रात्रीच्या वेळी दिव्याकडे आकर्षित होणारा एक कीटक. पतंगांचा समावेश संधिपाद संघाच्या कीटक वर्गातील खवलेपंखी (लेपिडोप्टेरा) गणात होतो. त्यांना काही वेळा पाखरू किंवा पाकोळी असेही म्हटले जाते. पतंग आणि फुलपाखरे एकमेकांना जवळचे असून ते एकाच गणातील आहेत. जगात पतंगांच्या सु. १,६०,००० जाती असून फुलपाखरांच्या जातींची संख्या सु. १७,५०० आहे. पतंगांच्या जाती एकूण २६ कुलांत विभागलेल्या आहेत. भारतात त्यांच्या सु.१०,००० जाती आढळतात. महाराष्ट्रात पतंगांची विविधता आणि संख्या फुलपाखरांच्या तुलनेत जास्त आहे. बहुतेक पतंग निशाचर आहेत. मात्र, त्यांच्या काही जाती दिनचर तर काही दिननिशाचर आहेत.

पतंग

पतंगाच्या शरीराचे डोके, वक्ष आणि उदर असे तीन भाग पडतात. डोक्यावर दोन शृंगिका असून त्या पिसांप्रमाणे शाखीय आणि टोकांकडे निमुळत्या होत गेलेल्या असतात. पतंगाचे डोळे डोक्याच्या तुलनेत आकाराने लहान असतात. मुखांगांचे रूपांतर द्रवरूप अन्नपदार्थ ओढून घेण्यासाठी सोंडेत झालेले असते. ही सोंड एरव्ही डोक्याच्या खालच्या बाजूला किल्लीच्या घड्याळाच्या स्प्रिंगेसारखी गुंडाळी झालेली असते. अन्न घेत असताना ती पूर्णपणे उघडली जाते. पतंगाच्या छातीवर पंखांच्या दोन जोडया असून पुढचे आणि मागचे पंख एका आकडीच्या साह्याने एकमेकांशी जोडलेले असतात. उड्डाणासाठी दोन्ही पंखांचा उपयोग केला जातो. बसताना पतंग आपले पंख बाजूंना पसरून उघडे ठेवतात. नर आकर्षक गडद रंगाचे असून आकाराने लहान असतात, तर माद्या मळकट रंगांच्या आणि आकाराने मोठया असतात. पतंगांमध्ये परिपूर्ण जीवनचक्र आणि पूर्ण रूपांतरण असून अंडे, अळी, कोश आणि प्रौढ अशा चार अवस्था असतात. पतंग जसे भक्षक आहेत तसेच ते निशाचर कीटकभक्षी प्राण्यांचे भक्ष्य आहेत. वटवाघूळ, घुबड आणि काही पक्षी यांचे पतंग हे भक्ष्य आहे. एवढेच नाही तर सरडे, मांजर, कुत्रे हेसुद्धा काही वेळा पतंग खातात.

रेशीम पतंगांसारखे काही अपवाद वगळता पतंग वनस्पतींसाठी तसेच पिकांसाठी उपद्रवी असतात. पतंगांच्या अळ्या केसाळ असून त्यांना सुरवंट किंवा घुले म्हणतात. अळ्यांचे रंग भडक, झगमगीत असून त्यावर पट्टे किंवा ठिपके असतात. या अळ्या भाज्या, फळे, पिके, साठविलेले धान्य पोखरून त्यांचे नुकसान करतात. लेपिडोप्टेरा गणातील अनेक कीटक बॅक्युलोव्हिरीडी कुलातील विषाणूंचे वाहक असतात. रसायने फवारून या अळ्यांचा नायनाट केला जातो. पतंगांच्या नियंत्रणासाठी प्रकाशाकडे आकर्षित होण्याच्या त्यांच्या वर्तनाचा फायदा घेऊन अनेक पतंग प्रकाश सापळ्यांच्या साहाय्याने पकडतात.

अळ्यांचे रंग व आकारमान, पंखांवरील ठिपके, अळ्या ज्या वनस्पतींवर बहुतकरून आढळतात, त्यानुसार पतंगांना नावे दिलेली आहेत. काटेघरातील पतंग, ससाणी पतंग, बदामी पतंग, भयकारी वेताळ पतंग, कण्हेरीवरील पतंग, फळचोखी पतंग, निळसर-तपकिरी पतंग, गुणगुण्या पतंग, राक्षसी पतंग, घुबड किंवा पिंगळा पतंग, बाटली पतंग, ज्वारीकांडवेधी पतंग, रेषीय पतंग इत्यादी पतंग महाराष्ट्रात आढळतात. यांतील काही पतंगांचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे.

