ग्लायकोजेन हे एक कर्बोदक आहे. मानव तसेच उच्चस्तरीय प्राण्यांच्या शरीरात ग्लुकोजचा संचय ग्लायकोजेनच्या रूपात केला जातो. ग्लायकोजेन ही ग्लुकोजपासून तयार होणारी बहुशर्करा असून तिचे रेणुसूत्र (C6H10O5)n असे आहे. ग्लायकोजेनच्या एका रेणूत सु.६०,००० ग्लुकोजचे रेणू असतात. वनस्पतिसृष्टीत स्टार्च या कर्बोदकाचे जे स्थान आहे, तेच प्राणिसृष्टीत ग्लायकोजेनचे आहे. रचनासूत्राच्या दृष्टीने ग्लायकोजेनचे स्टार्चच्या अ‍ॅमिलोपेक्टिन या प्रकाराशी साम्य आहे. जेव्हा अधिक ऊर्जेची आवश्यकता निर्माण होते तेव्हा ग्लायकोजेनचे विघटन होऊन ग्लुकोज उपलब्ध होते. रक्तातील ग्लुकोजची पातळी कायम ठेवण्यासाठी यकृतात साठलेले अतिरिक्त ग्लायकोजेन वापरले जाते. स्नायूंच्या आकुंचन प्रसारणासाठी आवश्यक असणारी आवश्यक असणारी ऊर्जा ग्लायकोजेनपासून मिळते.

ग्लायकोजेन लहान आणि अस्फटिकी कणांच्या स्वरूपात पेशीद्रव्यात आढळते. ग्लुकोजचक्रात ते महत्त्वाची भूमिका पार पाडते. शरीराला जेव्हा तातडीने ग्लुकोजची आवश्यकता भासते तेव्हा यकृतातील ग्लायकोजेनपासून ते उपलब्ध होते. यकृतातील ग्लायकोजेनचे प्रमाण सर्व स्नायूंच्या तुलनेत कमी असते. प्रौढ व्यक्तींच्या यकृतात १००-१२० ग्रॅ.ग्लायकोजेन जेवणानंतर उपलब्ध असते. यकृतातील ग्लायकोजेन शरीराच्या इतर अवयवांनाही उपलब्ध होऊ शकते. मूत्रपिंड, रक्तातील पांढर्‍या पेशी व मेंदूतील विशिष्ट चेताबंध पेशीं यांमध्येही ग्लायकोजेन अल्प प्रमाणात आढळते. गर्भाशयातही अर्भकाच्या पोषणासाठी ग्लायकोजेन साठविले जाते. ग्लायकोजेन मुख्यत: प्राण्यांत आढळत असले तरी जीवाणू, कवक, किण्व (यीस्ट) इत्यादींमध्येही ते आढळते.