दृश्य प्रकाशाचे सर्व मूलभूत नियम जंबुपार प्रारणाना जसेच्या तसे लागू होतात. परावर्तन (Reflection), अपरिवर्तन (refraction) त्याचप्रमाणे व्यतिकरण (interference, दोन वा अधिक तरंगमालिका एकमेकींवर येऊन पडल्यामुळे घडून येणारा अविष्कार), विवर्तन (diffraction, किरण अपारदर्शक पदार्थाच्या कडेवरून जाताना त्याच्या छायेत वळतात) व ध्रुवण (polarization,एकाच प्रतलात कंपन होणे) हे दृश्य प्रकाशाचे गुणधर्मही जंबुपार किरणांतही आढळून येतात.
पण जंबुपार किरण उच्च कम्प्रतेचे असल्यामुळे अधिक शक्तिशाली असतात. त्यामुळे ते दृश्य प्रकाशापेक्षा धातूंमध्ये अधिक खोलवर जाऊ शकतात. परिणामी ते जास्त प्रमाणात धातूत शोषले जातात. उदाहरणार्थ, चांदी एकूण प्रकाशाच्या ९८% प्रकाश परावर्तित करते, तर जंबुपार किरणांचा फक्त ४% भागच परावर्तित करते. हे किरण सर्वसाधारणपणे कोठल्याही पारदर्शक पदार्थातून जाताना (उदाहरणार्थ काच) त्या पदार्थात शोषले जातात. याला क्वॉर्ट्झ व फ्ल्युओराइट हे अपवाद आहेत.
जैव परिणाम : जंबुपार किरणांच्या शोषणामुळे मानवावर काही विशेष परिणाम होतात. या विशिष्ट गुणधर्मामुळे ड-जीवनसत्त्व निर्मिती व सूर्यदाह यांसारखे परिणाम आढळून येतात. जंबुपार किरणांचा परिणाम मानवी त्वचेवरही होतो व त्वचा लालसर होते. हा परिणाम विशेषकरून ३,२०० Å खालील तरंगलांबीच्या किरणांमुळे जास्त उद्भवतो व त्यांचा जास्तीत जास्त परिणाम २,९६६ Å तरंगलांबीमुळे होतो, असे आढळून आले आहे. लहान मुलांच्या कोमल त्वचेवर हे किरण सु. ९-१० तास पडले असता त्या ठिकाणी लाल रंगाचा चट्टा तयार होऊन जळजळ सुरू होते.
जंबुपार किरणांचे परिणाम अन्य सजीवांवरही होतात. प्रामुख्याने ते एककोशिक सजीवांवर (उदा., सूक्ष्मजंतू, यीस्ट, प्रोटोझोआ) जास्त प्रमाणात होतात. यास प्रकाश-जीववैज्ञानिक परिणाम म्हणतात. हा परिणाम शोषल्या जाणाऱ्या जंबुपार किरणांच्या तरंगलांबीवर मुख्यतः अवलंबून असतो. थोड्या प्रमाणात शोषल्या जाणाऱ्या जंबुपार किरणांमुळे सागरी प्राण्यांना त्यांची अंडी उबविण्यास मदत होते. याउलट जास्त प्रमाणात शोषल्या गेलेल्या जंबुपार किरणांमुळे कोशिकांची पार्यता (बाह्य पदार्थ आत जाऊ देण्याची क्षमता) वाढते, व ते घातक असते.
मात्र जंबुपार किरण जीववैज्ञानिक संशोधनासाठी खूपच उपयोगी ठरले आहेत; कारण या किरणांच्या आधारे काही क्रिया, कोणत्याही बाह्य रसायनाची मदत न घेता, थांबविता येतात. म्हणून सूक्ष्मजीवांच्या उत्परिवर्तन (आकार, गुण व स्वरूप या आनुवंशिक गुणधर्मांत होणाऱ्या एकाएकी बदलाच्या; mutation) निर्मितीसाठी, कोशिकांच्या विभाजनाची गती मंद करण्यासाठी आणि कोशिकांमध्ये निर्माण होणाऱ्या न्यूक्लिइक अम्लांच्या संशोधनासाठी या किरणांचा उपयोग होतो.
उपयोग : जंबुपार किरणांमुळे अनुस्फुरण (fluorescence ) व प्रस्फुरण (phosphorescence) होत असल्याने त्यांचा उपयोग प्रकाशनिर्मितीसाठी, प्रकाशमय (दृश्य प्रकाशाने उजळणाऱ्या) जाहीरातीसाठी, वैशिष्ट्ययुक्त शोषणामुळे किंवा अनुस्फुरणामुळे होऊ शकणाऱ्या रासायनिक विश्लेषणासाठी केला जातो. काही कारखान्यांत यंत्रांच्या निरनिराळ्या भागांत ओतकाम करताना राहिलेला उणेपणा शोधून काढण्यास जंबुपार किरणांचा उपयोग करतात. त्याचप्रमाणे अदृश्य लिखाण वाचण्यासाठी, बँकेमध्ये बनावट चेक ओळखण्यासाठी केला जातो. कृत्रिम जीवनसत्त्वे, सल्फा औषधे, प्रतिजैव (अँटिबायॉटिक) औषधे यांचे शोध लागण्याअगोदर जंबुपार किरणांचा उपयोग मुडदूस आणि त्वचेचा क्षयरोग बरे करण्याकडे केला जात असे व अजूनही त्यांचा उपयोग इतर औषधांच्या बरोबर विसर्पिका (त्वचेचा एक विशिष्ट रोग), चेहऱ्यावरील बारीक फोड (मुरुम) यांसारखे रोग बरे करण्याकडे केला जातो. ड-जीवनसत्व कमी झाल्यामुळे उत्पन्न होणाऱ्या मुडदूसासारख्या रोगांवर जंबुपार किरण एक जालीम उपाय म्हणून आजही वापरतात. रुग्णालयातील हवा निर्जंतुक करण्यासाठीही या किरणांचा उपयोग केला जातो.
संदर्भ :
- Hollaender, A. Radiation Biology, 2 Vols., New York, 1955.
- Koller, L. R. Ultraviolet Radiation, New York, 1965.
- Martin, L. C.; Welford, W. Y. Technical Optics, London, 1966.
- Summer, W. Ultraviolet and Infra-red Engineering, New York, 1962.
पुनर्लेखन – सुधीर पानसे