काटेघरातील पतंगाचे शास्त्रीय नाव थायरिडाप्टेरिक्स एपिमेरीफॉर्मिस असून ते बाभळीच्या झाडांवर आढळतात. बाभळीच्या काट्यांपासून बनविलेल्या घरात या अळ्या वाढतात. बाभळीच्या झाडाला अशी काटेघरे अनेकदा लटकलेली दिसतात.

भयकारी वेताळ पतंग (अचेराँशिया लाचेंसिस)

भयकारी वेताळ पतंगाचे शास्त्रीय नाव अचेराँशिया लाचेंसिस आहे. या पतंगाच्या नराचा पंखविस्तार १० – १३ सेंमी. असतो. यांच्या पंखांची पुढील जोडी पिवळी किंवा भगवी असते, तर मागची जोडी पिवळी असते. पंखांच्या कडांवर काळे पट्टे असून अधूनमधून पिवळी बुंदके असतात. वक्षाच्या मध्यभागी एकामागे एक अशी दोन बुंदके असतात. उदराच्या खंडांवर दोन्ही बाजूंना पिवळे पट्टे असतात. हा पतंग भीतिदायक दिसतो. प्रौढ पतंग आणि अळ्या वांगे, तीळ आणि घेवडा यांसारख्या वनस्पतींवर आढळतात.

राक्षसी पतंग (ॲटॅकस ॲटलास)

राक्षसी पतंगाचे शास्त्रीय नाव ॲटॅकस ॲटलास असून त्याचे पंख ३० सेंमी.पेक्षा अधिक लांब असतात. आशियात आढळणारा हा एक मोठा कीटक असून जगातदेखील आकाराने हा पतंग मोठा आहे.

लेपिडोप्टेरा गणात फुलपाखरे आणि पतंग यांचा समावेश होतो. या दोन्ही प्रकारांत अनेक बाह्य फरक आहेत. त्यांच्या आधारे कीटक पाहताच तो पतंग आहे की ते फुलपाखरू आहे, हे सांगता येते. फुलपाखरांच्या शृंगिका बारीक आणि शाखाविरहित असून त्यांची टोके गदेसारख्या किंवा गाठदार असतात. पतंगांच्या शृंगिका पक्ष्यांच्या पिसाप्रमाणे शाखीय असतात आणि त्यांची टोके गाठदार नसून बारीक होत गेलेली असतात. डोक्याच्या मानाने फुलपाखरांचे डोळे मोठे, तर पतंगांचे लहान असतात. विश्रांती घेताना जवळ जवळ सर्व फुलपाखरे आपले पंख मिटून पाठीवर उभे धरतात, तर पतंग आपले पंख न मिटता ते उघडून पसरून धरतात. पतंगांचे पुढचे आणि त्याच बाजूचे मागचे पंख एका आकडीने एकमेकांना जोडलेले असतात, तर फुलपाखरांचे पंख अशा रीतीने जोडलेले नसतात. काही अपवाद वगळता सर्व फुलपाखरे दिनचर असतात. काही अपवाद सोडता सर्व पतंग निशाचर असतात. सामान्यपणे फुलपाखरांचे शरीर सडपातळ असते, तर पतंगांचे शरीर बोजड आणि रुंद असते. फुलपाखरे जास्त आकर्षक आणि मनमोहक दिसतात, तर बहुतेक पतंग फारसे आकर्षक नसतात. फुलपाखरांच्या अळ्यांना खाऱ्या पायांच्या तीन जोडयांखेरीज पाच जोड्या चूषक पायांच्या असतात, तर अनेक पतंगांच्या अळ्यांना चूषक पायांच्या जोडया पाचांपेक्षा कमी असतात. काही वेळा त्या फक्त दोनच असतात. बहुतेक पतंग निशाचर आणि फुलपाखरे दिनचर असल्यामुळे रात्री पतंग दिव्याकडे आकर्षित होताना दिसतात तशी फुलपाखरे दिव्याकडे आकर्षित होताना दिसत नाहीत.