पाटील,आत्माराम : (जन्म : ९ नोव्हेंबर १९२४ – मृत्यू : १० नोव्हेंबर २०१०) विख्यात मराठी शाहीर. पूर्ण नाव आत्माराम महादेव पाटील. आईचे नाव जानकीबाई. ठाणे जिल्ह्यातील पालघर तालुक्यामधील मकाणे-कापसे ह्या  गावामध्ये शेतीवर गुजराण करणाऱ्या कुणबी कष्टकरी जातीत आत्मारामांचा जन्म झाला. घरची परिस्थिती बेताची असताना आत्मारामांनी जन्मगावापासून दूर वसलेल्या भादवे-दानिवरे व माकुणसार ह्या गावांतील लोकल बोर्डाच्या शाळांमधून व्हर्न्याक्युलर फायनलपर्यंतचे शिक्षण घेतले.लहानपणी ब्रिटिश राजवटीकडून भारतीयांवर होणारा अन्याय, आदिवासी भागातील भीषण दारिद्र्य,आवेशपूर्ण भाषेत स्वातंत्र्याची मागणी करणारी प्रभातफेऱ्यांतील गाणी, शाहीर खाडिलकरांचे वीररसपूर्ण पोवाडे आणि साने गुरुजींच्या राष्ट्रसेवा दलातील तरुणांचे कार्य ह्या बाबी जवळून अनुभवल्याने आत्मारामांच्या मनात स्वदेश,समाज आणि शाहिरी काव्य ह्यांबाबत आत्मीयता निर्माण झाली. बेचाळीसचे ब्रिटिशविरोधी चले जाव आंदोलन केल्यानंतर इ. स. १९४६च्या सुमारास आत्माराम पाटील नोकरीच्या निमित्ताने मुंबईला आले. तेथे अमर शेख,अण्णाभाऊ साठे आणि दत्ता गव्हाणकर ह्या साम्यवादी विचारसरणीच्या शाहिरांचे कार्यक्रम त्यांच्या पाहण्यात आले. ह्या कार्यक्रमांच्या प्रभावातून आत्मारामांतील शाहीर जागा झाला आणि त्यांच्याकडून खेड्यात चला (१९४६) हे दिंडीकाव्य लिहिले गेले. पुढे आमचं शिवार  (लोकगीत), जंगलचं राज्य, वनवासी  (जागरगीत) फॅशनचे दुष्परिणाम  (पोवाडा) ह्या माध्यमातून आत्मरामांची शाहिरी हळूहळू प्रगल्भ होत गेली.

स्वतःच्या शाहिरीचा पद्धतशीर विकास करण्याच्या उद्देशाने आत्माराम पाटलांनी महाराष्ट्रातील शाहिरी वाङ्मयाच्या परंपरेचा धांडोळा घेतला.तेव्हा शिवाजी महाराजांच्या काळातील वीररसप्रधान पोवाडे आणि दुसऱ्या बाजीरावाच्या काळातील शृंगारिक लावणी अशा शाहिरीच्या दोन्ही तऱ्हा आत्मारामांच्या लक्षात आल्या. त्यानंतर त्यांनी आद्य शिवशाहीर आगीनदासाला आदर्श मानले व मनोरंजनापेक्षा जनजागृतीला महत्त्व देऊन पुरोगामी छत्रपती  नावाचा पोवाडा व ज्ञाती विसर्जनाची लावणी  आणि मुंबईची लावणी ह्या लावण्या रचून लोकप्रबोधनास सुरुवात केली.

