंत, (२) मध्यम जंबुपार किरण (middle ultravoilet ray)- ३,००० Å तरंगलांबीपासून २,००० Å पर्यंत व (३) दूर जंबुपार किरण (Far ultravoilet rays) – २०००Å तरंगलांबीपासून ४० Å पर्यंत. सूर्यप्रकाशात जंबुपार किरण ५% आढळतात. परंतु त्यांतील २,८७० Å व त्याहून कमी तरंगलांबी असलेले किरण वातावरणातील ऑक्सिजन व ओझोन या वायूंमुळे शोषले जातात. उरलेल्या किरणांपैकी बराच भाग खिडक्यांच्या तावदानांतून व परावर्तन करणाऱ्या पदार्थांतूनही शोषला जातो, म्हणून नैसर्गिक रीत्या जंबुपार किरण विपुल प्रमाणात पृथ्वीवर येत नाहीत.

रिटर या शास्त्रज्ञांनी दृश्य प्रकाशाच्या पलीकडे वा अलीकडे काही आहे किंवा काय याचा शोध घेण्यासाठी जांभळ्या रंगाकडील बाजू जेव्हा छायाचित्रण काचेवर घेतली, तेव्हा त्यांना त्या काचेवर जांभळ्या रंगापलीकडील भागाचाही परिणाम झाल्याचे आढळून आले व त्यावरून जांभळ्या रंगापलीकडे जंबुपार (अल्ट्रा-व्हायोलेट)-किरण असले पाहिजेत, असे त्यांनी १८०१ मध्ये प्रतिपादन केले. हे त्यांचे म्हणणे इतर प्रयोगांनीही सिद्ध झाले. सध्या जंबुपार किरणांचा शोध छायाचित्रण पद्धतीने, अनुस्फुरण (एखाद्या पदार्थाने त्यावर पडणारे विशिष्ट तरंगलांबीचे प्रारण शोषून त्याच वेळेत जास्त तरंगलांबीच्या प्रारणाचे उत्सर्जन करणे; fluorescence) किंवा प्रस्फुरण (एखाद्या पदार्थाने त्यावर पडणारे प्रारण थांबल्यानंतरही जास्त तरंगलांबीच्या प्रारणांचे उत्सर्जन करीत राहणे; phosphorescence), तसेच प्रकाशविद्युत् घटाच्या (प्रकाश पडला असता ज्यातून विद्युतप्रवाह मिळतो असे साधन) आधारे घेतला जातो.

संदर्भ :

  • Hollaender, A. Radiation Biology, 2 Vols., New York, 1955.
  • Koller, L. R. Ultraviolet Radiation, New York, 1965.
  • Martin, L. C.; Welford, W. Y. Technical Optics, London, 1966.
  • Summer, W. Ultraviolet and Infra-red Engineering, New York, 1962.

समीक्षक – सुधीर पानसे