सजीवनिर्मित पदार्थांच्या रेणूंना सामान्यपणे ‘जैव रेणू’ म्हणतात. या पदार्थांमध्ये कर्बोदके, मेद, प्रथिने,न्यूक्लिइक आम्ले, संप्रेरके आणि जीवनसत्त्वे या पदार्थांचा समावेश होतो. याखेरीज चयापचयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर जे पदार्थ तयार होतात त्या पदार्थांचाही समावेश जैव रेणूंमध्ये करतात. या सर्व पदार्थांमुळे पेशीतील वेगवेगळ्या जीवरासायनिक क्रिया घडून येतात. त्यामुळे सजीवांच्या दृष्टीने हे पदार्थ अतिशय महत्त्वाचे असतात. सजीवांच्या संरचनेत आणि श्वसन, पचन, अभिसरण, उत्सर्जन, प्रजनन, चेता क्रिया इत्यादी जीवनप्रक्रियांसाठी जैव रेणूंचा वापर होतो.

कर्बोदके : जैव रेणूंतील कार्बनी संयुगात कर्बोदकांचे प्रमाण सर्वाधिक असते. कर्बोदके ही पॉलिहायड्रॉक्सी आल्डिहाइडे किंवा पॉलिहायड्रॉक्सी कीटोने असतात. कवक, वनस्पती आणि प्राणी यांमध्ये कर्बोदके विपुल प्रमाणात आणि विविध स्वरूपांत असतात. कवकांमध्ये कर्बोदके ही कायटीन, सेल्युलोज किंवा दोन्ही स्वरूपांत असतात. वनस्पतींमध्ये सेल्युलोज, स्टार्च, लिग्नीन, सुक्रोज, ग्लुकोज, फ्रुक्टोज इत्यादी स्वरूपांत कर्बोदके आढळतात. प्राण्यांच्या पेशींत ग्लुकोज आणि ग्लायकोजेन ही कर्बोदके असतात. दुधातील लॅक्टोज या कर्बोदकाचे रूपांतर शेवटी ग्लुकोजमध्ये होते. सर्व सजीवांमध्ये विविध क्रियांसाठी ग्लुकोजचा वापर होतो. (पहा : कर्बोदके)

मेद : मेद ही अल्कोहॉल आणि मेदाम्ले यांपासून तयार झालेली उच्च रेणुभाराची एस्टरे आहेत. सजीवांमध्ये मेद सामान्यपणे आढळतात. ते ग्लिसरॉल किंवा कोलेस्टेरॉल ही अल्कोहॉले आणि पामिटिक आम्ल, स्टिअरिक आम्ल, ओलीइक आम्ल अशा आम्लांपासून तयार झालेली असतात. जैवपटलांमध्ये मेद पदार्थ हे मुख्य घटक असून ते सर्व प्रकारच्या सजीवांच्या पेशींमध्ये आढळतात. शरीरातील ऊर्जेचा स्रोत म्हणून मेद पदार्थ महत्त्वाचे असतात. हृदय, वृक्क व यकृत या अवयवांभोवती आवरण तयार करणे, वातावरणाच्या बदलानुसार शरीराचे संरक्षण करणे, शरीराच्या वाढीसाठी मेदाम्ले तसेच मेदविद्राव्य जीवनसत्त्वांचा (, , , के) पुरवठा करणे ही मेदांची मुख्य कार्ये आहेत. सरकी तेल, मका तेल, शेंगदाणा तेल तसेच चरबी, मधमाश्यांच्या पोळ्यातील मेण, देवमाशाचे तेल ही सजीवांपासून मिळणारी काही मेद पदार्थांची उदाहरणे आहेत.

प्रथिने : सजीवांत आढळणारी प्रथिने ही नायट्रोजनयुक्त संयुगे असून ती ॲमिनो आम्लांपासून तयार होतात (पहा : ॲमिनो आम्ले). शरीरात ॲमिनो आम्ले जोडून प्रथिने तयार होण्याची क्रिया जनुकाच्या संकेतानुसार होते आणि विशिष्ट प्रथिन विशिष्ट जनुकाच्या संकेतानुसार तयार होते. वाटाणा, घेवडा, भुईमूग, बदाम, गहू या वनस्पतींपासून तर मांस, अंडी, दूध इत्यादी प्राणिज पदार्थांपासून प्रथिने मिळतात. अल्ब्युमिन, ग्लोब्युलिन, प्रोटामिन, ग्लोबिन, ग्लुटेनिन, कोलॅजेन, इलॅस्टिन, केराटिन, न्यूक्लिओ प्रथिने, फॉस्फो प्रथिने, मेद प्रथिने, हीमोग्लोबिन, मेलॅनीन ही प्रथिनांची काही उदाहरणे आहेत. शरीराच्या वाढीसाठी आणि संरचनेसाठी प्रथिने आवश्यक असतात. विकरे हाही प्रथिनांचा एक प्रकार आहे. अन्नाच्या पचनासाठी आणि चयापचयासाठी विकरे आवश्यक असतात.

न्यूक्लिइक आम्ले : सर्व सजीवांना आवश्यक असणारे हे मोठया रेणुभाराचे जैव रेणू आहेत. न्यूक्लिइक आम्ले दोन प्रकारची असतात; डीएनए आणि आरएनए (पहा : न्यूक्लिइक आम्ले). सर्व सजीवांच्या पेशीद्रव्यात आणि केंद्रकात न्यूक्लिइक आम्ले आढळतात. शरीराला आवश्यक असणाऱ्या प्रथिनांचे संश्लेषण करणे आणि जनुकीय साहित्याचे एका पिढीतून पुढच्या पिढीत संक्रमण करणे, हे न्यूक्लिइक आम्लांचे मुख्य कार्य आहे.

जीवनसत्त्वे : सर्व सजीवांच्या वाढीसाठी आणि आरोग्याच्या रक्षणासाठी कर्बोदके, मेद व प्रथिने यांच्याबरोबर जीवनसत्त्वांची आवश्यकता असते. जीवनसत्त्वांचे मेदविद्राव्य आणि जलविद्राव्य असे वर्गीकरण करतात. , , , के ही मेदविद्राव्य जीवनसत्त्वे आहेत, तर -समूह जीवनसत्त्वे, जीवनसत्त्व ही जलविद्राव्य जीवनसत्त्वे आहेत. जीवनसत्त्वांच्या त्रुटीमुळे त्रुटिजन्य विकार उद्भवतात. (पहा : जीवनसत्त्वे)

संप्रेरके : शरीरातील अंत:स्रावी ग्रंथींमध्ये तयार होणाऱ्या विशिष्ट रासायनिक पदार्थांना संप्रेरके म्हणतात. संप्रेरकांची क्रिया हळूहळू होते आणि त्यांचे परिणाम दीर्घकाळ टिकून राहतात. टेस्टोस्टेरॉन, इस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरॉन, अँड्रेनॅलिन, नॉरॲड्रेनॅलिन, इन्शुलिन, ग्लुकागॉन, पॅराथार्मोन, थायरॉक्सिन, वृद्धिसंप्रेरक इत्यादी संप्रेरके काही वेळा जास्त प्रमाणात स्रवतात तर काही वेळा कमी प्रमाणात स्रवतात. त्यामुळे काही विकार उद्भवतात. जसे, इन्शुलिनच्या कमतरतेमुळे मधुमेह होतो. (पहा : अंत:स्रावी ग्रंथी)