पुढे मराठी मुलुखात संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरु झाली. तेव्हा संयुक्त महाराष्ट्र ह्या कल्पनेच्या समर्थनार्थ आत्मारामांनी संयुक्त महाराष्ट्राचा गोंधळ लिहिला. आत्मारामांच्या गोंधळाचे महत्त्व व परिणामकारकता लक्षात आल्याने अण्णाभाऊ साठे आणि अमर शेख ह्या नामवंत शाहिरांनी हा गोंधळ महाराष्ट्रभर पोहोचविला. आत्मारामांचा गोंधळ जनभावनेला वाचा फोडणारा असल्याने त्यातील ‘संयुक्त महाराष्ट्र उगवतोय माझ्या सरकारा | खुशाल कोंबडं झाकून धरा ||’ ह्या पंक्ती जनसामान्यांच्या पसंतीस उतरल्या. त्यानंतर नव्या पिढीतील शाहीर म्हणून आत्माराम पाटलांना मोठी प्रसिद्धी मिळाली. पुढे इ. स. १९६० मध्ये मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली. त्यानंतर ‘अखंड गुणगानी जाहला जरी माझा अंत | पुन्हा जन्मुनी गात मरावे महाराष्ट्र गीत ||’ असा बाणा ठेवून शाहीर आत्माराम पाटलांनी विविध विषयांवर आणि महत्त्वाच्या घडामोडींवर वेगवेगळ्या प्रकारचे वाङ्मय निर्माण केले.

आत्माराम पाटील हे बहुजनांचे हित समोर ठेवून तळमळीने लेखन करणारे कलावंत होते. ते स्वतःचे लेखन स्वतःच छापत व छापलेले साहित्य स्वखर्चाने महराष्ट्रभर पसरलेल्या शाहिरांपर्यंत पोहोचवत. त्यांच्या साहित्यसंपदेत १५ समरगीते, २० लावण्या, ७० पोवाडे, १०५ क्रांतिपुराण ओव्या, २५० डफगाणी व समूहगीते, ३००हून अधिक लेख तसेच विविध अभंग, जागरगीतं, गोंधळ, वगनाट्यं, नभोनाट्यं, व्याख्यानं इ. चा समावेश होतो. आत्मरामांच्या साहित्यात संयुक्त महाराष्ट्र चळवळ, चीनचे भारतावरील आक्रमण, किल्लारी भूकंप, गोवा मुक्तीसंग्राम इत्यादी घडामोडींवरील वर्णन आणि भाष्य आढळते. त्यामुळे त्यांच्या लेखनास ऐतिहासिक आणि सामाजिक मूल्य प्राप्त झालेले दिसते.

आत्माराम पाटलांनी शाहीर फुलवरा ह्या नावाचे शाहिरी कलापथक निर्माण केले होते.हे पथक महाराष्ट्रभर फिरून वेगवेगळे प्रबोधनात्मक कार्यक्रम करत असे. शाहीर फुलवराच्या माध्यमातून जखमी जवान,अवर्षणग्रस्त, पूरग्रस्त, अपघातग्रस्त लोक व मागासलेल्या भागात राहणाऱ्या ठाकर आणि वारली जमातीतील आदिवासींना आत्माराम पाटलांनी मदत केली होती.आत्मारामांनी शासन दरबारी पाठपुरावा केल्यामुळे सफाळे रेल्वे स्टेशनवरील अपघातग्रस्तांना आर्थिक मदत प्राप्त झाली होती.त्यामुळे रेल्वे खात्याने आत्मारामांना आभारपर पत्र पाठवून त्यांचा गौरव केला होता. ह्यावरून आत्मारामांच्या मनातील सर्वसामान्यांविषयीची आस्था आणि सामाजिक भान दिसून येते. आत्मारामांच्या हरेक लेखनात ते ‘बहुजन हिताय’ होते अशी झलक पहावयास मिळते.असंख्य लोकनाट्ये, पोवाडे, लावण्या, प्रहसने, प्रभातफेरीतील गाणी अशा लेखनाचा अक्षय ठेवा त्यांनी मराठी सारस्वतांसाठी निर्माण करून ठेवला आहे.  इ. स. १९९४मध्ये शाहिरी कलेच्या संदर्भातील कार्यासाठी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाची शिष्यवृत्ती आत्मारामांना प्रदान करण्यात आली.

वयाच्या ८६ व्या वर्षी वृद्धापकाळाने आत्माराम पाटलांचे निधन झाले.

संदर्भ :

  • ओव्हाळ,प्रभाकर,ऐका शाहिराची कथा  (शाहीर आत्माराम पाटील यांची जीवनकहाणी), मनोविकास प्रकाशन, पुणे, २०१०.

समीक्षक – अशोक इंगळे

प्रतिक्रिया व्यक्त करा